Agriculture Success Story : विरावली (ता. यावल, जि. जळगाव) शिवारात कल्पना व मनीष या पाटील दांपत्याची आठ एकर काळी कसदार शेती आहे. वडिलोपार्जित शेतीत प्रगती करीत असतानाच विविध प्रयोग त्यांनी केले. सुमारे १२ एकर शेती ते भाडेतत्वावर करतात. केळी, कापूस, मका, कांदा ही त्यांची मुख्य पिके आहेत. .पिकांचे उत्पादन साध्य करतात. दोन कूपनलिका, ट्रॅक्टर आहे. शेतीला जोड व्यवसाय असावा असा पाटील दांपत्याने विचार केला. त्यातही कल्पना यांनी अधिक पुढाकार घेतला, रेशीम शेती हा तुलनेने कमी जोखमीचा व्यवसाय असल्याने त्याबाबत अधिक माहिती मिळविण्यास सुरवात केली. किनगाव (ता.यावल) व परिसरातील रेशीम शेतकऱ्यांकडून व्यनसायातील बारकावे, धोके, गरजा, बाजार, मजुरी खर्च, गुंतवणूक आदी बाबींवर चर्चा केली. त्यातून प्रेरणा व ऊर्जा मिळाली. पती मनीष यांनी प्रोत्साहन दिले..रेशीम शेतीतील नियोजनसन २०२० च्या सुमारास तुतीची अडीच एकर क्षेत्रात लागवड करून घरानजिकच्या शेतात रेशीम कीटक संगोपन गृह उभारले. त्यामुळे शेतीसह त्याकडे कायम लक्ष देणे शक्य झाले आहे. संगोपन गृह सिमेंट, पत्र्यांच्या मदतीने उभारले आहे. त्याचा आकार ५० बाय ३० फूट आहे. मध्यभागाची उंची सुमारे १५ फूट असून आजूबाजूची उंची सुमारे १२ फूट आहे. .लोखंडी रॉड, सळयांच्या मदतीने प्रत्येकी पाच मजल्यांचे तीन रॅक तयार केले आहेत. त्यातील चार मजल्यांचा वापर केला जातो. चाळीस ४० बाय साडेचार फूट अशी रॅकची लांबी आहे. सध्या तुतीचे क्षेत्र दीड एकर आहे. तुतीची अधिकाधिक कापणी करण्यावर भर असतो. त्यामुळे जोमात फुटवे येतात. दर्जेदार पाला रेशीम कीटकांना उपलब्ध होतो. उझी माशी व तत्सम समस्या दूर करण्यासाठी नेटची व्यवस्था केली आहे..Agriculture Success Story: वारकेंची तंत्रशुद्ध, बहुविध पीकपद्धती.कल्पना यांच्याकडे मुख्य जबाबदारीव्यवसायाची सर्व जबाबदारी, बहुतांश कामे व व्यवस्थापन कल्पना स्वतः सांभाळतात. संगोपनगृह स्वच्छ, निर्जंतुक ठेवण्यावर त्यांचा विशेष भर असतो. त्यामुळे रेशीम कीटकांची मरतुक कमी होते. कोष उत्पादनावर त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. वर्षभरात त्या सहा ते सात बॅचेस घेतात. प्रत्येक बॅच आटोपल्यावर १० ते १२ दिवस संगोपनगृह कोरडे व रिकामे ठेवले जाते. कल्पना सर्व नोंदी देखील ठेवतात. रेशीम कीटकांना अखेरच्या पाच ते सहा दिवसांत अधिकचा तुतीचा पाला आवश्यक असतो. .या कालावधीत दोन मजुरांची मदत घेण्यात येते. पावसाळा, हिवाळा व उन्हाळा अशा तीनही ऋतूत तापमान व आर्द्रता या घटकांचे नियंत्रण अत्यंत महत्त्वाचे असते. त्यादृष्टीने कल्पना यांनी नियोजनात सुसूत्रता आणली आहे. पावसाळ्यात आर्द्रता जास्त असल्याने संगोपनगृहात हवा कशी खेळती ठेवणे, थंडीच्या काळात थंड वारे संगोपनगृहात जाणार नाहीत व ऊब राहील याची काळजी घेतली जाते. उन्हाळ्यात संगोपनगृहाच्या चारही बाजूंना ओल्या गोण्या बांधण्यात येतात. छतावरही हिरवी नेट असते.कल्पना यांचा दिवस पहाटे साडेपाच वाजता सुरू होतो. घरातील सर्व कामे आवरून सकाळी नऊच्या सुमारास त्या रेशीम व्यवसायाकडे लक्ष देतात. सकाळी तीन तास व दुपारनंतर तीन तास असे त्यांनी रेशीम शेतीतील नियोजन केले आहे. पतीला त्या पिकांच्या उत्पादनातही मदत करतात..व्यवसायाचे अर्थकारणप्रति २०० अंडीपुंजांची बॅच घेण्यात येते. प्रति १०० अंडीपुंजांमागे ८० ते ८५ क्विंटल रेशीम कोषांचे उत्पादन घेतले जाते. कोष उत्पादनापर्यंतची सर्व जबाबदारी कल्पना यांच्याकडे असली तरी विक्रीची पूर्ण जबाबदारी पती मनीष पाहतात. सध्या बीड व जालना येथील बाजारपेठेत विक्री केली जात आहे. अलीकडील काळात प्रति किलो ५०० ते ७०० रुपये दर मिळत आहे. प्रति बॅच सुमारे ४० ते ५० टक्के नफा या व्यवसायातून मिळत आहे. यावल तालुक्यातील विरावली, किनगाव व परिसरातील शेतकरी देखील रेशीम शेती करतात. या मंडळींसोबत मालवाहू वाहन भाडेतत्त्वावर घेऊन पाटील दांपत्य रेशीम कोषांची पाठवणूक बाजारपेठेत करतात. त्यामुळे भाडेखर्च कमी येतो. तेथे लिलाव झाल्यानंतर त्वरित पैसे मिळतात..Farmer Success Story : व्यावसायिक वृत्ती जोपासून मिळवली समृद्धी.व्यवसायातून उंचावले अर्थकारणरेशीम शेतीसाठी किनगाव (ता.यावल) येथील प्रमोद पाटील, कैलास वराडे, विनय पाटील यांचे मार्गदर्शन मिळते. कल्पना रेशीम उत्पादकांच्या सातत्याने संपर्कात असतात. एकमेकांचे अनुभव, ज्ञान यांची त्यातून देवाणघेवाण होते. यूट्यूबच्या माध्यमातूनही रेशीम शेतीचे व्यवस्थापन, अनुभव व बारकावे अभ्यासले आहेत. अभ्यास दौरे देखील कल्पना करतात. त्या म्हणाल्या की या व्यवसायाला शेतीला मोठा आधार झाला आहे. प्रपंचाचा खर्चही याच व्यवसायातून होतो. पूर्वी आम्ही छोट्या घरात राहाता होतो. आता मोठे घर बांधले आहे. दोन्ही मुलांना उत्तम शिक्षण देता आले. .मोठा मुलगा मयूर जळगाव येथे कृषी पदवीचे शिक्षण घेत आहे. त्याचे तांत्रिक मार्गदर्शन आई- वडिलांना मिळते. धाकटा मुलगा गुंजन बी. फार्म झाला असून तो नोकरी करू लागला आहे. व्यवसायातून येणाऱ्या उत्पन्नातून कापूस, मका, केळी, कांदा आदींच्या शेतीत चांगली गुंतवणूक करणे शक्य झाले आहे. .काही वेळेस पिकांमध्ये येणारा तोटाही रेशीम व्यवसायातून भरून काढणे शक्य झाले आहे. पाटील दांपत्याने पिकांचेही चांगले उत्पादन साध्य केले आहे. मक्याचे एकरी २० क्विंटलपर्यंत उत्पादन ते साध्य करतात. केळीची प्रति १८ ते २० किलोची रास मिळते. कापूस पिकाला लहरी हवामान, गुलाबी बोंडअळीचा फटका बसतो. यामुळे उत्पादनात घसरण होत आहे. तरीही एकरी पाच ते सहा क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.कल्पना पाटील ९७६३६५७२३३.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.