Irrigation Department : सिंचन विभागाच्या पाणीपट्टीची तब्बल ११६ कोटी १६ लाखांची थकबाकी

Kolhapur Farmers : कोल्हापूर जिल्ह्यातील सिंचन विभागाच्या पाणीपट्टीची तब्बल ११६ कोटी १६ लाख रुपये थकबाकी आहे.
Irrigation Department
Irrigation Departmentagrowon

Kolhapur Agriculture News : कोल्हापूर जिल्ह्यातील सिंचन विभागाच्या पाणीपट्टीची तब्बल ११६ कोटी १६ लाख रुपये थकबाकी आहे. वर्षानुवर्षे ही थकबाकी न भरल्याने आकडा वाढत गेला आहे. त्यामुळे जादा थकबाकी असलेल्या सुमारे १७ हजार २५० जणांना पाटबंधारे विभागाकडून वसुलीच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर या आर्थिक वर्षातील सिंचन पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून कार्यवाही सुरू आहे.

पाटबंधारे विभागाला दरवर्षी सिंचन व बिगर सिंचनच्या पाणीपट्टी वसुलीसाठी उद्दिष्ट दिले जाते. त्यानुसार या आर्थिक वर्षात पाटबंधारे उत्तर विभागासाठी 'सिंचन' करीता साडे चौदा कोटी रुपये उद्दिष्ट देण्यात आले आहे. आतापर्यंत सुमारे दोन कोटी ६८ लाख रुपये पाणीपट्टी वसुली झाली आहे.

'बिगर सिंचन'साठी ३२ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आतापर्यंत २८ कोटी ४१ लाख रुपये वसुली झाली आहे. त्याचबरोबर दक्षिण विभागात 'सिंचन'साठी पाच कोटी ५० लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले असून आतापर्यंत दोन कोटींची वसुली झाली आहे. तर 'बिगर सिंचन' साठी तीन कोटींचे उद्दिष्ट असून आतापर्यंत ६३ लाख रुपयांची वसुली झाली आहे.

मार्चपर्यंत हे आर्थिक वर्षातील उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी धावपळ सुरु आहे. वसुलीची रक्कम ऑनलाईनद्वारे जमा करुन घेतली जात आहे. त्याशिवाय पाटबंधारे विभागाच्या शाखांमध्ये ही बिले भरुन घेतली जात आहेत. तसेच विभागाचे कर्मचारीही प्रत्यक्ष भेटी देऊन बिले गोळा करत आहेत.

दरम्यान, वर्षानुवर्षे थकबाकीदार असलेल्यांकडून वसुलीसाठी पाटबंधारे विभागाने युध्दपातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत. उत्तर व दक्षिण विभागाचे मिळून पाणीपट्टीचे तब्बल ११५ कोटी १६ लाख रुपये थकित आहेत. यातील १० हजार ते एक लाख रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्या प्रातिनिधीक १७ हजार २५० थकबाकीदारांना वसुलीच्या नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत.

यामध्ये उत्तर विभागातील १० हजार ७५० थकबाकीदार व दक्षिण विभगातील सहा हजार ५०० थकबाकीदारांचा समावेश आहे. दक्षिण विभागातील एकूण २८ कोटींची थकबाकी असून आतापर्यंत तीन कोटींची वसुली झाली आहे. तसेच उत्तर विभागात थकबाकी एकूण ९० कोटी १६ लाख रुपये असून वसुलीसाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.

Irrigation Department
Agriculture Irrigation : वीजनिर्मितीचे १२ टीएमसी पाणी सिंचनासाठी राखीव ठेवा

उत्तर-दक्षिण' विभागाचे कार्यक्षेत्र व ग्राहक

पाटबंधारे उत्तर विभागाचे कार्यक्षेत्र भुदरगड, गडहिंग्लज, चंदगड, आजरा हे आहे, तर दक्षिण विभागात करवीर, राधानगरी, कागल, हातकणंगले, शिरोळ, शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा हे तालुके येतात. याचे ग्राहक हे औद्योगिक असून यामध्ये महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती, साखर कारखाने, 'एमआयडीसी'तील मिल व कारखाने आदींचा समावेश आहे. तसेच दक्षिण विभागाचे कार्यक्षेत्र हे भुदरगड, गडहिंग्लज, आजरा, चंदगड या तालुक्यांचे आहे. याचे ग्राहक हे शेतकरी व ग्रामीण पाणीपुरवठा संस्था आहेत.

सिंचनची पाणीपट्टी वेळेत भरली तर ग्राहकांना विलंब शुल्क आकारले जात नाही, परंतु अनेक ग्राहक हे वेळेत पैसे भरत नसल्याने थकबाकी वाढली आहे. पाणीपट्टीची रक्कम ही एका हेक्टरसाठी १३५० रुपये इतकी अल्प आहे, तरीही ग्राहकांकडून ती भरली जात नाही. यामुळे पाटबंधारे विभागाच्या महसुलावर परिणाम होत आहे, तरी थकबाकीदारांनी पाणीपट्टी भरून सहकार्य करावे. - स्मिता माने, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग (उत्तर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com