लातूर जिल्ह्यातील येलोरीवाडी (ता. औसा) येथील मनोज वाल्मीक सर्जे या युवकाने सात वर्षांपूर्वी पॉलिहाउस उभारून जरबेरा फुलशेतीला सुरुवात केली. हवामान, कोरोना, बाजारपेठ आदी अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. परिसरातील काहींना फुलशेती बंद करावी लागली. परंतु न डगमगता खंबीरपणे मनोज यांनी मात्र आपली फुलशेती टिकवली. यशस्वी केली. त्यातून कर्ज फेडले. अर्थकारण उंचावले. आज त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्याला टवटवीतपणा आला आहे..लातूर जिल्ह्यातील येलोरीवाडी शिवारात (ता. औसा) सर्जे यांच्या एकत्र कुटुंबाची चौदा एकर शेती आहे. पारंपरिक पिकांसह दोन एकर ऊस आहे. शिवारातील जमीन हलकी आहे. कुटुंबातील मनोज वाल्मीक सर्जे (वय ३५) हे सध्या संपूर्ण शेतीची जबाबदारी सांभाळतात. एकदा धाराशिव जिल्ह्यातील गावात मित्राने केलेली जरबेराची फुलशेती पाहण्यास मिळाली. मित्रानेही मनोज यांना या फुलशेतीबाबत प्रोत्साहन देत त्याची इत्थंभूत माहिती दिली. अधिक अभ्यास करून निर्णय पक्का केला..Gerbera Flower Farming : जरबेरा फुलाची शेती खूप फायद्याची! .सुरू झाली जरबेरा शेतीकृषी विभागाच्या अनुदानाची प्रतीक्षा न करता सन २०१८ च्या दरम्यान पॉलिहाउस उभारणीला सुरुवात झाली. घराजवळच्या वीस गुंठ्यांत जरबेरा शेतीचे नियोजन होते. पॉलिहाउसचे, स्ट्रक्चर, बाहेरून माती आणणे, रोपे २० ट्रॉली शेणखत व अन्य मिळून सुमारे २५ लाखांचा खर्च होता. त्यासाठी मोठ्या प्रयत्नानंतर एका बँकेकडून कर्ज मिळाले. पुढे कृषी विभागाचे ५० टक्के अनुदान मिळाले. जरबेरा फुलांसाठी पाण्याचा निचरा होणारी माती लागते. शिवारात तशी माती उपलब्ध नव्हती. एकंबी तांडा (ता. औसा) येथून तशी माती आणली. सुमारे २० ट्रॉली शेणखत आणून बेड तयार केले. पुणे येथून रोपे आणून लागवड केली. सुमारे २० गुंठ्यांत साडेबारा हजार रोपे बसली. मित्राच्या मार्गदर्शनातून व्यवस्थापन सुरू झाले. सुमारे ७५ दिवसांनी उत्पादन सुरू झाले..चोख व्यवस्थापनातून दर्जा टिकवलामनोज सांगतात, की सध्या प्लॅस्टिकची फुले बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आल्याने नैसर्गिक फुलांवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. अर्थात, जरबेरा फुलांना मागणी आहे. व्यापाऱ्यांशी नियमित संपर्कात राहून, प्रत्येक संकटावर उपाय काढून फुलशेतीचा व्यवसाय टिकवून ठेवला आहे. फुलांची गुणवत्ता टिकवून धरली आहे. विद्राव्य खते, कीडनाशके व सिंचन असे व्यवस्थापन त्यादृष्टीने चोख ठेवले आहे. बेडमध्ये माती कोरडी पडू नये, ओलावा टिकून राहावा यासाठी पाणी फवारणीची व्यवस्था केली आहे. मनोज व ज्ञानेश्वरी या सर्जे दांपत्याला आई विमल, चुलती सिंधूबाई, भावजय उज्वला, चुलत भावजया सीमा व कल्याणी यांची लागवडीपासून ते काढणी, प्रतवारी, पॅकिंगपर्यंत रोजची मदत असते. महिला मजुरांनाही या कामांमधून नियमित रोजगार मिळाला आहे..Gerbera Flower : जरबेरा फुलांचे दर पडले; कोल्हापुरातील २०० ग्रीनहाउस शेतकऱ्यांवर आर्थिक संकट.फुलांमुळे प्रगतीचा बहरफुलशेतीतून सर्जे कुटुंबाने चांगली प्रगती साधली आहे. घर बांधले. फोर व्हीलर घेतली. पहिल्या २० गुंठे पॉलिहाऊस क्षेत्रासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड झाली. पुढील २० गुंठे क्षेत्रातील पॉलिहाऊस हे कर्ज न घेता केवळ फुलशेतीतील उत्पन्नातून उभारले. त्यामुळे फुलशेती थांबवण्याचा विचार सध्या तरी डोक्यात नाही. फुलाच्या नव्या वाणाचे उत्पादन घेण्याचे नियोजन केले आहे. मनोज यांना कष्टांची जाण आहेच. शिवाय जिद्द, कोणत्याही परिस्थितीत खंबीरपणे टिकून राहणे, पडेल ते काम करण्याची तयारी व त्यातील सातत्य यामुळे कमी वयात मनोज यांनी फुलशेतीत चांगले कौशल्य प्राप्त केले आहे..सहकाऱ्यांसमवेत विक्रीची व्यवस्थामनोज यांच्यासह पाडोळी (ता. धाराशिव) व ढोकी (ता. कळंब) येथील सुमारे २२ जणांनी मिळून जरबेरा शेती सुरू केली होती. सर्वांचे मिळून पंचवीस एकरांच्या आसपास पॉलिहाऊसेस होती. या सर्वांकडून फुले संकलित करून नेणारी हैदराबाद येथील व्यापाऱ्याची गाडी दररोज रात्री नऊच्या दरम्यान यायची. जवळच बेलकुंड येथून हैदराबादला जाण्यासाठी थेट मार्ग आहे. सकाळी फुलांची काढणी, त्यानंतर रंगनिहाय वर्गीकरण करून छाटणी करणे, बॉक्समध्ये पॅक करणे आदी कामे दिवसभर सुरू असायची. जरबेरा शेतीत अशा प्रकारे मनोज यांचा चांगला जम बसू लागला. तीन वर्षे चांगले उत्पन्नही मिळाले. दरम्यान २०२० मध्ये कोरोनाचे संकट उभे राहिले. त्यात फुलांच्या विक्रीला मोठा फटका बसला. लग्नसराईमध्ये फुलांना मोठी मागणी होती. मात्र विक्री थांबल्याने फुले काढून फेकून द्यावी लागली..Flower Farming : शेतकरी नियोजन - पीक ः जरबेरा.वर्षाच्या खंडानंतर जोमाने पुन्हा व्यवस्थापनमनोज यांचे वडील वाल्मीक देखील शेतकरीच होते. त्यांचे २०२१ मध्ये निधन झाले. फुलशेतीत त्यांचा मनोज यांना मोठा आधार होता. चुलते श्रीहरी कारागृह विभागात पोलिस होते. सात महिन्यापूर्वी त्यांचे निधन झाले. त्यांचेही सातत्याने मार्गदर्शन मनोज यांना व्हायचे. संकटे एकामागून एक येतच होती. पण मनोज खंबीरपणे त्यांना तोंड देत पुढे पुढे जात होते. अर्थात, अशावेळी कुटुंबातील सर्वांची मदत महत्त्वाची ठरली. मनोज यांची पत्नी ज्ञानेश्वरी या देखील पतीच्या खांद्याला खांदा लावून फुलशेतीत राबू लागल्या..भाऊ नारायण मुद्रांक व नोंदणी विभागात संगणक अभियंता आहेत.नोकरी सांभाळून तेही शेतीला हातभार लावू लागले. दयानंद व रवी या चुलतबंधूंचा धाराशिव येथे व्यवसाय आहे. त्यांचेही सहकार्य लाभू लागले. सर्वांच्या पाठबळाच्या जोरावरच मनोज यांना जरबेरा शेतीत टिकून राहणे व त्यात चांगले यश मिळवणे शक्य झाले..आजची शेतीसुरुवातीच्या २० गुंठ्यांतील क्षेत्रानंतर जरबेरा शेतीसाठी २०२१ मध्ये आणखी २० गुंठे पॉलिहाउस क्षेत्र वाढवले. परंतु पुढे पहिले क्षेत्र बंद करून आता नंतरचे क्षेत्र तेवढे ठेवले आहे. सुरुवातीच्या तीन वर्षांमध्ये दररोज दोन हजार ते अडीच हजार फुलांचे उत्पादन मिळायचे. आता दररोज पंधराशेपर्यंत फुले मिळतात. उत्पादन वर्षभर सुरू राहते. काढणीही दररोज सुरू असते. एकदा लागवडीनंतर सुमारे पाच वर्षांपर्यंत फुले मिळतात..लाल, पांढरा, भगवा, पिवळा व गुलाबी रंगांच्या फुलांचे उत्पादन घेण्यात येते. मधल्या काळात फुलशेती गटातील मित्रांनी पॉलिहाउस बंद केले. त्यामुळे हैदराबादला मोठ्या प्रमाणात होणारी फुलांची वाहतूक बंद पडली. तेथे प्रति फूल दोन रुपयांपासून वीस रुपये व त्यापुढेही दर मिळत होता. आता मनोज या परिसरातील एकमेव पॉलिहाउसधारक शेतकरी उरले. परंतु तरीही त्यांनी आपले मनोधैर्य कुठेही खचू दिले नाही. लातूर येथे फुले पाठविण्याची व्यवस्था तयार केली. आज वर्षभराचा विचार करता प्रति फूल पाच रुपये असा दर त्यांना मिळतो. सण व लग्नसराईत फुलांना चांगले दर मिळतात.मनोज सर्जे ९५५२०७०४०५.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.