
Agriculture Success Story : सध्याच्या काळात प्रचलित कृषी विस्तार यंत्रणा तोकडी पडत असताना कृषी विद्यापीठ तसेच राष्ट्रीय स्तरावरील कृषी संशोधन संस्थांनी विकसित केलेले तंत्रज्ञान, पिकांचे वाण, पीक व्यवस्थापन शिफारशींचा प्रसार शेतकऱ्यांमध्ये करणे तसेच त्यातील त्रुटींच्या तपासणीसाठी कृषी विज्ञान केंद्रांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे. माजी खासदार (कै.)अशोकराव देशमुख यांच्या पुढाकारातून जीवन ज्योत चॅरिटेबल ट्रस्टतर्फे परभणी येथील जिंतूर रस्त्यावर १९९४ मध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत कृषी विज्ञान केंद्र स्थापन करण्यात आले.
सध्या ट्रस्टच्या अध्यक्षा लक्ष्मीताई देशमुख, सचिव रविराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी तंत्रज्ञान प्रसाराचे कार्य सुरु आहे. परभणी जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या या कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख म्हणून डॉ.प्रशांत भोसले कार्यरत आहेत. कृषी विज्ञान केंद्राच्या विषय विशेषज्ञांमध्ये अमित तुपे (उद्यानविद्या), डॉ.अरुणा खरवडे (गृहविज्ञान), डॉ.अमोल काकडे (पीक संरक्षण),सवाईसिंग निठारवाल (पीकशास्त्र), इम्रानखान आगाई (पशुविज्ञान), सी.आर.देशमुख (मृदापरिक्षण अधिकारी), एन.के.गाढवे (प्रक्षेत्र अधिकारी) आदींचा समावेश आहे.
कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर शेडनेट हाऊस,पॉलिहाऊस फळ रोपवाटिका, पीक संग्रहालय, किचन गार्डन मॉडेल, माती व पाणी परिक्षण प्रयोगशाळा, जैविक निविष्ठा निर्मिती केंद्र, गांडूळ खत निर्मिती प्रकल्प, दुग्धव्यवसाय, गावरान कुक्कुटपालन प्रकल्प, शेतमाल प्रक्रिया केंद्र तसेच सुसज्ज प्रशिक्षण सभागृह आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे मुक्त कृषी शिक्षण केंद्र येथे कार्यरत आहे. कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी पदविका अभ्यासक्रम आहे. आद्य रेषीय प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून विविध पिकांचे नवीन वाण, लागवड तंत्रज्ञान प्रशिक्षण, प्रक्षेत्र दिन, कृषी तंत्रज्ञान सप्ताहात परिसंवाद, शिवार फेरी, प्रदर्शन उपक्रम राबविले जातात.
पथदर्शी पीक प्रात्यक्षिके :
परभणीसह राज्यातील कृषी विद्यापीठांनी विकसित केलेले सोयाबीन, तूर, हरभरा, गहू,ज्वारी,भुईमूग आदी पिकांच्या दहा वर्षांच्या आतील नवीन वाणांची आद्य रेषीय प्रात्यक्षिके दत्तक तसेच निवडक गावातील शेतकऱ्यांच्या शेतावर घेतली जातात. प्रात्यक्षिक क्षेत्रावर विशेषज्ञ भेटी देऊन शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापन सल्ला देतात.
शेतीपूरक व्यवसाय प्रशिक्षण :
बीजोत्पादन, गळीतधान्ये, कडधान्ये उत्पादकता वाढ तंत्र, पूरक, प्रक्रिया उद्योग, शेतीमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर, कृषी यांत्रिकीकरण, एकात्मिक कीड व्यवस्थापन, पाणी,खत व्यवस्थापन यासह शेळीपालन, कुक्कुटपालन, रेशीम शेती, दुग्धव्यवसाय,गांडूळ खत निर्मिती, पशुधनाचे आरोग्य व्यवस्थापन आदी शेतीपूरक व्यवसाय प्रशिक्षणांचे आयोजन केले जाते.
प्रात्यक्षिकांसाठी प्रक्षेत्रावर ५० उस्मानाबादी शेळ्यांचा फार्म आहे. गावरान कोंबडी पालन युनिट आहे. गोठ्यामध्ये आठ मुऱ्हा म्हशी, दोन गायी आहेत. सध्या पाच म्हशीचे प्रतिदिन ५० लिटर दूध मिळते. प्रतिलिटर ७० रुपये दराने विक्री होते. याचबरोबरीने गावरान अंडी तसेच बोकड विक्रीतून उत्पन्न मिळते.
प्रक्षेत्रावर आठ चारा पिकांच्या सुधारित वाणांची लागवड करण्यात आली आहे. प्रशिक्षणात सहभागी शेतकऱ्यांनी विविध शेतीपूरक व्यवसाय सुरु केले आहेत. पर्यायी उत्पन्नाचे स्रोत मिळाले आहेत.
फळे, भाजीपाला रोपवाटिका :
प्रक्षेत्रावर पॉलीहाऊसमध्ये आंबा, पेरू, चिकू, लिंबू आदी फळपिकांच्या दर्जेदार कलमांची निर्मिती केली जाते. तसेच हंगामी भाजीपाल्यामध्ये मिरची, टोमॅटो, वांगी आदी रोपे तयार करुन विक्री होते. दरवर्षी सरासरी पाच लाख रुपयांपर्यंत कलमे,रोपांची विक्री होते. विविध पिकांच्या सुधारित, संकरित वाणांचे पीक संग्रहालय खरीप व रब्बी हंगामात येथे पाहण्यास मिळते. एकात्मिक पीक पद्धती तसेच पोषणमूल्य युक्त किचन गार्डन मॉडेल येथे उपलब्ध आहे.
माती,पाणी परिक्षण प्रयोगशाळा :
प्रक्षेत्रावर २००५ पासून सुसज्ज माती व पाणी परिक्षण प्रयोगशाळा कार्यरत आहे. माती नमुन्यातील नत्र, स्फुरद, पालाश,जमिनीचा सामू, क्षारवाहकता, सेंद्रिय कर्बाची उपलब्धता यांची तपासणी करुन दिली जाते. खतांच्या संतुलित वापरासाठी माती परीक्षणानंतर जमीन आरोग्य पत्रिका दिली जाते. या प्रयोगशाळेत दरवर्षी सुमारे १५ हजार माती नमुन्यांची तपासणी होते.
जैविक खत उत्पादन प्रकल्प :
केंद्र सरकारच्या मदतीतून प्रक्षेत्रावर जैविक खत निर्मिती प्रकल्प कार्यरत आहे. याठिकाणी रायझोबियम, अॅझेटोबॅक्टर,पीएसबी ही जैविक खते तयार करुन शेतकऱ्यांना योग्य दरात उपलब्ध करुन दिली जातात. ट्रायकोडर्मा व्हिरिडी, ट्रायकोकार्डची निर्मिती आणि विक्री केली जाते. प्रक्षेत्रावर अॅझोला निर्मिती युनिट आहे.
संरक्षित शेतीचा प्रसार :
मंगरुळ (ता.मानवत), मांडाखळी (ता.परभणी), गौडगाव (ता.गंगाखेड) या गावांमध्ये संरक्षित शेतीचा प्रसार केला जात आहे. शेडनेट,पॉलिहाऊसची उभारणी करुन शेतकरी जरबेरा, गुलाब, ढोबळी मिरची, काकडी आदी भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहेत.
निर्यातक्षम भाजीपाला उत्पादन तंत्र :
कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सिरपूर (ता.पालम) येथील शेतकऱ्यांनी भेंडीची निर्यात केली. यंदा परभणी, सेलू, मानवत,पाथरी, पालम आदी तालुक्यातील शेतकऱ्यांना निर्यातक्षम मिरची उत्पादन तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली जात आहे. या प्रकल्पातील काही शेतकऱ्यांनी मिरचीची निर्यात सुरु केली आहे.
भाडेतत्त्वावरील अवजारे बँक :
कृषी विज्ञान केंद्राची अवजार बँक आहे. नांगर, पेरणी यंत्र, रोटाव्हेटर, श्रेडर आदी अवजारे शेतकऱ्यांना भाडेतत्वावर दिली जातात. रुंद वरंबा सरी, गादी वाफ्यावर टोकण यंत्राव्दारे लागवड तंत्रज्ञानाचा प्रसार केला जातो.
महिला सक्षमीकरण :
स्वयंसहाय्यता गट, शेतकरी महिलांना डाळ निर्मिती, मसाले, लोणची, हळद पावडर, फळे भाजीपाला प्रक्रिया, पोषणमूल्य युक्त भाजीपाला उद्यान (किचन गार्डन) निर्मिती आदी विषयावर प्रशिक्षण दिले जाते. गृह प्रक्रिया उद्योग सुरु करुन जिल्ह्यातील अनेक महिला स्वावलंबी झाल्या आहेत. मांडाखळी येथे मांडव्य ऋषी महिला शेतकरी कंपनीची स्थापना करण्यात आली आहे.
समन्वयातून विस्तार कार्य :
कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, शासकीय, निमशासकीय संस्था, खासगी संस्थांशी समन्वय साधून शेतकऱ्यापर्यंत तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र प्रयत्न करत आहे. किसान मोबाइल सेवा, व्हॉटस अप ग्रुपच्या माध्यमातून कृषी सल्ला पोहचविला जातो. शेती क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर याबाबत दोन हजार शेतकऱ्यांसोबत काम सुरू आहे.
उल्लेखनीय कार्य :
कृषी विज्ञान केंद्राचे पीक संरक्षक विशेषज्ञ डॉ.विजय भामरे यांनी कपाशीवरील पिठ्या ढेकुणाचे प्रभावी नियंत्रण करणारा परभक्षी कीटक शोधून काढला. याची नोंद राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकातून घेण्यात आली. भाजीपाला मॉडेलला आंतरराष्ट्रीय परिषदेत पुरस्कार मिळाला.विस्तार कार्यातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल विभागीय पातळीवरील दोन पुरस्कार मिळाले आहेत. वार्षिक कार्य तसेच तेलबिया उत्पादन वाढ तंत्रज्ञान, प्रसाराबद्दल सन्मान करण्यात आला आहे.
कापूस उत्पादनवाढीसाठी प्रकल्प :
कापसाच्या दर्जेदार उत्पादनासाठी कृषी विज्ञान केंद्रामार्फत उत्तम कापूस निर्मिती प्रकल्प तसेच नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेअंतर्गत विशेष कापूस प्रकल्प राबविला जात आहे. उत्तम कापूस निर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून ६१ गावातील साडेबारा हजारांवर शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचले आहे. विशेष कापूस प्रकल्पाअंतर्गत सघन, अति सघन, दादा लाड कापूस लागवड तंत्रज्ञानाचा प्रसार केला जात आहे. या तंत्रज्ञानातून कापसाच्या उत्पादकतेत ४० टक्यांपर्यंत वाढ झाली आहे.
सेंद्रिय, नैसर्गिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार :
शेती व्यवसायातील खर्च कमी करुन निव्वळ नफा वाढावा यासाठी नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती या संकल्पना शेतकऱ्यांमध्ये रुजविल्या जात आहेत. याअंतर्गत कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर गांडूळ खत निर्मिती प्रकल्प आहे. दर तीन महिन्यांनी १० टन गांडूळ खत निर्मिती होते. याबरोबरीने कृषी विज्ञान केंद्राने दत्तक घेतलेल्या अनेक गावातील शेतकऱ्यांनी गांडूळ खत निर्मिती सुरु केली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आठ गटांनी सेंद्रिय निविष्ठा उत्पादन निर्मिती केंद्र सुरु केले आहे. नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत नैसर्गिक दहा ड्रम थेअरी तसेच सेंद्रिय कर्ब वाढीसाठी बायोचार वापराबाबत प्रचार केला जातो.
कापूस उत्पादनात मिळाली वाढ
प्रक्रिया उद्योगाला सुरवात
तंत्रज्ञानाबाबत जागरूकता
डॉ. प्रशांत भोसले : ९४२१३८६९२९
अमित तुपे : ९८६०३७००००
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.