राजकुमार चौगुलेFlower Farming: कोल्हापूर जिल्ह्यातील हरोली (ता.शिरोळ) येथील राजेंद्र बाबू परीट यांची केवळ १९ गुंठे शेती आहे. मात्र क्षेत्र कमी आहे म्हणून कुठेही निराश न होता अल्प क्षेत्रातून निशिगंध, शेवंती या फुलशेतीतून त्यांनी आयुष्याला बहर आणला आहे. शेतीतील उत्पन्नातून अन्य प्रगती वा विकासाला प्राधान्य न देता सून श्रुतीला सीए करण्याची जिद्द बाळगून तिला शिक्षणासाठी आर्थिक व प्रोत्साहनपर मोठे पाठबळही त्यांनी दिले. हे नक्कीच वेगळे व आदर्श उदाहरण म्हणावे लागेल. .कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ हा ऊस व भाजीपाला शेती यांच्यासाठी प्रसिद्ध असलेला तालुका आहे. तालुक्यातील हरोली येथे राजेंद्र परीट यांची वडिलोपार्जित ४० गुंठे शेती होती. वाटण्या झाल्यानंतर राजेंद्र यांच्या वाट्याला केवळ १९ गुंठेच शेती आली. अर्थात क्षेत्र अत्यंत अल्प असले तरी ते निराश झाले नाहीत. कायम आशावादी व सकारात्मक वृत्तीने ते प्रयोग करीत राहिले. त्यांना पत्नी जयश्री यांची समर्थ साथ मिळाली. सन २००२ पासून २०२१ पर्यंत दोघांनी भाजीपाला शेतीवर भर दिला..गवार, टोमॅटो, फ्लॉवर आदी पिके त्यांनी यशस्वी केली. अर्थात भाजीपाला शेती म्हटलं की आव्हाने भरपूर असतात. दरांचे गणित अनेकवेळा जुळून येत नाही. अलीकडील काळात तर खर्च जास्त व नफा कमी पदरात पडू लागला होता. कोरोनाच्या काळात तर भाजीपाला शेती तोट्यात गेली. शेतीची सुरवात खरे तर ऊस पिकापासून केली होती. पण चुनखडीयुक्त जमिनीत उत्पादन समाधानकारक मिळत नव्हते. सातत्याने येणाऱ्या अडचणींवर मात करत माती परीक्षण अहवालाच्या आधारावर शेतीत बदल घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यातूनच भाजीपाला पिकांऐवजी फूलशेती करण्याचा निर्णय घेतला..Agriculture Success Story: युवा शेतकऱ्याची बहुविध फळबाग तंत्र पध्दतीची शेती.फुलशेतीतील वाटचालफुलशेतीचा निर्णय घेतल्यानंतर फूलउत्पादकांच्या प्लॉटसना भेटी देण्यास सुरवात केली. तज्ज्ञ, कृषी सेवा केंद्र चालकांकडून रोपे, लागवड पद्धती याविषयी माहिती घेतली. एकाच फुलावर अवलंबून राहण्यापेक्षा अधिक फुलांचे उत्पादन घेण्याचे ठरवले, त्यातून दरांची अनिश्चिती कमी होऊन वर्षभर उत्पादन व आर्थिक ओघ राहील असा विचार केला. अभ्यासातून निशिगंध आणि शेवंती यांची निवड केली. अर्थात हा निर्णय धाडसी होता. विशेष म्हणजे शिरोळ तालुक्यात ही फुले फारशी घेतली जात नाहीत. तरीही जोखीम पत्करून हा नवा प्रयोग केला. आजमितीला फुलशेतीत सुमारे तीन वर्षांचा अनुभव तयार झाला आहे. एकूण १९ गुंठ्यामध्ये सुमारे तीन- चार गुंठ्यात शेवंती तर सोळा गुंठ्यावर निशिगंध हे मुख्य पीक असते. त्यात झेंडूचे आंतरपीक घेतले जाते. त्यातून मुख्य फुलांमधील खर्च कमी केला जातो. तीन फुलांमध्ये कोणत्या त्या कोणत्या फुलाला दर असतोच. त्यामुळे उत्पन्नाची शाश्वती राहते..फूलशेती करताना ज्या काही समस्या उद्भवतात त्यासाठी सांगली जिल्ह्यातील यशस्वी फूलउत्पादकांचे मार्गदर्शन घेतले जाते. आज या शेतीतून परीट दांपत्याने चांगले आर्थिक स्थैर्य मिळवले आहे. शेतीचा आकार वाढू शकत नसला तरी उत्पादन आणि तंत्रज्ञान वाढवले. जिद्द आणि प्रयत्नांच्या बळावर अल्प शेती देखील फायदेशीर केली. निसर्गाच्या लहरीपणामध्येही व्यवस्थापनाच्या जोरावर नुकसान कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे फूलशेती शक्यतो तोट्यात गेली नाही..Agriculture Success Story: नाशिकच्या मातीत घेतले ‘ॲव्होकॅडो’चे यशस्वी उत्पादन.शेतीतील श्रमपहाटे पाचच्या सुमारास राजेंद्र आणि जयश्री हे दोघेही शेतात हजर होतात. दररोज अडीच ते तीन तास फुलांची तोडणी चालते. त्यातून ताजी फुले बाजारात पाठवण्यासाठी तयार होतात. शेतातील बहुतांश कामे हे दांपत्यच करते. त्यामुळे मजुरांवरील खर्चही त्यांनी कमी केला आहे. दुपारनंतर राजेंद्र आपल्या घरीच थाटलेला इस्त्रीचा व्यवसाय चालवतात. अर्थात संध्याकाळी देखील काही वेळ ते पुन्हा शेतीलाच देतात. त्यामुळे दुहेरी उत्पन्नाचा कुटुंबाला आधार झाला आहे..फुलांची विक्री व्यवस्था+ सुमारे २० किलोमीटरवर असलेल्या मिरज मार्केटला दररोज दुचाकीवरून फुले घेऊन जावी लागतात. तिथे सौद्यावेळी राजेंद्र थांबतात. दर निश्चित झाल्यानंतर घरी परततात. अशा प्रकारे दररोज ४० किलोमीटर अंतर ते जान येऊन करतात. फुलशेतीत वर्षातील चार- पाच महिने म्हणजे गणेशोत्सव ते दसरा, दिवाळी कालपर्यंत तेजी असते. उर्वरित आठ महिने दर तुलनेने कमी असतात. राजेंद्र सांगतात की वर्षभरात निशिगंधाला सरासरी दर किलोला ८० रुपयांच्या दरम्यान मिळतो. दसरा, दिवाळी या काळात हा दर ४०० रुपयांपर्यंत असतो. सणासुदीत शेवंतीला किलोला १५० ते २०० रुपये दर मिळतो. शेवंती हे सहा महिन्यांचे पीक आहे. तर निशिगंधा एकदा लागवड केल्यानंतर दोन वर्षे उत्पादन देत राहते. जिल्ह्याच्या अन्य भागात काहीवेळा फुलांची एसटीबस मार्फतही पाठवणी केली जाते. काही व्यापारीही थेट खरेदी करतात. फुलांचा दर्जा सातत्याने चांगला राखण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे नेहमीचा आणि खात्रीचा ग्राहक तयार झाला आहे..सुनेला ‘सीए’ करण्यासाठी प्राधान्यराजेंद्र यांचा मुलगा रवींद्रकुमार यांनी प्रिंटिंग विषयातील पदवी घेतली आहे. सध्या ते खासगी कंपनीत नोकरी करतात. त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे. परीट कुटुंब सध्या मातीच्या घरात राहते. त्यांना पक्के घर बांधायचे आहे. परंतु सर्वात आधी राजेंद्र यांनी सून श्रुती यांच्या सीएच्या शिक्षणाला प्राधान्य दिले आहे. पत्नीच्या भावाचीच ती मुलगी आहे. तिच्या आई-वडिलांना राजेंद्र यांनी शब्द दिला होता की काळजी करू नका, तुमच्या मुलीला मी सीएपर्यंत शिकवतो! हा शब्द त्यांनी तंतोतंत पाळण्यास सुरवात केली आहे. शेतीतील उत्पन्नातील महत्त्वाचा वाटा ते तिच्या शिक्षणासाठी देत आहेत. सासू जयश्री यांचीही तिला खंबीर साथ दिली आहे. आज अनेक कुटुंबातील सदस्यांमध्ये विशेषतः सासू- सुनेमध्ये विविध कारणांवरून कलह पाहण्यास मिळतात. त्या पार्श्वभूमीवर परीट कुटुंबाने जपलेली नाती, कुटुंबाचा एकोपा निश्चित प्रेरणादायी आहे.राजेंद्र परीट ८८८८२३०५१६.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.