Mandaprabha FPC Story: सातारा जिल्ह्यात माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर येथील महिलांनी एकत्र येत मंदप्रभा महिला शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली. त्या माध्यमातून सातारा सहित शेजारील दोन जिल्ह्यांतील मूग व राजमा उत्पादकांना शाश्वत व हक्काची बाजारपेठ देण्याचा प्रयत्न झाला. कंपनीने स्वच्छता- प्रतवारीचे व अन्य यांत्रिकीकरण करून उद्योगात आधुनिकीकरण केले आहे. .सातारा जिल्ह्यात माण हा सर्वाधिक दुष्काळाच्या झळा सोसणारा तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील शिखर शिंगणापूर हे शंभू महादेवाचे प्रसिद्ध देवस्थान सर्वदूर प्रसिद्ध आहे. सातारासहित सोलापूर व पुणे जिल्ह्याची सीमाही या गावालगत आहे. या परिसरात सोयाबीन, राजमा, मूग आदी पिके घेतली जातात. या शेतकऱ्यांना आपल्या शेतीमालाची विक्री करण्यासाठी बारामती, पुणे येथे जावे लागत होते. यातून पैसा, वेळ यांचा मोठा अपव्यय व्हायचा. शिवाय व्यापाऱ्यांच्या दरांवर अवलंबून राहावे लागे..यावर मार्ग शोधण्यासाठी गावातील महिला शेतकरी प्रिया डोंबे, अंजू तोडकर, आरती निलाखे यांनी पुढाकार घेतला. समूहाद्वारे संघटित येणे हा त्यावरील मार्ग होता. दरम्यान, कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपनीचा पर्याय समोर आला. या महिलांनी कंपनी स्थापन करावी असा विचार आपापल्या घरी बोलून दाखवला. कुटुंबातील सदस्यांनी पाठिंबा दिल्यानंतर कृषी विभागाकडून सविस्तर त माहिती घेतली. वासंती होनराव व रूपाली सातपुते यांचीही साथ मिळाली. त्यातून सन २०२०-२१ मध्ये मंदप्रभा शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना झाली. ‘स्मार्ट’ प्रकल्पाचे त्यासाठी साह्य मिळाले..Farmer Producer Company: शेतकऱ्यांनी प्रक्रिया, मार्केटिंगवर भर द्यावा .कंपनीची कार्यपद्धतीवैशिष्ट्य म्हणजे या कंपनीचे संपूर्ण संचालक मंडळ महिलांचे आहे. महिला आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना विकासाच्या केंद्रस्थानी ठेवून कार्याची दिशा ठेवली आहे. पाच संचालिका, तर २४० महिला सदस्य आहेत. सातारासह सोलापूर व पुणे जिल्ह्यांतील शेतकऱ्यांकडून मूग आणि राजमा खरेदी करणे व क्लिनिंग- ग्रेडिंग करून मूल्यवर्धित मालाची विक्री करणे हाच मुख्य फोकस ठेवला. त्यातून शेतकऱ्यांना देखील चांगला दर देणे शक्य होणार होते. गावातच चार हजार चौरस मीटर बांधकाम करून शेडची उभारणी केली..त्यामध्ये आवश्यक असणारी कलर सॉर्टर मशिन, ग्रॅव्हिटी सेपरेटर व अन्य यंत्रे बसविण्यात आली. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी एकूण तीन कोटी १३ लाखांचा खर्च आला आहे. यामध्ये स्मार्ट प्रकल्पाद्वारे एक कोटी ८८ लाख ३३ हजारांचे अनुदान मंजूर झाले. पैकी बहुतांश रक्कम खात्यावर जमा झाली आहे. बॅंकेकडून ९४ लाख १७ हजार कर्ज मिळाले आहे. तर कंपनीच्या सदस्य महिलांनी मिळून ३१ लाख भांडवल उभे केले. या मजबूत आर्थिक पायावरच कंपनीने आपली वाटचाल आत्मविश्वासपूर्वक सुरू ठेवली आहे..सभासद शेतकऱ्यांसाठी सुविधामंदप्रभा कंपनीने नोंदणीकृत सुमारे ३५० शेतकरी सदस्य असले तरी बाराशेपर्यंत शेतकऱ्यांचे नेटवर्क उभारल्याने त्यांच्याकडून माल घेणे शक्य झाले आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला माल सुरक्षितपणे साठविण्यासाठी १०८० टन क्षमतेचे गोदाम उभारले आहे. अचूक डिजिटल मोजमाप करण्यासाठी आधुनिक पद्धतीचा ‘वे ब्रिज’ बसवला आहे..सभासद शेतकऱ्यांना शेतकामांसाठी ट्रॅक्टरचीही मदत दिली आहे. मूग व राजमा या दोन पिकांवर मुख्य भर असला तरी सोयाबीन, उडीद, तूर, हरभरा आदी मालही हमीभावाने खरेदी केला जातो. सभासदांना ज्ञान आणि कौशल्य वाढवण्यासाठीही नामांकित संस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यातून कंपनी व्यवस्थापन आणि बाजारपेठ जोडणी यांसारख्या विषयांचे व्यावहारिक ज्ञान मिळण्यास मदत झाली..Agriculture Success Story: कोयनेच्या खोऱ्यातील प्रयोगशील, आनंदी शेतकरी दिलीपतात्या .कंपनीची आश्वासक प्रगतीकंपनीने समाजातील सर्वात असुरक्षित महिला घटकांना आपल्या विकासाच्या प्रवाहात यशस्वीपणे समाविष्ट केले. सुमारे ९७ टक्क्यांपेक्षा जास्त सभासद अल्प व अत्यल्प भूधारक असणे हे कंपनीच्या सर्वसमावेशक स्वरूपाचे द्योतक आहे. त्यामुळेच कंपनीने आर्थिक क्षेत्रात आश्वासक यश मिळवण्यास व प्रगती करण्यास सुरुवात केली आहे. प्रकल्पातून स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत..सुमारे १५ स्थानिकांना रोजगार मिळाला आहे, ज्यात पाच कुशल आणि १० अकुशल कामगारांचा समावेश आहे. प्रक्रियायुक्त मालाची ३० किलो पॅकिंगमधून मूग व राजमा यांची विक्री केली जात आहे. स्थानिकसह देशातील व्यापारी व कंपन्या कंपन्यांचे ग्राहक आहेत. व्यापक बाजारपेठ जोडणी करून कंपनीने मजबूत पुरवठा साखळी तयार केली. सन २०२३-२४ मध्ये २५० टन तर २०२४-२५ मध्ये ३०० टन खरेदी कंपनीने शेतकऱ्यांकडून केली. यात मूग व राजमा हेच मुख्य शेतीमाल होते. सन २०२३-२४ मध्ये कंपनीने सुमारे तीन कोटी ४८ लाख, तर २०२४-२५ मध्ये सहा कोटी ९० लाखांची उलाढाल केली..शेतकऱ्यांचा होतोय फायदाकंपनी यंदा मुगाची प्रति किलो ८० ते ८५ रुपये दराने, तर राजमाची ६८ ते ७५ रुपये दराने शेतकऱ्यांकडून खरेदी केली आहे. आपल्याच भागात बाजारपेठ तयार झाल्याने शेतकऱ्यांचा वेळ वाचतो आहे. त्यांना योग्य दर मिळतो आहे व पेमेंटही जलद मिळते आहे. कंपनीने सभासद शेतकऱ्यांना अन्य सेवा पुरवूनही मोठा आधार दिला आहे..कंपनी स्थापन झाल्यामुळे भागातील शेतकऱ्यांची चांगली सोय झाली आहे. वजनकाटा गावातच उपलब्ध झाल्यामुळे वाहतूक खर्च कमी झाला. सध्या व्यावसायिक पॅकिंगमध्ये कडधान्ये विक्री केली जात आहे. भविष्यात घरगुती एक, दोन, पाच किलोचे पॅकिंग करण्याचा विचार आहे.प्रिया डोंबे ९४०३१४७३७२, संचालिका.कंपनीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नव उद्योजकांना कृषी व्यवसाय करण्यास प्रोत्साहन व चालना मिळाली आहे. प्रकल्पासाठी कृषी विभाग तसेच महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्समिशन फाउंडेशनचे अधिकारी व कर्मचारी यांचीही मोठी मदत झाली आहे.आरती निलाखे ७५०७०००७४५, संचालिका.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.