
Krishna River News पुणे ः कृष्णा खोऱ्यात (Krishna Valley) उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीशी सामना करण्यासाठी राज्याच्या जलसंपदा विभागाने (Department Of Water Resource) विविध उपायांवर कामे सुरू केली आहेत.
त्यात कृष्णा नदीचे (Krishna River) काही ठिकाणी असलेले नागमोडी वळण कायमचे बंद करीत नदीचे सरळीकरण केले जाणार आहे. मात्र, पर्यावरणवादी व जलतज्ज्ञांनी या निर्णयावर टीका केली आहे.
जलसंपदा विभागाच्या उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले की, कृष्णा खोऱ्यात अतिपावसामुळे उद्भवणाऱ्या अभूतपूर्व पूर स्थितीबाबत जलसंपदा विभागाचे अभियंते अतिशय गांभिर्याने काम करीत आहेत.
काही भागात कृष्णेच्या सरळीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबत आर्थिक तरतूद होताच कामे सुरू होतील.
अर्थात, सरळीकरणाचा निर्णय घाईघाईने किंवा अशास्त्रीय पद्धतीने घेतला जात नाही. त्यासाठी सखोल अभ्यास करण्यात आलेला आहे.
सांगली शहराच्या खालील बाजूस कृष्णा नागमोडी वळण घेत. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. सरळीकरण केल्याशिवाय या समस्येवर दुसरा पर्याय नाही, अशी शिफारस जलसंपदा विभागाच्या अभ्यासगटाने केली आहे.
‘‘कोल्हापूर, इचलकरंजी, शिरोळ या भागातदेखील नदीच्या पुराची तीव्रता कमी करावी लागेल. त्यासाठी कृष्णा व पंचगंगा नदीचे सरळीकरण अपरिहार्य आहे.
भूपृष्ठावर पात्र तयार करणे किंवा जमिनीखाली विशाल बोगदा खणणे, असे दोन पर्याय सरळीकरणासाठी वापरले जाऊ शकतात. त्यामुळे ही कामेदेखील चटकन होणार नाही.
त्यासाठी भूसंपादन करावे लागेल. नदीकाठची जमीन सुपीक किंवा शहरीकरणात येत असल्यामुळे काम खर्चिक आहे. परिणामी पुढील काही वर्षे कृष्णेच्या नागमोडी पात्रालगत पुराची परिस्थिती कायम असेल,’’ असे एका कार्यकारी अभियंत्याने स्पष्ट केले.
कृष्णा खोरे विकास महामंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कृष्णा खोऱ्यातील पूर समस्या हाताळण्यासाठी आधी या खोऱ्यातील अतिरिक्त पाणी वळवण्याचादेखील एक पर्याय आहे.
कृष्णेचे पाणी भीमेच्या खोऱ्यात वळवता येईल. जलसंपदा विभागाने या संकल्पनेचा अहवाल तयार केला असून त्यावर काहीही निर्णय झालेला नाही.
दरम्यान, जलसंपदा विभागातील दुसऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, कृष्णेचे पाणी भीमा खोऱ्यात वळवण्याचा अहवाल तयार असला तरी त्यावर तत्काळ निर्णय घेता येत नाही.
कारण, त्यासाठी कृष्णा पाणी तंटा लवादाची अडचण आहे. लवादाने दिलेल्या निवाड्यात महाराष्ट्रावर काही बंधने लादली आहेत. या बंधनामुळे कृष्णेचे पाणी वळवणे हे सध्या तरी एक स्वप्नरंजन आहे.
कृष्णासारख्या विशाल नदीचे पात्र बदलून सरळ करणे म्हणजे विस्तवाशी खेळ ठरेल. नागमोडी नदी सरळ केली तरी काही वर्षांनंतर ती पुन्हा मूळ अवस्थेकडेच येईल. कारण नदी तिचे नैसर्गिक स्वरूप कधीही सोडत नाही. जलसंपदा विभागाने अभ्यासूपणे निर्णय न घेतल्यास सरळीकरण कुचकामी ठरेल. तथापि, पर्यावरणासाठीदेखील हा निर्णय घातक असेल.
- प्रा. प्रदीप पुरंदरे, जलतज्ज्ञ
‘शेकडो वर्षांपासून वाहणाऱ्या कृष्णेचा प्रवाह बदलणे म्हणजे नदीची मूळ नैसर्गिक स्थिती नष्ट करणे होय. त्याचे गंभीर परिणाम नदी परिसंस्थेवर होतील. नदी वळवण्यापेक्षा अतिक्रमणे, पात्राचा संकोच, धरणातून सोडले जाणारे पाणी, गाळ वहन या मुद्द्यांवर कामे करायला हवी. जलसंपदा विभागाने नदीला छळण्यापेक्षा पुराचे मूळ कारणे शोधावीत.
- प्रशांत परदेशी, पर्यावरणाचे अभ्यासक
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.