Water Conservation Village: मिर्झापूर (नेरी) (ता. आर्वी, जि. वर्धा) या पुनर्वसित गावात एकेकाळी स्मशानभूमी नव्हती, टँकरने पाणीपुरवठा व्हायचा. पुनर्वसनानंतर अनेक कुटुंबे भूमिहीन झाली होते. अशा परिस्थितीत सरपंच बाळा सोनटक्के आणि ग्रामस्थांनी सामूहिक इच्छाशक्तीच्या बळावर गावाचा चेहरामोहरा बदलून टाकला. जलसंधारण, स्वच्छता, पर्यावरणपूरक उपक्रम, डिजिटल व्यवहार, सौर ऊर्जा, लोकसहभाग आणि सामाजिक एकोपा यांच्या बळावर गावाने विकासाची उत्तुंग झेप धेतली. मिर्झापूर (नेरी) गाव आज विदर्भातील पहिले ‘सोलर ग्राम’ म्हणून पुढे आले आहे. .वर्धा जिल्ह्यात आर्वी तालुक्यातील मिर्झापूर (नेरी) हे तोही आणि बाकडी या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले गाव पूर्वी संपन्न मानले जायचे. भूजल पातळी चांगली होती. सिंचन व्यवस्था बळकट होती. शेती उत्पादनक्षम होती. शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होते. मात्र निम्न वर्धा प्रकल्पासाठी शासनाने परिसरातील २२ गावांच्या जमिनी अधिग्रहित केल्या. त्यात मिर्झापूर (नेरी) चाही समावेश झाला. सुमारे साडेपाच हजार एकर जमीन संपादित झाली. गावाचे पुनर्वसन आर्वीपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर करण्यात आले. ग्रामस्थांना मोबदला मिळाला. परंतु अनेक कुटुंबीय भूमिहीन झाले. आजही गावातील केवळ तीन ते चार कुटुंबांकडे शेती आहे. उर्वरित कुटुंबे मजुरीवर उदरनिर्वाह करतात..Solar Energy Project: सौर ऊर्जा प्रकल्पामुळे दुर्गम गुहिर गाव उजळणार.बिकट अवस्थेतून शोधला मार्गपुनर्वसनानंतर सुरुवातीच्या काळात गावाची अवस्था अत्यंत बिकट होती. पाणीपुरवठा योजना नसल्याने वर्षभर टँकरने पाणी द्यावे लागायचे. अंत्यसंस्काराची सुविधा नसल्याने चार किलोमीटरवरील आर्वी येथे जावे लागे. सन २००० ते २०१६ या काळात ग्रामपंचायतीवर प्रशासक होता. नेतृत्वाची कमतरता होती. अशा परिस्थितीत २०१६ मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची घोषणा झाली. मात्र अशा या समस्याग्रस्त गावाची पाटिलकी कोण घेणार, असा प्रश्न निर्माण झाला. सात सदस्यीय ग्रामपंचायतीसाठी उमेदवारही मिळत नव्हते. निवडून आल्यानंतर समस्या घेऊन दररोज लोक आपल्या घरी येतील या भीतीने कोणी निवडणूक लढण्यास तयार नव्हते. अशावेळी गावातील बाळा सोनटक्के यांनी पुढाकार घेत गावातील युवकांना एकत्र केले. समस्या घेऊन सदस्यांच्या घरी कोणी जाणार नाही अशी शपथ घेण्यात आली. अन्य अडचणींची जबाबदारी आपण स्वीकारू असा विश्वास त्यांनी दिला. त्यानंतर सात जण तयार झाले आणि निवडणूक अविरोध झाली..लोकसहभागातून बदलाची सुरुवातसरपंचपदाची सूत्रे हाती आल्यानंतर गावाचा विकास केवळ निधीने नव्हे, तर लोकसहभागातूनच शक्य होईल याची जाणीव सोनटक्के यांना होती. त्याच काळात ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धा जाहीर झाली. जलसंधारणाच्या माध्यमातून गावात सामूहिक भावना निर्माण करण्याची ही संधी असल्याचे त्यांनी ओळखले. गावातील पाच- सहा युवकांना सावंगी (ता. वरूड, जि. अमरावती) येथे निवासी प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम घेण्यात आला. या माध्यमातून पहिल्यांदाच गावातील महिला मोठ्या प्रमाणात एकत्र आल्या. .त्यातून संवाद वाढला. सामूहिक कामाची मानसिकता तयार झाली. त्यातूनच महिला आणि पुरुषांच्या सहभागातून गावशिवारात नाले खोलीकरण, पाणी अडवणे, मुरवणे व जलसंधारणाची अन्य कामे झाली. प्रत्येक रविवारी महाश्रमदान आयोजित केले जाई. या वेळी कुणीतरी अल्पोपहाराची व्यवस्था करायचे. गावात अनेक वर्षांनी सामाजिक एकोपा निर्माण होत असल्याचे चित्र दिसू लागले..Solar Schemes: सौर ग्राहकांना तत्पर सेवा द्या: जीवने.‘पाणी फाउंडेशन’ ठरले टर्निंग पॉइंटगावातील श्रमदान आणि जलसंधारण उपक्रमांची माहिती पंचक्रोशीत पसरली. आमदार सुमीत वानखडे यांनी गावाला भेट देत ग्रामस्थांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. ही संधी सोडू नका असा संदेश दिला. गावकऱ्यांना त्यांच्या कष्टांचे फळ मिळाले. पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत गावाला जिल्हास्तरावर दुसऱ्या क्रमांकाचे साडेसात लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. हा महत्त्वाचा ‘टर्निंग पॉइंट होता. इथूनच परिवर्तनाला दिशा मिळाली. .राज्य शासनाच्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात गावाने उत्स्फूर्त सहभाग घेतला. गाव स्वच्छतेसाठी अक्षरशः हजारो हात राबले. फलित म्हणून २०१७-१८ मध्ये जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाचे बक्षीस गावाला मिळाले. सन २०१९ मध्ये स्मार्ट ग्राम योजनेतही जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला. माझी वसुंधरा अभियानातही उल्लेखनीय कामगिरी झाली. सन २०२३ मध्ये राज्यस्तरीय ५० लाख रुपयांचे तर २०२४ मध्ये विभागस्तरीय ५० लाखांचे बक्षीस गावाच्या नावावर झाले..सौर ऊर्जेने उजळले गावगावातील बहुतांश नागरिक शेतमजुरीवर अवलंबून असल्याने वीजबिल भरणे त्यांच्यासाठी मोठे आव्हान होते. थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्यासाठी कर्मचारी वारंवार गावात येत. त्या वेळी ग्रामस्थ सरपंच महोदयांकडे धाव घेत. याच समस्येतून संपूर्ण गाव सौर ऊर्जेवर आणण्याची कल्पना पुढे आली. एक किलोवॉट सौर युनिटसाठी सुमारे ६० हजार रुपये खर्च अपेक्षित होता. शासनाकडून ३० हजारांचे अनुदान मिळणार होते. सुमारे १३२ उंबऱ्यांच्या गावासाठी सुमारे ४० लाख रुपयांची गरज होती. आमदार सुमीत वानखडे यांच्या माध्यमातून ‘सीएसआर’ निधीतून ४० लाख रुपये उपलब्ध झाले. त्यातून गावात सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला. आज प्रत्येक घर सौर ऊर्जेच्या प्रकाशाने उजळले असून ग्रामस्थांचे वीजबिल शून्यावर आले आहे. याच बळावर मिर्झापूर नेरीला विदर्भातील पहिले ‘सोलर ग्राम’ म्हणून ओळख मिळाली..दिल्लीत सहभागी होण्याचा मानगाव विकासात पुढारल्यानंतर राज्यभरातून अनेक ग्रामपंचायतीचे पदाधिकारी गावाला भेट देत आहेत. उपक्रमांचे अनुकरण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सन २०२२ मध्ये ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. या वेळी मात्र अनेकांनी उमेदवारीसाठी दावेदारी केली. परंतु यावेळी ग्रामस्थांनी सरपंच पदासाठी सोनटक्के यांनाच कौल दिला. अवघ्या काही वर्षांतच गावाने इच्छाशक्तीच्या बळावर विदर्भच नव्हे तर राज्य आणि देशात लौकिक मिळविला. त्यामुळेच यंदाच्या दिल्लीतील गणराज्य सोहळ्याच्या परेडमध्ये सहभागी होण्याचा मान सरपंच महाशयांना मिळाला..गावातील सुविधा व विकासकामे‘वॉटर एटीएम’ची सुविधा. दहा रुपयांत मिळते २० लिटर शुद्ध पाणी. गावातील पाणीपुरवठा योजनाही सौर ऊर्जेवर चालते.सीसीटीव्ही यंत्रणा. अंगणवाडी आणि सातवीपर्यंत जिल्हा परिषद शाळा.ग्रामपंचायतीने मिळवले आयएसओ मानांकन. विदर्भात अशा प्रकारचे मानांकन मिळविणाऱ्या मोजक्या ग्रामपंचायतींपैकी मिर्झापूर नेरी एक.१०० टक्के करवसुली करणारे विदर्भातील पहिले गाव म्हणूनही मिळविली ओळख. ग्रामस्थांना कर भरणे सुलभ व्हावे यासाठी २०१९ पासून क्यूआर कोड प्रणाली. ग्रामपंचायत परिसरासह विविध ठिकाणी तसेच कर पावतीवरही क्यूआर कोड..बहुतांश कुटुंबांकडे शेती नसल्याने घरच्या घरी भाजीपाला उपलब्ध व्हावा, पौष्टिक आहार मिळावा यासाठी परसबाग व फळबाग उपक्रम.महिलांचा सन्मान व्हावा या उद्देशाने प्रत्येक घरावर महिलांच्या नावाचा फलक.शोषखड्डे उभारण्यावर भर.शाळा आणि ग्रामपंचायत स्तरावर वाचनालय. त्यातून वाचन संस्कृतीला चालना देण्याचा प्रयत्न.सायंकाळी सात वाजता बुद्ध विहारात वंदना आणि मंदिरात तुकडोजी महाराजांची प्रार्थना एकाच वेळी.बाळा सोनटक्के ७३५०१ ५०६९२.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.