Women Farmers: नागणखुर्द (जि. जळगाव) येथील शिल्पा यशवंत महाजन यांनी लाल मातीच्या दगडी, दणकट माळरानात फळबाग फुलविण्याचे स्वप्न साकार केले आहे. सेंद्रिय शेतीवर भर देत उत्पादित सेंद्रिय शेतीमालावर शेतामध्येच प्रक्रिया युनिट उभारत उत्पादन विक्रीतून यशाला गवसणी घातली आहे. याच कृषी पर्यटनाची जोड देण्याच्या अनुषंगाने काम सुरू आहे. .जळगाव जिल्ह्यातील नागणखुर्द (ता. जामनेर) शिवारात महाजन कुटुंबाची सुमारे ७१ एकर शेती आहे. १९७२ मध्ये सुमारे २३ एकर शेती गावानजीक पाझर तलावासाठी शासनाने संपादित केली होती. त्यानंतर वडिलोपार्जित ५५ एकर शेतीमध्ये महाजन बंधूंनी १६ एकरांची भर घातली. मात्र पाऊसमान कमी असल्याने शिवारात रब्बी हंगाम साधणे कठीण जाते. महाजन बंधूचे वडील अनंत महाजन हे डाळवर्गीय पिकांचे उत्पादन घ्यायचे. मात्र भीषण पाणीटंचाईमुळे जानेवारीत शिवार उजाड दिसायचे. महाजन कुटुंबातील मंडळी तशी उच्चशिक्षित. पण सर्वांना शेतीची मोठी आवड आहे. .Food Processing Business: प्रक्रिया उद्योगामध्ये तयार झाली ओळख.याच आवडीतून गावाकडची जमीन फुलविण्याचे स्वप्न साकार झाले आहे. वडील अनंत महाजन यांनी पारंपरिक शेती केली. पण सर्वांना निसर्ग, वृक्ष व समाज यांच्याविषयी प्रेम होते. शिवाय शेतीत वाढणारा रासायनिक खते, रासायनिक कीडनाशकांचा उपयोग, अस्थिर शेतीमाल बाजारपेठ, टंचाई या सर्व बाबींवर कुटुंबात चिंतन सुरू असायचे. यशवंत यांच्या पत्नी शिल्पाताई यांनी आपल्या शेतातील उत्पादित नैसर्गिक शेतीमालावर प्रक्रिया करून नैसर्गिक उत्पादनांवर आधारित प्रक्रिया उद्योग उभा करायचा, असा मानस होता..त्यातूनच शिल्पाताईंनी अभ्यास करून कुटुंबाच्या साथीने शेतात ‘सावित्री माधव बाग’ या नावाने प्रक्रिया युनिटची उभारणी केली. प्रक्रिया युनिटसह शेतीच्या अन्य कामांची जबाबदारी शिल्पाताई पार पाडतात. मार्केटिंग, शेतीचे व्यवस्थापन आदींसाठी कुटुंबातील अन्य सदस्यांची मदत होते. याशिवाय अलीकडेच महाजन कुटुंबाने कृषी पर्यटनासंबंधी काम हाती घेतले आहे. आपल्या शेताकडे इतरांनी यावे व शेतीची प्रेरणा घ्यावी, नैसर्गिक शेती, शेतीमाल प्रक्रिया, जलसंधारण यांचा अभ्यास, ज्ञान उपलब्ध व्हावे हाच त्यामागे उद्देश आहे..मुरमाड, दगडी क्षेत्र केले हिरवेगारआपल्या मुरमाड, लाल मातीच्या जमिनीवर फळ बागा वाढविण्याचा निश्चय शिल्पाताई व महाजन कुटुंबीयांनी केला. त्यात २२ प्रकारची फळपिके आणि ६७ प्रकारची फुलझाडे आहेत. मुख्यतः पेरूची २८०० झाडे, तर लिंबांची १५०० झाडे आहेत. याशिवाय गवती चहा, नारळ, आंबा लागवडीसह १६ एकरांत निलगिरी लागवड करत वनशेतीच्या दिशेने काम सुरू केले आहे. पाच एकरांत सुबाभूळ लागवड आहे. निलगिरी व सुबाभूळची विक्रीसाठी गुजरातमधील एका कागद निर्मिती करणाऱ्या कारखान्याशी करार केला आहे. आठ वर्षांपूर्वी उभ्या केलेल्या लिंबू, पेरू व आंबा बागेतून आता उत्पादन हाती येऊ लागले आहे. त्यामुळे आता मुरमाड, दगडी शिवार फळबागांमुळे हिरवेगार होऊन फुलले आहे..Food Processing Industry Opportunity: प्रक्रिया उद्योगामध्ये चांगल्या संधी.आपली शेती बागायती होण्यासाठी महाजन कुटुंबाने शेतालगतच्या नाल्यांचे तसेच पाझर तलावाचे खोलीकरण केले. त्यासाठी सामाजिक संस्था, शासनाची मदत घेतली. सोबतच गावातील नाल्यांच्या खोलीकरणाचे कामही हाती घेतले. आपल्यासह गावातील इतर शेतकऱ्यांना पाण्याचा शाश्वत आधार मिळावा, यासाठी हे काम प्रथम करण्यात आले. शाश्वत सिंचनासाठी शेतामध्ये सुमारे दोन कोटी लिटर पाणी क्षमतेची चार शेततळी खोदली आहेत. यातील दोन शेततळी पावसाच्या पाण्याद्वारे नैसर्गिकरित्या भरतात. तर अन्य दोन शेततळी शेतात उंच टेकडावर असल्याने नाल्यांतील व अन्य पाणी उचलून डिसेंबरमध्ये भरून घेतली जातात. नाला खोलीकरण, पाझर तलावातील गाळ काढल्याने शेतातील विहिरींना पाण्याचा शाश्वत स्रोत उपलब्ध झाला आहे. शेतात पाणी जिरण्यासाठी आडवे चर तयार केले आहेत..नैसर्गिक शेतीला प्राधान्यशेतात कोणत्याही रासायनिक निविष्ठांचा वापर करायचा नाही हे तत्त्व महाजन कुटुंबाचे सुरुवातीपासूनच होते. जमीन सुपीकतेसाठी पशुपालनास सुरुवात केली. गोठ्यात स्थानिक व देशी जातींच्या २५ गाई व दोन बैलजोड्यांचे संगोपन केले जात आहे. यातून दूध उत्पादनाऐवजी गोमूत्र व शेणखत उपलब्धतेसाठी प्रयत्न केले जातात. शेतात तणनाशकांचा वापर पूर्णपणे टाळला जातो. शेतातील तणाला धन मानून त्याचाही उपयोग कसा करता येईल यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. शेतातील ३५ प्रकारचे तण गोळा करून ते गूळ, गोमुत्राचा उपयोग करून आंबवले जाते. त्याचे द्रावण ड्रीपमधून पिकांना देतात. तसेच ड्रीपमधून बीटरूट, गोमूत्र व गुळाचे द्रावण, पेरू, गोमूत्र व गुळाचे द्रावण तयार करून दिले जाते. गांडूळ खताचा वापर प्रामुख्याने केला जातो. आगामी काळात गांडूळखत व स्लरी निर्मितीसाठी प्रकल्प उभारण्याचा त्यांचा मनोदय आहे. नैसर्गिक, सेंद्रिय शेतीसाठी हेमंत सोनवणे यांचे मार्गदर्शन वेळोवेळी मिळते..प्रक्रिया युनिटची उभारणीफळबागांची शेती वाढली, फुलली. त्यानंतर शेतातील उत्पादित शेतमालावर प्रक्रिया करता येईल का, या विचाराने शिल्पाताईंनी अभ्यास सुरू केला. कुटुंबातील मंडळींसोबत चर्चा केल्यानंतर शेतामध्येच ‘सावित्री माधव बाग’ या नावाने प्रक्रिया युनिटची उभारणी केली. महाजन बंधूंचे आजी-आजोबा सावित्री व माधव महाजन यांच्याविषयी असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासह प्रेरणा म्हणून उद्योगास त्यांचे नाव देण्यात आले आहे. या युनिटमध्ये कडीपत्ता, शेवगापत्ता, गवती चहा, कांदा, केळी इत्यादींचे निर्जलीकरण करून तयार केलेली पूड विकली जाते. शेवगापत्ता पूडची विक्री १२०० रुपये प्रति किलो दराने तर अन्य शेतीमालाची पूड करून ५०० ते ८०० रुपये दराने विक्री होते. तसेच लिंबू लोणचे आणि शेवग्याची चटणीदेखील तयार केली जाते. ताकात भिजविलेल्या मिरच्या, शेंदडी यांचे निर्जलीकरण करून विक्री करतात. निर्जलीकरणासाठी सोलार ड्रायरची व्यवस्था केली आहे..जयंत, यशवंत व हेमंत या महाजन बंधूंना वडिलांनी उच्चशिक्षण दिले. जयंत हे अभियंता होऊन पाटबंधारे विभागात रुजू झाले. यशवंत हे वकील असून, हेमंत हे मुंबईत मंत्रालयात उपसचिव आहेत. जयंत यांच्या पत्नी सुरेखा या एका विद्यालयात मुख्याध्यापक आहेत. यशवंत यांच्या पत्नी शिल्पाताई या पदवीधर आहेत. आज महाजन कुटुंबाची तिसरी पिढीही उच्चशिक्षित आहे..आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी निवडशिल्पा महाजन यांनी प्रक्रियायुक्त उत्पादनांना जळगाव शहरासह अन्य भागात बाजारपेठ मिळविली आहे. या कामाची दखल शासन स्तरावर घेऊन या पदार्थांच्या विक्रीसाठी दिल्ली येथे आयोजित ‘आहार’ या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात त्यांची निवड करण्यात आली. सुमारे १२५ एकरांवरील या प्रदर्शनात त्यांच्या उत्पादनांना चांगली बाजारपेठ उपलब्ध झाली.शिल्पा महाजन ७०२०६४६१९६.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.