Pune News : ‘‘महाराष्ट्रातील मावळा शेतकरी प्रयोगशील, कष्टाळू आहे. मात्र विकासाच्या प्रक्रियेत स्थलांतरे होत गावे ओस पडत आहेत. ती पुन्हा समृद्ध करायची असतील तर आता कलाकारांनी पुढे यायला हवे. कलाकारांनी आपापल्या गावांमध्ये शेतकरी, ग्रामस्थांच्या मदतीने उपक्रम राबविल्यास ओसाड गावे पुन्हा फुलून येतील,’’ अशी भावना दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी व्यक्त केली.
पुण्याच्या मुळशी तालुक्यातील मांदेडे गाव ‘प्राज’ कंपनीने ग्रामविकासासाठी दत्तक घेतले आहे. या संकल्पनेत स्वतःहून सहभागी झालेल्या श्री. तरडे यांनी शेती व ग्रामविकासावर पत्रकारांशी अलीकडेच मनमोकळ्या गप्पा मारल्या. “मी शेतकरीपुत्र आहे.
जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेलो तरी मुळशी, शेती, शेतकरी, मराठमोळी मुलं यांच्यापासून मी दूर नसतो. गावातील जगणं मी अनुभवलं आहे. पावसाळा आला की लाकूडफाट्यासाठी आई जंगलात फिरायची.
सरपण गोळा करायची. मोळ्या तयार करायच्या. त्या वाहून घरी आणायच्या आणि त्यानंतर चूल पेटवून भाकर तयार व्हायची. कितीही समस्या असल्या तरी शेतीच आम्हाला जगवायची. म्हणूनच शेती कधीच विकायची नाही, असा माझा कायम आग्रह असतो,” असे श्री. तरडे म्हणाले.
कमी होत जाणारी शेती, बिल्डरांना विकल्या जाणाऱ्या जमिनी, त्यातून गावागावांमध्ये तयार झालेल्या समस्या यावर श्री. तरडे यांनी ‘मुळशी पॅटर्न’ हा बहुचर्चित चित्रपट तयार केला. “मुळशी तालुक्याची वाटचाल कायम क्रांतिकारी मार्गाने जात राहिली. सेनापती बापट याच मुळशीतून तयार झाले.
शिवकालात सर्वाधिक बळ शिवरायांना मुळशीमधील मावळ्यांनी दिले. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा या प्रांतातून उदयाला आली. वारकरी संप्रदायाची सर्वांत मोठी दिंडी मुळशीतून निघते. मुळशीने आयटी पार्क दिला. लवासा प्रकल्प दिला. मात्र विकासाच्या वाटेवर माझा तालुका दिसला नाही.
गावे भकास झाली. तो आम्ही मुळशी पॅटर्नमध्ये मांडला. आता या चित्रपटाचा दुसरा भाग आम्ही तयार करणार आहोत. त्यात बिल्डर्स मंडळींवर प्रकाश टाकलेला असेल,” असे श्री. तरडे यांनी बोलून दाखवले.
‘‘राज्याच्या कला, सांस्कृतिक, चित्रपट क्षेत्राला अनेक कलावंत ग्रामीण भागाने दिले आहेत. माझ्यासारखेच या कलावतांनी आपापल्या भागात पुढाकार घेत ग्रामविकासाचे उपक्रम राबवावेत. त्यातून गावकऱ्यांच्या मदतीने गावे विकसित करता येतील. स्थलांतर रोखता येईल. शहरात गेलेली माणसं पुन्हा गावाकडे येऊ शकतील,’’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कितीही मोठा असो; मी त्याची कॉलर पकडणार
प्राज उद्योग समूहाचे अध्यक्ष प्रमोद चौधरी यांनी मुळशीतील मांदेडे गावाला पर्यावरणपूरक विकासाचे गाव म्हणून पुढे नेण्याचा संकल्प सोडला आहे. त्याचा धागा पकडत अभिनेते प्रवीण तरडे म्हणाले, ‘‘माझा शब्द आहे की आमचे मांदेडे गाव एक दिवस देशात चर्चेचे ठरेल. त्याची दखल मुख्यमंत्र्यांपासून पंतप्रधानांनाही घ्यावी लागेल.
आता मुळशीमधील इतर गावांमध्येही अशीच चळवळ सुरू करण्याची गरज आहे. आम्ही आता शेतजमिनी, डोंगर आणखी ओरबाडू देणार नाहीत. कितीही मोठा राजकारणी असला तरी त्याची कॉलर पकडण्याची धमक माझ्यात आहे. तालुक्याला ओरबाडणारा मुळशी पॅटर्न चालू दिला जाणार नाही. येथे यापुढे फक्त ग्रामविकासाचे चौधरी पॅटर्न चालतील.”
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.