Agriculture Success Story : कामेरीच्या विमल हिंदुराव पाटील घेतात एकरी ९० टन ऊस उत्पादन

कामेरी (ता.वाळवा, जि.सांगली) येथील श्रीमती विमल हिंदूराव पाटील यांनी नवे तंत्रज्ञान समजाऊन घेत शेतीला नवी दिशा दिली. उपलब्ध लागवड क्षेत्रात त्यांनी ऊस पिकासह सोयाबीन, भुईमूग आणि हरभरा लागवडीचे चांगले नियोजन केले आहे.
Women Empowerment
Women EmpowermentAgrowon
Published on
Updated on

Agriculture success story : पुणे-बेंगलूरू राष्ट्रीय महामार्गालगत वसलेल्या वाळवा तालुक्यातील कामेरी गावशिवारात पाण्याची चांगली उपलब्धता असल्याने वर्षभर विविध पिकांची लागवड (Crop Cultivation) पाहायला मिळते. विशेषतः ऊस, (Sugarcane) सोयाबीन (Soybean),भाजीपाला (Vegetable), भुईमूग ही या पट्यातील महत्त्वाची पिके आहेत.

या कामेरी गावातील प्रयोगशील महिला शेतकरी म्हणजे श्रीमती विमल हिंदुराव पाटील. पहिल्यापासून शेती हाच कुटुंबाचा मुख्य व्यवसाय आहे. १९८३ मध्ये विमल यांचे हिंदूराव पाटील यांच्याशी लग्न झाले. विमल यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले.

मुळातच माहेर आणि सासरी शेती असल्याने त्यांना पहिल्यापासून विविध पीक पद्धती आणि पूरक उद्योगांची आवड होती. हिंदूराव हे प्रगतशील शेतकरी होते. त्याचबरोबर गावातील प्रतिष्ठित नागरिकही. हिंदूराव हे गावातील सगळ्यांना मदतीचा हात द्यायचे.

सन १९८५ च्या दरम्यान पाटील यांनी पोल्ट्री व्यवसाय सुरु केला. सुरवातीला एक हजार लेअर कोंबड्यांचे शेड उभारले. टप्याटप्याने पोल्ट्री व्यवसायाचा विस्तार केला. या व्यवसायाचे नियोजन विमलताई पाहत होत्या. परिसरातच अंड्याची विक्री केली जायची.

यातून कुटुंबाची आर्थिक प्रगती झाली. नवीन शेत जमिनीची खरेदी केली. सारं काही सुरळीत सुरु असताना हिंदूरावांचे २००२ मध्ये आकस्मित निधन झाले.

परंतु प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत विमलताईंनी मुलगा विक्रम आणि मुलगी हर्षला यांचे भविष्य घडविण्यासाठी मोठ्या उमेदीने अठरा वर्षे शेती आणि पोल्ट्री उद्योगाचा व्याप वाढवला. सध्या विमलताई पूर्णवेळ दहा एकर शेती व्यवस्थापनाकडे लक्ष देत आहेत.

Women Empowerment
Soybean Market : देशातील सोयाबीन बाजार दबावात का आला?

नवीन तंत्रज्ञानाची मिळाली साथ

शेती व्यवस्थापनाबाबत विमलताई म्हणाल्या की, मला शेती कामांचा अनुभव होता. पण तो पुरेसा नव्हता. त्यासाठी नवीन शेती तंत्रज्ञानाची जोड महत्त्वाची होती.

नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी त्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, ऊस संशोधन केंद्र,पाडेगाव तसेच डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे भेटी देऊन शेतीमधील नवीन तंत्रज्ञान समजावून घेतले.

पीक लागवड, उत्पादनवाढीसाठी प्रयोगशील शेतकरी, कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेतला. उत्पादनवाढीसाठी ऊस शेतीतील बारकावे लक्षात घेतले. त्यानुसार स्वतःच्या शेतीमधील पीक लागवड आणि व्यवस्थापनाचे नियोजन करण्यास सुरवात केली.

याचबरोबरीने ॲग्रोवनच्या त्या पहिल्यापासून वाचक आहेत. ॲग्रोवनमधील तांत्रिक लेख, यशोगाथांमधील शेतकऱ्यांच्या प्रयोगांचा त्यांना चांगला उपयोग झाला आहे.

बेणे दर्जेदार असेल तरच उसाचे अपेक्षित उत्पादन हाती येते. हे लक्षात घेऊन विमलताईंनी पाच गुंठे क्षेत्रामध्ये को- ८६०३२ जातीचा बेणे प्लॉट तयार केला. यासाठी पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्रातून ऊस बेणे आणले. लागवडीचे योग्य व्यवस्थापन केले.

ऊस अकरा महिन्याचा झाल्यावर त्याचा बेणे म्हणून वापर केला. लागवडीपासून योग्य व्यवस्थापन, शिफारशीनुसार खत,पाणी नियोजनातून त्यांनी ऊस उत्पादनाचा एकरी सरासरी ९० टनांचा टप्पा गाठला आहे.

असे आहे शेती व्यवस्थापन

* जमीन सुपीकतेसाठी पाचट कुट्टीचा वापर.

* आडसाली, पूर्वहंगामी लागवडीसाठी को-८६०३२ जातीची निवड.

* उसासाठी चार फुटाची सरी. एक किंवा दोन डोळा पद्धतीने लागवड.

* माती परिक्षणानुसार ६० टक्के सेंद्रिय खत, ४० टक्के रासायनिक खतांचा वापर.

* उसाच्या एका बेटात १२ ते १५ फुटवे संख्या.

* फुटव्यांची संख्या नेमकी ठेवल्याने उसाची जाडी, कांड्याची रुंदीची अपेक्षित वाढ.

* आडसाली उसाचे एकरी सरासरी ८० ते ९० टन उत्पादनात सातत्य.

* पीक फेरपालटीवर भर.

* सोयाबीन जेएस ३३५, केडीएस ७२६ या जातींची निवड. सोयाबीन, भुईमूग, हरभऱ्यास बीजप्रक्रिया.

* एकात्मिक कीड व्यवस्थापनावर भर. तुषार आणि ठिबक सिंचनाचा वापर.

* शेतीमध्ये शिवारफेरी, कृषी तंत्रज्ञान प्रशिक्षणाचे आयोजन.

शेती तंत्रज्ञानाचा महिला गटांमध्ये प्रसार...

ज्ञानाचा एकट्यासाठी वापर केला तर आपणच ज्ञानाने परिपूर्ण होतो. जर ज्ञान इतरांना दिले तर आपला अभ्यास वृद्धींगत होतो. हे धोरण ठरवून विमलताईंनी गावातील सहा महिला बचत गटातील सत्तर महिलांना एकत्र आणले.

'या महिलांना शेती आणि पूरक उद्योगाच्या विकासासाठी प्रशिक्षण देण्याची सोय केली. शेतीशाळा, आत्मा योजनेअंतर्गत विविध शेती, पूरक योजनांची माहिती बचत गटांतील सदस्यांच्यापर्यंत पोहोचविण्यास सुरवात केली आहे.

या प्रयत्नामुळे शेती विकास आणि नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यामध्ये महिलांचा सहभाग वाढीस लागला आहे. याचबरोबरीने विमलताई गावातील विविध समाजकार्यात तसेच ग्रामपंचायतीच्या उपक्रमात सहभागी असतात.

यंदाच्या वर्षी त्यांनी गावामध्ये विधवा महिला प्रथा बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये ठराव मांडला होता. हा ठराव ग्रामपंचायतीने मंजूर केला आहे. विमलताईंचे शेती विकासातील कार्य लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनातर्फे जिजामाता कृषिभूषण पुरस्काराने (२००९-१०) सन्मानित करण्यात आले.

Women Empowerment
Surat-Chennai Highway : सुरत-चेन्नई महामार्ग भूसंपादन प्रश्‍नावर मंगळवारी मुंबईत बैठक

विक्रम झाला पैलवान....

मुलगा विक्रम हा पैलवान झाला पाहिजे अशी हिंदूराव पाटील यांची पहिल्यापासून इच्छा होती. ती इच्छा विमलताईंनी पूर्ण केली. विक्रम याने राजारामबापू कुस्ती केंद्र तसेच कोल्हापूर येथील मोतीबाग तालमीत कुस्तीचा सराव केला.

२००४ मध्ये जपान येथे झालेल्या आशियायी कुस्ती स्पर्धेत त्याने कांस्य पदक पटकावले. याचबरोबरीने ‘क्रांती केसरी‘ गदा मिळविली. तसेच कामगार केसरी तसेच खाशाबा जाधव आशियायी कुस्ती स्पर्धेत विक्रम उपविजेता ठरला. विक्रम सध्या शेती सोबत व्यवसाय सांभाळत आहे.

संपर्क : श्रीमती विमल हिंदुराव पाटील, ७०५८७७२०५२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com