Silk Farming Success Story : अलीकडील काळात शेती जोखमीची झाल्याने विविध व्यवसायांची जोड शेतकऱ्यांनी दिली आहे. त्यातही रेशीम शेतीचा विस्तार राज्यातील विविध भागांत चांगल्या प्रकारे झाला आहे. रेशीम विभागाकडून अनुदान मिळत असल्याने शेतकऱ्यांची सोय झाली आहे. काही शेतकरी स्वतंत्र चॉकीनिर्मितीत गुंतले असून त्यातून रोजगारनिर्मितीची वाट त्यांनी शोधली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बहुतांश भागाला शाश्वत पाणी उपलब्ध नाही. .जिरायती, दुष्काळी तालुका अशीच त्याची ओळख आहे. विहिरी, विंधन विहिरी आदी शक्य त्या उपलब्ध जलस्रोतांमधून शेतकरी सिंचनाचा आधार शोधत आहेत. तालुक्यातील वरुर येथील आदिनाथ व योगिनाथ या वावरे बंधूंची वडिलोपार्जित १२ एकर शेती आहे. आदिनाथ खासगी संस्थेत शिक्षक आहेत. तर पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या योगिनाथ यांच्यावर शेतीची संपूर्ण जबाबदारी आहे. पुरेसे पाणी नसल्याने उपलब्ध स्रोतांवरच कापूस, तूर, कांदा, ज्वारी, गहू, कापूस आदी पिके ते घेत. मात्र त्यातून शेती शाश्वत होत नव्हती. परिणामी, पूरक व्यवसायाचा आधार शोधण्यास सुरुवात केली. कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळवून देऊ शकणारा व्यवसाय म्हणून रेशीम कीटक संगोपनाची निवड केली..Silk Farming : रेशीम उद्योगाने वाचविली तोट्यातील शेती .‘एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ’सन २०१७ ची गोष्ट. योगिनाथ व गाव परिसरातील सुमारे २० शेतकरी मित्र एकत्र आले. ‘एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ’ या तत्त्वानुसार त्यांनी रेशीम शेतीला सुरवात केली. बाभळेश्वर (ता. राहाता) येथील कृषी विज्ञान केंद्रात दहा दिवसांचे प्रशिक्षण घेतले. जिल्हा व राज्यातील विविध भागांत जाऊन रेशीम उत्पादकांकडून माहिती घेतली. सुमारे १७ जण रेशीम उत्पादन घेत आहेत. योगिनाथ यांच्यासह विजय बबन शिंदे, संजय सोनटक्के, संजय सुभाष खांबट, तुषार राजेंद्र शिंदे, नितीन मधुकर वावरे यांच्यासह नव्याने योगेश दिलीप मोरे, नवनाथ विष्णू रेवडकर, तुषार राजेंद्र मोरे आदींचा या रेशीम शेतीत समावेश आहे. आठ वर्षांपूर्वी या मित्रांनी ‘आत्मा’चे तालुका समन्वयक सुनील मस्के यांच्या पुढाकाराने पांडुरंग रेशीम उत्पादक गट स्थापन केला आहे. तालुका कृषी अधिकारी अंकुश जोगदंड यांचेही सहकार्य लाभले आहे..मागे वळून पाहिले नाहीयोगिनाथ यांनी पहिल्या प्रयत्नात चांगले कोष उत्पादन घेऊन प्रति किलो ३५० रुपये दर मिळवला. त्यातून आत्मविश्वास व हुरूप वाढला. त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. व्यवसायातील सर्व बारकावे, तंत्र अवगत केले. अनुभव महत्त्वाचा ठरला. शिवाय आई सुशीलाबाई, पत्नी अलका, मुलगी प्रतिमा, मुलगा प्रवीण अशा कुटुंबातील सर्व सदस्यांचीही मोठी मदत मिळाली. त्यामुळेच श्रमांची विभागणी होऊन ते हलके झाले. मजुरांवरील अवलंबित्व कमी झाले आहे. केवळ कोषनिर्मितीच्या शेवटच्या टप्प्यांत मजुरांची मदत घेतली जाते. सुरुवातीचे एक एकर तुतीचे क्षेत्र आज तीन एकरांपर्यंत वाढवले आहे. अंडीपुंज हे जिल्हा रेशीम कार्यालयाकडून मिळतात. पन्नास बाय २५ फूट आकाराचे शेड आहे. त्यासाठी रेशीम विभागाकडून सुमारे एक लाख १० हजारांचे अनुदान मिळाले आहे. योगिनाथ चॉकी कीटक स्वतः तयार करतात. रेशीम कीटकांचे संगोपन करताना चंद्रिका जाळ्या, ट्रे, अन्य साहित्य निर्जंतुक केले जाते. तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी शेडमध्ये मायक्रो स्पिंकलर्स बसवले आहेत. शेडमध्ये खेळती हवा, स्वच्छता चांगल्या प्रकारे ठेवली असून, पाल्याची गुणवत्ताही टिकवली आहे. तुतीला दरवर्षी शेणखत व कोंबडीखत आलटून पालटून देण्यात येते. त्यातून पाल्याचा दर्जा सुधारण्यास मदत झाली आहे. तुतीच्या शेतात पहिल्या वर्षी कांदा, उडीद यांसारख्या आंतरपिकांचा प्रयोग यशस्वी केला आहे..Silk Farming: रेशीम शेतीसाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे: कोल्हे.उत्पादन, बाजारपेठ व दरविहीर व बोअर यांच्या आधारे पाण्याच्या उपलब्धतेनुसार वर्षभरात पाच ते सहा बॅचेस घेण्यात येतात. प्रत्येक बॅच सुमारे २०० अंडीपुंजांची असते. त्यातून १६० ते १८० किलो किंवा प्रति १०० अंडीपुंजांपासून ८० किलोच्या आसपास रेशीम कोष उत्पादन मिळते. प्रति बॅच सुमारे १५ हजार रुपये खर्च येतो. अलीकडील काळात रेशीम उत्पादकांना बंगळूर- रामनगरसह राज्यातच बीड, जालना, बारामती येथील बाजारपेठांही उपलब्ध झाल्या आहेत. योगिनाथ यांनी यापैकी सर्व बाजारपेठांना कोषविक्री केली आहे. बीड येथे व्यापारी जास्त असल्याने सध्या तेथे पसंती दिली आहे. परिसरातील काही शेतकरी मिळून कोष घेऊन जात असल्याने वाहतूक खर्चाचा भार हलका झाला आहे. अलीकडील चार- पाच वर्षांच्या काळात किलोला ३०० रुपयांपासून ते यंदा ७४० रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. प्रति बॅच सुमारे ५० टक्क्यांपर्यंत नफा मिळवता येत आहे..आर्थिक बळकटी मिळालीरेशीम शेतीने मोठी आर्थिक बळकटी दिली. अन्यथा, जिरायती परिस्थितीमुळे काही जमीन विकण्याची वेळ आली असती असे योगिनाथ सांगतात. या व्यवसायातील उत्पन्नातून दोन्ही मुलांचे शिक्षण केले. मुलीचे लग्न चांगल्या प्रकारे करता आले. मुलगा सध्या पुणे येथे शिक्षण घेत आहे. याच व्यवसायातून बोअर, पाइपलाइनही उभारली. प्रत्येक बॅचमधून ताजे उत्पन्न मिळत असल्याने शेतीचे आर्थिक नियोजन करणे शक्य झाले. कापसाचे एकरी ते ८ ते १० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. योगिनाथ आता केवळ यशस्वी रेशीम उत्पादक राहिलेले नाहीत तर नव्या रेशीम उत्पादकांचे मार्गदर्शकही झाले आहेत.योगिनाथ वावरे ९५४५५८०९८३.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.