आरती देशमुखRural Women Enterpreneurship: नंदुरबार जिल्ह्यातील समशेरपूर या छोट्या गावातील मयूरी छोटूलाल चौधरी यांनी खाकरा उत्पादनांना असलेली मागणी ओळखून या व्यवसायात स्वावलंबी पाऊल टाकले. उद्योजक वृत्ती, बाजारपेठा ओळखून नावीन्यपूर्ण उत्पादनांची निर्मिती, कृषी विज्ञान केंद्र व महिला बचत गटांची मदत, विक्री कौशल्य आदींच्या आधारे व्यवसायात चांगले पाय रोवले. तीन वर्षांत महिन्याची उलाढाल लाखांपर्यंत पोहोचवत सुमारे पंधरा फ्लेव्हर्समधील मयूरी ब्रॅंड खाकऱ्यांना त्यांनी राज्यासह परराज्यांत बाजारपेठ मिळविली आहे. .नंदूरबार हा आदिवासी बहुल सातपुडा पर्वताचे सान्निध्य लाभलेला जिल्हा आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत येथील शेतकरी शेती, पूरक व्यवसाय व प्रक्रिया उद्योगात गुंतलेली आहेत. जिल्ह्यात समशेरपूर हे छोटे गाव आहे. येथे मयूरी व छोटूलाल हे चौधरी दांपत्य राहते. छोटूलाल यांचा वैद्यकीय व्यवसाय आहे. पूर्वी दांपत्याचे गुजरातमध्ये वास्तव्य होते. सन २००६ मध्ये ते समशेरपूर येथे राहण्यास आले. मयूरी यांनी काही काळ शिवणकाम आणि साड्या विक्रीचे काम केले, परंतु त्यांचे मन त्यात रमले नाही..सन २०१७ मध्ये त्यांनी उमेद अभियानांतर्गत जय अंबे बचत गट स्थापन केला. त्या माध्यमातून अन्नप्रक्रियेला चालना देण्याचा त्यांचा हेतू होता. नंदुरबार जिल्हा गुजरात सीमेवर आहे. त्यामुळे येथे गुजराती खाद्यसंस्कृतीचा प्रभाव आहे. खाकरा हे येथील लोकप्रिय उत्पादन आहे. या राज्यात वास्तव्य केल्याने त्याची मागणी व संधीही माहीत होती. त्यामुळे त्याच्या निर्मिती व्यवसायात उतरण्याचे ठरवले. कष्ट, प्रामाणिकपणा आणि नवकल्पनांच्या जोरावर काहीतरी वेगळं करून दाखविण्याची, स्वतःच्या पायांवर उभे राहून स्वावलंबी होण्याची संधी खुणावत होती..Food Processing: अन्नप्रक्रियेतील आधुनिक तंत्रज्ञान.उद्योगातील वाटचालआत्मविश्वासपूर्वक व धाडसाने व्यवसायात पाऊल टाकले. सुरुवातीला स्वयंपाकघरातच अगदी कमी प्रमाणात खाकरे बनवून गावात, शाळांमध्ये आणि स्थानिक बाजारात विक्री होऊ लागली. स्वच्छ, कुरकुरीत व चविष्ट अशा खाकरांना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळू लागला. त्यामुळे आत्मविश्वास वाढू लागला सरकारी योजनेची मदत घेऊन व्यवसाय वाढविण्याचा निर्णय घेतला त्यानंतर गुजरात येथे जाऊन संबंधित यंत्रेही मयूरी पाहून आल्या. कृषी विभाग अंतर्गत पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेमध्ये अर्ज केला. स्वतःची एक लाख रुपयांची व सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून मिळालेले नऊ लाखांचे कर्ज या बळावर दहा लाखांची गुंतवणूक झाली..त्यातून आटा चक्की व अन्य मिळून चार यंत्रे घेता आली. त्यामुळे उत्पादन निर्मितीचे काम सोपे झाले. वेळेतही बचत होऊ लागली. त्यामुळे येऊ लागलेल्या जास्तीच्या ऑर्डर्स वेळेत पूर्ण करणे शक्य होऊ लागले. नंदूरबार येथील कृषी विज्ञान केंद्रातील विषय विशेषज्ञ (गृहविज्ञान) आरती देशमुख यांचे तांत्रिक मार्गदर्शन मिळाले. प्रदर्शने व परराज्यांतील बाजारपेठा मिळविण्यासाठी मदतही झाली. महिला बचत गटाचेही सहकार्य झाले. अशा रीतीने विविध अडचणींवर मात करून जिद्द, चिकाटी व कल्पकतेने सुरू ठेवलेल्या व्यवसायाला आजमितीला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत..Food Processing Success: प्रक्रिया उद्योगात नाव मिळविलेला रुचिरा ब्रॅंड.उत्पादने पोहोचली परराज्यांतखाकऱ्यासाठीचा कच्चा माल गहू नंदूरबार जिल्ह्यातच उपलब्ध होतो. विविध ग्राहक, लहान मुले यांची आवड, कल लक्षात घेऊन पंधरा प्रकारच्या फ्लेव्हर्समध्ये खाकरांची निर्मिती केली जाते. यात मेथी, जिरे, शेजवान, कुरकुरे आदींचा समावेश आहे. गुणवत्ता, विविध चवी आणि आकर्षक पॅकिंग यावर अधिक लक्ष दिले. त्यातून गाव, तालुका व जिल्हास्तरावरील बाजारपेठांमध्ये मयूरी खाकरा या ब्रॅंडला मयूरी यांनी स्थान मिळवून दिले..त्यापुढे जाऊन मुरबाड, ठाणे, बदलापूर, सरळगाव, पुणे, मुंबई यासह हैदराबाद, कोलकातापर्यंत ही उत्पादने पोहोचली आहेत. केव्हीकेच्या मदतीने विविध प्रदर्शनांमध्ये भाग घेता आल्याने आपला ग्राहकवर्ग तयार करता आला. नंदुरबारमध्ये झालेल्या एका प्रदर्शनात काही तासांमध्ये तब्बल १३ हजार रुपयांच्या खाकरांची विक्री मयूरी यांनी केली. व्यावसायिकांना बी टू बी पद्धतीनेही उत्पादनाची विक्री केली जाते. केव्हीकेच्या सल्ल्यातून उत्पादनातील पोषकद्रव्यांचे परीक्षणही करून घेतले आहे..‘ऑर्डर बुक’ सतत भरलेलेसुरुवातीच्या टप्प्यात दिवसातून केवळ १० किलो खाकरा बनायच्या. आता महिन्याला तीनशे ते चारशे किलोपर्यंत खाकरांचे उत्पादन व विक्री होते. प्रति दोनशे ग्रॅमला ७० रुपये अशी किंमत आहे. महिन्याला एक लाख रुपयांपर्यंत उलाढाल होऊ लागली आहे. गावातील चार महिलांना या व्यवसायाद्वारे रोजगार मिळाला आहे. मयूरी यांचे ‘ऑर्डर बुक’ सतत भरलेले असते. हीच उत्पादनाच्या गुणवत्तेची खात्री झाली आहे. आज अनेक महिलांना या व्यवसायाची प्रेरणा मिळाली आहे घरातून छोट्या प्रमाणात सुरू झालेला व्यवसाय योग्य नियोजनातून कसा भरारी घेऊ शकतो याचे हे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल..केव्हीके घडवतेय उद्योजकनंदूरबार कृषी विज्ञान केंद्रातर्फे (केव्हीके) नवउद्योजकांना विविध प्रकारे मार्गदर्शन केले जाते. यात उद्योगाच्या स्वरूपाप्रमाणे विविध क्षमतेची कोणती यंत्रे खरेदी करावीत हे सांगण्यात येते. पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना मंजूर झाल्यानंतर संबंधित उद्योजकांना प्रशिक्षण घ्यावे लागते. त्यादृष्टीने तीन दिवसांचे प्रशिक्षण देण्यासाठी या केव्हीकेची निवड झाली आहे. याशिवाय उत्पादन निहाय पॅकेजिंगचे प्रकार, विविध परवाने, प्रमाणपत्रे आदींबाबतही येथील तज्ज्ञांकरवी मार्गदर्शन केले जाते..सन्मान लाभलामहिला आर्थिक विकास महामंडळ, नंदुरबार, मॅनेज (हैदराबाद), सावित्रीबाई फुले फाउंडेशन , चेंबर ऑफ कॉमर्स आदी संस्थांतर्फे मयूरी यांचा उद्योजिका म्हणून सन्मान झाला आहे. याच व्यवसायामुळे स्वतःच्या पायावर उभे राहून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होता आले, अशी प्रतिक्रिया मयूरी देतात. विपणनामध्ये त्यांना पती छोटूलाल यांची मोठी मदत मिळते. चौधरी दांपत्याचा मुलगा देवने इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. तर मुलगी कॅनडा येथे उच्चशिक्षण घेत आहे. प्रक्रिया व्यवसायात आर्थिक पत तयार झाल्याने मुलीच्या परदेशी शिक्षणासाठी कर्ज मिळू शकले. तसेच घरानजीक जागा खरेदी करता आली. त्या ठिकाणी आता यांत्रिक सेटअप तयार केला आहे असे मयूरी यांनी सांगितले.मयूरी चौधरी ९६३७४९७४६३आरती देशमुख ९५०३६१२७०२(विषय विशेषज्ञ (गृहविज्ञान), कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.