विधानसभेत रंगणार शक्तिप्रदर्शनाचे महानाट्य

एकनाथ शिंदेच्या हालचालींवर ‘भाजप’चे लक्ष; योग्य वेळेची प्रतीक्षा
MLC Election
MLC ElectionAgrowon

नवी दिल्ली : ‘‘जेव्हा एकादा रूग्ण व्हेटिलेटरवर असतो तो जास्त काळ ‘टिकणे’ अशक्यच असते. पण अशा वेळी ‘अंतिम’ परिणाम दिसेपर्यंत शांत बसणे हेच इतरांनी करावे अशी अपेक्षा असते व महाराष्ट्रातील आघाडी सरकारबाबतही भाजपची तीच भूमिका आहे.’’ राज्यातील राजकीय अस्थिरतेवर भाजपच्या (BJP) एका केंद्रीय नेत्याने व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया बोलकी आहे. या राजकीय नाट्याची सूत्रे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या ६-कृष्ण मेनन येथील कार्यालयातून हलविली जात आहेत. विधानसभेतील शक्तीपरीक्षणाद्वारे महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) पाडणे याकडेच भाजपचा कल दिसतो. (Political Crisis In Maharashtra)

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच्या आमदारांची संख्या वाढत जाताना ती ‘निर्णायक’ टप्प्यापर्यंत पोहोचत नाही तोवर भाजप यात प्रत्यक्ष उडी घेणार नाही हे स्पष्ट आहे. महाविकास आघाडीतील अस्थिरता सुरू झाल्यापासून गेले तीन दिवस भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने आपला त्याच्याशी काहीही संबंध नसल्याचे चित्र दिल्लीत निर्माण केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री शहा, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा व महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून यावर एका अक्षराचीही जाहीर प्रतिक्रिया आलेली नाही. केवळ आमदारच नव्हे तर भाजप नेतृत्वाकडून सेना खासदारांशीही संपर्क साधण्यात आलेला आहे.

पक्षसूत्रांच्या मते शिवसेना नेते एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबतच्या शिवसेना आमदारांशी संपर्क साधणे, मूळचे जळगावचे असलेले गुजरातचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी ‘ॲक्टिव्ह’ मोडवर येणे, या आमदारांना थेट गुवाहाटीत नेण्याचा निर्णय व त्यांची बडदास्त ठेवण्याबाबतचे निर्देश पूरग्रस्त आसामच्या मुख्यमंत्र्यांना रातोरात देणे ही सारी सूत्रे दिल्लीतूनच हलविण्यात आली. अमित शहा यांच्या निवासस्थानी त्यांचे एक कार्यालय आहे. तेथील एक अधिकारी या सर्व समन्वयाची सूत्रे हाताळत आहेत.

भाजप सूत्रांच्या मते महाराष्ट्राबाबत भाजप नेतृत्व कमालीच्या सावधपणे पावले टाकीत आहे. राजस्थानातील सचिन पायलट यांचे फसलेले बंड, हरियानात दुष्यंत चौताला यांनी अगदी अखेरच्या क्षणी भाजपला साथ देणे व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील यापूर्वीचा पहाटेच्या शपथविधीचा अनुभव ताजा असल्याने भाजप नेतृत्व कोणताही रिस्क घेण्याच्या मूडमध्ये नाही. बोम्मई खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी बोम्मई खटल्यात दिलेला निकाल पाहता राष्ट्रपती राजवट लावण्‍याचा तर विचारही भाजप नेतृत्व करू शकत नाही. शिंदे यांच्यामागे योग्य संख्याबळ जमा झाल्यावरच भाजप राज्यातील सत्तास्थापनेच्या खेळात ‘दृश्यमान’ होईल.

जब रात है एसी मतवाली...

महाराष्ट्र मे अब क्या होगा, असा सवाल केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांना विचारण्यात आला त्यावर त्यांनी थेट प्रतिक्रिया दिली नाही. नक्वी यांनी, ‘जब रात है इतनी मतवाली, तो सुबह का आलम क्या होगा’ अशी उपरोधिक प्रतिक्रिया दिली. तर आसाममध्ये महापुरात २० लाख लोक विस्थापित झालेले असताना मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा महाराष्ट्रातील बंडखोरांच्या बडदास्तीत गर्क असल्याबाबत तृणमूल काँग्रेसने गुवाहाटीत जोरदार निदर्शने केली. त्याकडेही भाजपने कानाडोळा केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com