
Nashik News: जिल्ह्यात मे महिन्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून बागायती व बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या अंतिम नुकसान अहवालावरून समोर आले आहे.
जिल्ह्यात नुकसान भरपाईस पात्र ३३ टक्क्यांवर नुकसान झालेले १२ हजार १६० हेक्टर क्षेत्र आहे. यामध्ये रब्बी हंगामातील उन्हाळा कांदा पिकाचे ७ हजार ५५७ हेक्टर क्षेत्रावर सर्वाधिक नुकसान आहे. कृषी विभागाने अंतिम नुकसान अहवाल शासनाकडे सादर केला आहे. त्यासाठी ३५ कोटी २२ लाख इतका निधी अपेक्षित आहे.
कृषी विभागाच्या माहितीनुसार नाशिक, पेठ, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, निफाड, येवला, सिन्नर, चांदवड, मालेगाव, सटाणा, नांदगाव, कळवण, दिंडोरी, पेठ, सुरगाणा या सर्वच तालुक्यांमध्ये कमी-जास्त नुकसान आहे. बागायती व बहुवार्षिक फळपिकांचे जिल्ह्यातील १ हजार ४६९ गावांमध्ये ३५ हजार ७७४ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
सटाणा तालुक्यात सर्वाधिक १४५ गावांमध्ये ३ हजार ६८ हेक्टर क्षेत्रावर ३ हजार ७१९ शेतकऱ्यांचे नुकसान आहे. सर्वांत कमी नुकसान त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे. बागायती पिकांमध्ये रब्बी हंगामातील उन्हाळ कांद्याचे सर्वाधिक ७ हजार ५५७ तर भाजीपाल्याचे ९३७ हेक्टर क्षेत्रावर नुकसान आहे. सटाणा तालुक्यात कांद्याचे नुकसान मोठ्या प्रमाणावर आहे.
या शिवाय दिंडोरी, चांदवड, निफाड, सुरगाणा, कळवण व नांदगाव येथे अधिक नुकसान आहे. इतर ठिकाणी ते तुलनेत कमी आहे. यासह मका ३९३ तर टोमॅटोचे ३१९ हेक्टरवर नुकसान आहे. याशिवाय बाजरी, ज्वारी, उन्हाळी भुईमूग, मिरची व कांदा बीजोत्पादन क्षेत्र बाधित आहे.बहुवार्षिक फळपिकांमध्ये आंब्याचे २४४१ हेक्टर क्षेत्रावर नुकसान आहे.
यामध्ये सुरगाणा, पेठ व त्र्यंबकेश्वर तालुक्यात सर्वाधिक नुकसान आहे. यासह डाळिंबाचे १९०, चिकू १३, द्राक्ष ५ हेक्टर यासह पेरू, मोसंबी बागांचे नुकसान आहे. नुकसान भरपाईसाठी ग्राह्य धरण्यात आलेल्या बागायती क्षेत्रामध्ये २००० हेक्टरपर्यंत मर्यादेत ९४५५.८० हेक्टरवर २१ हजार ६४ शेतकऱ्यांचे तर २ हजार हेक्टरवर ४३.१० हेक्टर क्षेत्रावर ३७ शेतकऱ्यांचे नुकसान आहे.
बागायती पिकांमध्ये सटाणा तालुक्यात क्षेत्रनिहाय व बाधित शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. तर दिंडोरी व चांदवड तालुक्यात बाधित शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. तर बहुवार्षिक फळपिकांमध्ये सुरगाणा तालुक्यात १७८ गावांमध्ये सर्वाधिक १,३३६ हेक्टरवर ८,३२५ आंबा उत्पादक शेतकरी बाधित आहेत.
फळपिकांच्या नुकसानीचा अंतिम संयुक्त अहवाल तालुकास्तरावरून प्राप्त झाल्यानंतर जिल्हा पातळीवरील अंतिम अहवाल नुकसान भरपाईसाठी सादर करण्यात आला आहे. कोरडवाहू क्षेत्रासाठी प्रतिहेक्टर १३,६००, बागायत क्षेत्रासाठी २७,००० तर बहुवार्षिक फळपिके क्षेत्रासाठी ३६००० रुपये याप्रमाणे नुकसान भरपाई देणे प्रस्तावित आहे. एप्रिलमध्ये २ हजार १५१ हेक्टर क्षेत्रावर नुकसान असून त्यासाठी ६ कोटींची मागणी करण्यात आली होती.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.