Sustainable Dairy Farming : दूध, तूप आदी प्रक्रिया, मूल्यवर्धन तसेच जमिनीच्या सुपीकतेसाठी शेण-मूत्र यांचा वापर आदी कारणांसाठी देशी गाईंचे महत्त्व वाढले आहे. पुणे येथील कृषी महाविद्यालयात पशुसंवर्धन-दुग्धशास्त्र विभाग कार्यरत आहे. त्या अंतर्गत देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहे. केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांच्या मार्गदर्शनातून १२ डिसेंबर, २०१५ मध्ये सहिवाल या देशी गोवंशावर आधारित ‘सहिवाल क्लब ऑफ महाराष्ट्र’ ची स्थापना झाली. पाहता पाहता दहा वर्षांच्या काळात क्लबच्या एवढ्याशा रोपट्याचे आज वृक्षात रूपांतर झाले आहे. .क्लबचा विस्तारडॉ. माने सांगतात की २०१५ मध्ये आम्ही नऊ कृषी पदवीधर एकत्र आलो. प्रत्येकाने दोन सहिवाल गायींचे पालन करायचे असे उद्दिष्ट ठेवले. त्या काळात आम्ही कर्नाल (हरियाना) येथील ‘एनडीआरआय’ या संस्थेला भेट देण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी संस्थेने सहिवाल या देशी गायीच्या ब्रीडचे महत्त्व विषद केले. तिच्या पालनासाठी प्रोत्साहित करून मार्गदर्शनही केले. त्यानुसार आम्ही या गायी आणून संगोपन सुरू केले. हळूहळू राज्यभरातील शेतकरी आम्हाला जोडले जाऊ लागले. आजमितीला साडेतीनशेहून अधिक शेतकरी क्लबचे सदस्य झाले आहेत. त्यातून पाचहजारांहून अधिक सहिवाल गायचे संवर्धन व संगोपन केले जात आहे. क्लबमध्ये पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक तर नगर, नाशिक, सातारा, सोलापूर, बीड, नागपूर आदी भागातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. निमगाव केतकी (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील संतोष राऊत हे प्रगतिशील शेतकरी आणि दुग्धोत्पादक क्लबचे अध्यक्ष आहेत..Desi Cow : शेती, आरोग्यासाठी देशी गोवंश संवर्धनावर लक्ष द्या.सहिवाल गाईची वैशिष्ट्येदेशातील सर्वात जास्त दूध देणारी गाय.२७ देशांमध्ये प्रसार.शून्य अंश से. ते ५० अंश से. तापमानापर्यंत तगून राहण्याची क्षमता.चारा कमी लागतो. स्वभाव शांत आहे..असे चालते क्लबचे कामकाजडॉ. सोमनाथ माने सांगतात की क्लबच्या माध्यमातून सर्व दुग्धोत्पादक वर्षातून एकवेळेस कार्यक्रम घेतो. यामध्ये गाईंचे उत्कृष्ट संगोपन व संवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान केला जातो. त्याशिवाय बायोगॅस, भ्रूण प्रत्यारोपण, प्रक्रिया, प्रशिक्षण आदी विषयांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचाही सत्कार केला जातो. क्लबचा व्हॉटस ॲप ग्रुप आहे. त्या माध्यमातून अडचणी सोडवण्यात येतात. पुण्यातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रात सहिवालसह अन्य देशी ब्रीडच्या वळूंचे उच्च दर्जाचे सिमेन उपलब्ध केले आहे. त्यातून जातिवंत गायी क्लबच्या माध्यमातून तयार करणे शक्य झाले आहे. क्लबमध्ये कृषी पदवीधर, उच्चशिक्षित, प्रगतिशील शेतकऱ्यांचा समावेश आहे. शेतकऱ्याच्या सहभागातून संशोधन ही संकल्पना गो संशोधन केंद्राच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. चारा, आहार, गोठा व्यवस्थापन, दुग्धजन्य प्रक्रिया. शेण गोमूत्र प्रक्रिया आदींबाबतही शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन केले जाते..शेतकऱ्यांनी केले मूल्यवर्धनक्लब अंतर्गत सहिवाल गाई प्रति दिन सरासरी आठ ते दहा लिटर तर काही गाई १८ लिटरपर्यंत दूधक्षमतेच्या आहेत. अनेक सदस्य दूधविक्रीबरोबर तूप निर्मितीवर भर देतात. दुधाची विक्री ७० ते १०० रुपये प्रति लिटर तर तुपाची विक्री २७०० ते ३३०० रुपये प्रति किलो दराने करतात. काही सदस्यांनी देशी गोपालन प्रशिक्षण वर्ग सुरू केले आहेत. प्रातिनिधीक उदाहरणे द्यायची तर क्लबचे सदस्य सचिन ताम्हाणे (आसू. ता. फलटण, जि. सातारा) यांनी ऑनलाइन पद्धतीने तुपाची बाजारपेठ मिळवली आहे. तर नातेपुते (जि. सोलापूर) येथील संतोष निकम यांनी दुधासह तुपाला बाजारपेठ मिळवली आहे. गावातील शेतकऱ्यांना त्यांनी सहिवाल गोपालनासाठी प्रवृत्त केले आहे. काही प्रगतिशील शेतकऱ्यांनी भ्रूण प्रत्यारोपित तंत्रज्ञानावर आधारित फिरती प्रयोगशाळा सुरू केली आहे..Desi Cow Conservation : सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये देशी गोवंश पालनास महत्त्व.संशोधन केंद्रात ११ जातींचे संगोपनडॉ. माने म्हणाले की भारतात देशी गायींच्या सुमारे ५३ ब्रीडस पाहण्यास मिळतात. पैकी ११ ब्रीडचे संगोपन आमच्या केंद्रात सुरू आहे. दुधासाठी प्रसिद्ध सहिवाल, गीर, राठी थारपारकर व लाल सिंधी या पाच जातींचा त्यात समावेश आहे. तर उर्वरित गाईंमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील खिलार, कोकणातील कोकण कपिला, अकोले. नाशिक भागातील डांगी, मराठवाड्यातील लाल कंधारी, देवणी व विदर्भातील गवळाऊ आदींचा समावेश आहे. राज्यातील वातावरणात त्यांची दूध उत्पादनक्षमता, पुनरुत्पादन, चारा, आजारपण आदी विविध अंगाने येथे अभ्यास सुरू आहे. आता आंध्र प्रदेशातील सर्वात छोट्या आकाराची पुंगुनुर हे ब्रीड देखील अभ्यासासाठी येथे आणले आहे..पर्यावरण नियंत्रित गोठ्याची निर्मितीकेंद्राने फुले प्रशांत पर्यावरण नियंत्रित गोठ्याची निर्मिती केली आहे. पावसाळ्यात त्याचे शेड बंद होते. तर पावसाळा संपल्यानंतर ते उघडता येते. केंद्राने येथे गो पर्यटन केंद्रही सुरू केले आहे. शहरी नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांमध्ये देशी गाईबाबत जागरूकता, महत्त्व यांचा प्रसार करणे हा त्यामागील उद्देश ठेवला आहे. याशिवाय यांत्रिकीकरण, मुरघास उत्पादन, बायोगॅस उत्पादन, जैविक खते आदी उत्पादन प्रात्यक्षिकेही येथे सादर केली आहेत. विविध चारापिकांच्या वाणांचीही लागवड आहे. केंद्रास आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पातळीवरील व्यक्तींनी भेटी दिल्या आहेत. केंद्राच्या माध्यमातून एक दिवसीय, एक महिन्याचे प्रशिक्षण उपलब्ध आहे..सहिवाल क्लबच्या माध्यमातून मी गाईंचे संवर्धन करतो आहे. सात- आठ वर्षापासून शहराच्या आसपास चारा उपलब्ध करून जातिवंत गाई व वळू तयार करणे यासाठी प्रयत्नशील आहोत. देशी तुपाला शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. त्या दृष्टीने देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे मार्गदर्शन घेत असतो.संजय बालवडकर- ९८९०११९०६१ नंदिनी गोशाळा, बालेवाडी, पुणेडॉ सोमनाथ माने- ९८८१७२१०२२ (प्रमुख शास्त्रज्ञ, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र पुणे) ९८८१७२१०२२संतोष राऊत ९८६००६४४४४ (अध्यक्ष, सहिवाल क्लब ऑफ महाराष्ट्र).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.