Onion rate
Onion rate

सोलापुरात कांद्याला २० हजार कमाल दर

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या हंगामात कांद्याच्या बाजाराने चांगलीच उसळी घेतली आहे. अगदी नाशिक आणि लासलगावसारख्या बाजारालाही मागे टाकत दराने उच्चांक केला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून कांद्याचा हा बाजार चांगलाच तेजीत आहे. पंधरा दिवसांपूर्वी प्रतिक्विंटलला आठ हजारांवर असणारा दर गुरुवारी (ता. ५) जवळपास अडीच पटीने वाढून प्रतिक्विंटलला सर्वाधिक २० हजार रुपयांवर पोचला.  व्यापाऱ्यांनी बंद पाडलेल्या लिलावामुळे बाजार समितीमध्ये रोज सकाळी दहा वाजता सुरू होणारे लिलाव गुरुवारी दुपारी एकच्या नंतर सुरू झाले. पण उशिराच्या लिलावाचा कोणताही परिणाम कांद्याच्या दरावर झाला नाही. गुरुवारीही बाजारात कांद्याची आवक २०० हून अधिक गाड्यापर्यंत कायम होती. सध्या कांद्याची आवक स्थानिक भागातून कमी असली, तरी बाहेरील जिल्ह्यातून मात्र अधिक आहे. अगदी नगर, पुणे, सातारा, उस्मानाबाद आणि लातूर, बीड भागातून हा कांदा सोलापूर बाजार समितीत येतो आहे. २१ नोव्हेंबरला बाजार समितीत पहिल्यांदा कांद्याने दराचा उच्चांक केला, तो आठ हजार रुपये, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी २२ नोव्हेंबरला तो ९ हजार १०० रुपयांवर पोचला, तर २५ नोव्हेंबरला ११ हजार रुपये दर मिळाला. त्यानंतर मात्र १५ हजारांवर कायम राहिला आहे.  गुरुवारी (ता. ५) मात्र कांद्याच्या या दराने आणखीनच उच्चांक केला. पूर्वीचे सगळ्या दराचे आकडे मोडीत काढत, प्रतिक्विंटलला तब्बल २० हजार रुपये इतक्‍या दराची बोली लागली. राज्यातील दराचा हा उच्चांक आहेच. पण देशांतर्गत बाजारातही कांद्याच्या दराचा हा उच्चांक मानला जातो आहे. गुरुवारी कांद्याचा किमान दर २०० रुपये आणि सरासरी दर सहा हजार रुपयांच्या दरम्यान राहिला. कांद्याला वाढलेली मागणी आणि उपलब्ध आवक यांच्यातील तफावत वाढत असल्याने दरात तेजी राहिल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

व्यापाऱ्याला भरवले पेढे  यंदा पहिल्यांदाच कांद्याच्या दराने २० हजारांपर्यंतचा उच्चांक केला. हा दर मिळवणारे शेतकरी गौडगाव (ता. अक्कलकोट) येथील शेतकरी शिवानंद फुलारी हे ठरले. त्यांनी गुरुवारी व्यापारी अतिक नदाफ यांच्याकडे कांद्याच्या सात गोण्या विक्रीसाठी आणल्या होत्या. त्यात पहिल्या प्रतीच्या कांद्याच्या त्यांच्या ६ गोण्या (३०९ किलो) होत्या. तर दुसऱ्या प्रतीची एक गोणी होती. त्यात पहिल्या प्रतीच्या कांद्याला प्रतिक्विंटलला प्रत्येकी २० हजाराचा दर मिळाला. या सहा गोण्यांचीच ६१ हजार ८०० रुपये इतकी पट्टी त्यांना मिळाली. तर दुसऱ्या प्रतीच्या कांद्याला २५०० रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाला. अशा एकूण सात गोण्यांना त्यांना ६३ हजार रुपये मिळाले. हा दर मिळाल्यानंतर आनंदीत झालेल्या शेतकरी शिवानंद फुलारी यांनी बोली लावणारे व्यापारी नदाफ यांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com