Women Farmers: बार्डी (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील शिंदे कुटुंबाची कथा म्हणजे एकी, कष्ट, स्वावलंबन आणि आधुनिक विज्ञान यांचा सुरेख संगम आहे. ‘एमकेसीएल’ संस्थेचे ‘चीफ मेंटॉर’ विवेक सावंत यांच्या संकल्पनेतून तसेच अशोक बंग व निरंजना मारू यांच्या ‘चेतना विकास’ संस्थेच्या परिश्रमातून संजीवक स्वावलंबी शेती प्रकल्प आकारास आला. त्यामध्ये यशस्वी कार्य करून शेतात प्रयोगशील होऊन शिंदे कुटुंबातील सून नकुशाताई सोमनाथ शिंदे यांनी नवी ओळख मिळविली. कुटुंबाला आर्थिक आधार दिला. एकीकडे शास्त्रज्ञ- शेतकरी म्हणून घडताना लेडीज शॉपीच्या माध्यमातून व्यावसायिका म्हणूनही त्यांनी स्वतःला घडविले आहे. .सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात बार्डी गाव आहे. येथील रोहिदास आणि कावेरी हे शिंदे दांपत्य राहते. त्यांना नागनाथ, सोमनाथ आणि सिद्धेश्वर ही तीन मुले आहेत. सुना-नातवंडांसह १५ सदस्यांचे हे एकत्रित कुटुंब आहे. त्यांची नऊ एकर शेती आहे. त्यामध्ये चार एकर द्राक्ष बाग, अर्धा एकर डाळिंब आणि उर्वरित क्षेत्रावर ज्वारी, गहू अशी पारंपरिक पिके असतात. मोठा मुलगा नागनाथ पूर्णवेळ शेती पाहतो. सोमनाथ पशुवैद्यक असून, धाकटा सिद्धेश्वर खाजगी नोकरी करतो. कुटुंबाचे खरे बलस्थान आहे त्या घरच्या कर्त्या आई अर्थात कावेरी शिंदे. आपल्या तिन्ही सुनांना त्यांनी लेकी म्हणून कुटुंबात सामावून घेतले. त्यांना स्वावलंबनाचे धडे दिले. सुनांनीही आपापली जबाबदारी ओळखून कुटुंबाला पुढे नेण्याची धडपड सुरू ठेवली..Poultry Business Success: रवींद्र मेटकर यांची शेतीपूरक व्यवसायातील वाटचाल अनुकरणीय .सासूबाईंती तिन्ही सुनांना प्रेरणावयाने थकल्या असल्या तरी सासूबाई कावेरी यांचे शरीर, हात- पाय एखाद्या यंत्राप्रमाणे चालतात. आर्थिक स्वावलंबन म्हणजेच कष्टाची भाकरी खावी या विचारातून त्यांनी पिठाची चिक्की आणि मिरची कांडपाचा घरगुती व्यवसाय सुरू केला. त्यातून दरमहा चांगले उत्पन्न मिळवून कुटुंबाला त्या हातभार लावतात. सासूबाईंची ही धडपड पाहूनच घरातील तीन सुनांना म्हणजे रेखा, नकुशा आणि शशिकला यांना उद्योजिका होण्याचं बळ मिळालं. मोठ्या सूनबाई रेखा शेतीकामात आघाडीवर असतात. द्राक्ष, डाळिंबाच्या बागेत राबण्याबरोबरच सेंद्रिय पद्धतीने त्या भाजीपाला पिकवितात. गावात स्वतः फिरून हातविक्री करतात. .ऊन, वारा, पाऊस अशी कशाचीही तमा न बाळगता या व्यवसायातून त्या घराला दरमहा चांगली कमाई करून देतात. लहान सून शशिकला द्राक्ष बागेत खांद्याला खांदा लावून काम करतात. प्रापंचिक जबाबदाऱ्या उत्तमपणे पार पाडतात. खासगी संस्थेत कामही करतात. मधल्या सूनबाई म्हणजे नकुशाताई यांचीही प्रयोगशीलता वाखाणण्याजोगी आहे. उद्योजकतेची बीजे त्यांच्यात आहेत. त्या गावात ‘लेडीज शॉपी'' चालवतात. महिलांच्या गरजा ओळखून सुरू केलेल्या या व्यवसायातून त्यांना महिन्याकाठी १० ते १५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. म्हणजेच सासूबाई व तीन सुना यांनी घरचा आर्थिक डोलारा समर्थपणे सांभाळला आहे..नकुशाताई झाल्या शास्त्रज्ञ शेतकरीनकुशाताईंचे डी.एड. पर्यंत शिक्षण झाले. शिक्षिका होण्याचे त्यांचे स्वप्न होते, परंतु नोकरीसाठीचा संघर्ष आणि वाट्याला आलेली प्रतिक्षा त्यांना स्वस्थ बसू देईना. अशा परिस्थितीत त्यांच्यातील जिद्दीला पुणे स्थित ‘एमकेसीएल’ संस्थेची मदत मिळाली. संस्थेचे ‘चीफ मेंटॉर’ विवेक सावंत यांच्या संकल्पनेतून आणि अशोक बंग व निरंजना मारू यांच्या ''चेतना विकास'' संस्थेच्या परिश्रमातून संजीवक स्वावलंबी शेती प्रकल्प आकारास आला..Cotton Farming Success: सघन कापूस लागवडीतून आर्थिक सक्षमतेकडे.सोलापूर जिल्ह्यात राबल्या जाणाऱ्या या प्रकल्पात ११ तालुक्यांतील निवडक २० तरुणांमध्ये (१२ महिला व ८ पुरुष) नकुशाताईंची निवड झाली. वयाने ३५ च्या आत आणि किमान १२ वी उत्तीर्ण धाडसी महिलांची निवड त्या अंतर्गत करण्यात येते. संस्थेच्या शाश्वत शेती विकास मिशनचे मुख्य सल्लागार डॉ. सतीश करंडे यांचे मार्गदर्शन यात लाभते. नकुशाताई चार वर्षांपासून प्रकल्पात सक्रिय आहेत. निसर्गपूरक शेती, शेतीतील शाश्वत उपाय आणि अन्न स्वावलंबन ही या प्रकल्पाची वैशिष्ट्ये आहेत. त्यातील शास्त्र नकुशाताईंनी समजून घेत त्याचा अवलंब केला..शेतीला बनविले प्रयोगशाळानकुशाताईंनी आपल्या शेतीला प्रयोगशाळा बनवली आहे. विविध प्रयोग राबवत शास्त्रज्ञ शेतकरी अशी ओळख निर्माण केली आहे. माहिती, ज्ञान आणि अनुभव यांच्या जोरावर स्वावलंबी, शाश्वत शेती साकारली आहे. पिकांच्या फेरपालटीसह सापळा पिके, मित्र कीटकांना आकर्षित करणाऱ्या पिकांची लागवड करून त्यांनी नैसर्गिक कीड नियंत्रणाचे मॉडेल उभे केले आहे. .पीक संरक्षणात पक्षिथांबे, चिकट- कामगंध सापळ्यांचा कल्पक वापर करण्यासह निंबोळी अर्क व दशपर्णी अर्काची फवारणी त्या करतात. त्यातून उत्पादन खर्च कमी केला आहे. केवळ नगदी पिकांवर अवलंबून न राहता आंतरपिके आणि मिश्र पिकांची पद्धती अवलंबिली आहे. अन्न स्वावलंबनासह बाजारपेठ विक्री व्यवस्थेकडेही त्यांनी लक्ष दिले आहे..उंचावली सामाजिक प्रतिष्ठाप्रकल्पातील कामांमधून नकुशाताईंचा आर्थिक फायदा झालाच. शिवाय आत्मविश्वास दुणावला आहे. अन्य महिलांसोबतच्या गटचर्चा, शिवार फेऱ्या, मान्यवरांच्या भेटी यामुळे त्यांना समाजात वेगळी प्रतिष्ठा प्राप्त झाली. नोकरी मिळाली नाही म्हणून मी खचले नाही. तर शेतीलाच माझे करिअर बनवले असे त्या अभिमानाने सांगतात. नकुशाताईंच्या कार्यातून शिंदे कुटुंबाचा चेहरादेखील बदलला आहे. हवामान बदल, बाजारभावांतील घसरण आदी समस्यांमुळे द्राक्ष, डाळिंब किंवा एकूण शेतीच बेभरवशाची झाली आहे. .अशावेळी कुटुंबातील महिलांनी पुढाकार घेऊन कुटुंबाला दिलेला आर्थिक आधार अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. मजुरांवरील खर्च कमी करून स्वतः कष्ट करण्यावर त्यांचा भर असतो. आज शिंदे कुटुंबाचं नाव पंचक्रोशीत आदराने घेतले जाते. एकदिलानं राहणाऱ्या सुनांची प्रसंशा ऐकून सासूबाईंनाही भारी कौतुक वाटते. सासूबाईंनी आम्हाला केवळ कष्ट करायला शिकवले नाहीत. तर कष्टांचा आदर करायलाही शिकवले असं नकुशाताई अभिमानाने सांगतात.नकुशा शिंदे ९८८१०१५०७६.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.