सोलापुरात द्राक्ष, डाळिंबाला उठाव, दर टिकून

in Solapur, pomegranate, Grapes rate raised
in Solapur, pomegranate, Grapes rate raised

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात द्राक्ष, डाळिंबाला चांगली मागणी राहिली. त्यांचे दरही या सप्ताहात पुन्हा टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात डाळिंबांची आवक रोज २०० ते ४०० क्विंटलपर्यंत, तर द्राक्षाची आवक एक-दोन गाड्या अशी राहिली. डाळिंबांची आवक मंगळवेढा, सांगोला, माढा भागातून आणि द्राक्षाची आवक पंढरपूर, बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ भागातून झाली. बाहेरील आवक अगदीच कमी होती.

गेल्या काही दिवसांपासून द्राक्ष, डाळिंबाला मागणी वाढते आहे. त्यामुळे त्यांचे दर टिकून आहेत. डाळिंबाला प्रतिक्विंटलला किमान ७०० रुपये, सरासरी ३००० रुपये आणि सर्वाधिक १० हजार रुपये, तर द्राक्षाला चार किलोच्या पेटीला किमान ४०० रुपये, सरासरी ७०० रुपये आणि सर्वाधिक ११०० रुपये असा दर मिळाला.

पंधरवड्यापूर्वीही दर काहीसे असेच होते. या सप्ताहात पुन्हा जैसे थे परिस्थिती राहिली. लिंबू, बोरालाही चांगला उठाव मिळाला. लिंबांची रोज २० ते ४० क्विंटल आणि बोरांची ५० क्विंटलपर्यंत सरासरी आवक राहिली. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या आवकेत लक्षणीय वाढ झाली आहे. पण, मागणी असल्याने त्यांनाही उठाव आहे.

लिंबांना प्रतिक्विंटलला किमान ७०० रुपये, सरासरी १००० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये, तर बोरांना किमान ४०० रुपये, सरासरी ९०० रुपये आणि सर्वाधिक १८०० रुपये, असा दर मिळाला. फळभाज्यांमध्ये दोडका, वांगी यांनाही मागणी राहिली. त्यांची आवकही प्रत्येकी २० ते ३० क्विंटल प्रतिदिन अशी राहिली.

दोडक्याला प्रतिक्विंटलला किमान ६०० रुपये, सरासरी १००० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये, तर वांग्याला किमान ५०० रुपये, सरासरी १००० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये असा दर मिळाला. 

कांद्याचे दर स्थिरच

या सप्ताहातही पुन्हा कांद्याची आवक १०० ते २०० गाड्यांपर्यंत रोज राहिली. पण, मागणी असूनही दरात मात्र चढ-उतार राहिला. कांद्याची सर्वाधिक आवक स्थानिक भागातून झाली. त्यांना प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २८०० रुपये असा दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com