
अॅग्रोवन वृत्तसेवा
पुणे ः अवकाळी पावसामुळे (Avkali paus) राज्यातील पिकांच्या झालेल्या हानीचा आकडा वीस हजार हेक्टरपर्यंत पोहोचला आहे.
काही जिल्ह्यांमध्ये अद्यापही पंचनाम्याची कामे सुरू असल्यामुळे पीक नुकसानीचा अंतिम अहवाल तयार झालेला नाही.
कृषी विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, अतिपाऊस, गारपीट आणि वादळ अशा तीन कारणांमुळे पिकांची हानी झालेली आहे.
पहिल्या टप्प्यात मिळत असलेल्या प्राथमिक माहितीनुसार १३ जिल्ह्यांमधील १९ हजार ९०० हेक्टरवरील पिके नष्ट झाल्याचा अंदाज आहे.
सर्वांत जास्त नुकसान अहमदनगर जिल्ह्यात झालेले आहे. कोपरगाव, राहुरी, नेवासा, अकोले या चार तालुक्यांत चार हजार हेक्टरवरील रब्बी पिके भुईसपाट झाली आहेत. यात मका, गहू, कांदा व भाजीपाला पिकांचा समावेश आहे.
चालू रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी ५७ लाख ७४ हजार हेक्टरवर पेरणी केली आहे. त्यात हरभरा व गहू ही मुख्य पिके आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये गहू व हरभऱ्याची कापणी सुरू असतानाच पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांची त्रेधा उडाली.
अनेक गावांमध्ये गव्हाचे पीक वादळाने झोडपून शेतात आडवे झाले. त्यामुळे तेथे झालेल्या गव्हाची गुणवत्ता खालावणार आहे. तृणधान्य व कडधान्यापेक्षाही राज्यात भाजीपाला आणि फळपिकांची हानी जास्त आहे. मात्र त्याचा नेमका अंदाज हाती येणार नाही.
कारण आंब्याचा मोहर गळून मोठे नुकसान झालेले आहे. तसेच भाजीपाला पिकांमधील सड ही पुढील काही दिवसांत उद्भवणार आहे. द्राक्षामध्ये घडकुज होऊ शकते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
कोकणात आंब्या पाठोपाठ काजू बागांचेही मोठे नुकसान काही गावांमध्ये झाले आहे. पालघरच्या विक्रमगड व जव्हार या दोन तालुक्यांतील ७६० हेक्टर काजू व आंबा बागांची हानी झाल्याचा अहवाल स्थानिक प्रशासनाने दिला आहे.
तसेच रायगडच्या सात तालुक्यांमध्ये २२५ हेक्टरवरील आंबा व भाजीपाला पिके नष्ट झाली आहे. अवकाळी पावसाचा सर्वाधिक तडाखा उत्तर महाराष्ट्राला बसला आहे. कारण धुळ्याच्या साक्री, शिंदखेडा, शिरपूर तालुक्यांतील तीन हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील मका, गहू, हरभरा, ज्वारी, तसेच केळी आणि पपईचे पीक नष्ट झालेले आहे.
नंदुरबारमधील दीड हजार हेक्टरवरील पिके वाया गेली आहेत. नाशिक जिल्ह्याच्या कळवण, नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि निफाड या चार तालुक्यांमधील गहू, भाजीपाला, आंबा आणि द्राक्ष पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.
गहू, कांदा, ज्वारी, हरभऱ्याला फटका
मराठवाड्यात औरंगाबादला ६२१ हेक्टरवरील गहू, कांदा आणि हरभरा मातीमोल झाला आहे. विदर्भात बुलडाण्याच्या मानोरा तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे.
तेथे ७७५ हेक्टरवरील मका, गहू, कांदा, ज्वारी आणि हरभरा पीक वाया गेल्याचे सांगितले जात आहे. शिवाय वाशीममधील ४७५ हेक्टरवरील पिके नष्ट झाली आहेत.
पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाने हजेरी लावली असली तरी नुकसान झालेले नाही. मात्र पुण्याच्या खेड व आंबेगावमधील ४० हेक्टरवरील पिकांना पावसाचा तडाखा बसला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.