Rural Success Story: सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील येळवी गावातील आवटे कुटुंबाने दुष्काळातील शेतीला शेळीपालनाने सावरून मोठा आर्थिक आधार दिला. कुटुंबातील युवा शेतकरी राहुल शेती व शेळीपालनाची मुख्य जबाबदारी समर्थपणे सांभाळतो आहे. कुटुंबातील सर्वांची साथ, कष्ट, अभ्यास आणि आत्मविश्वासाच्या जोरावर उस्मानाबादी जातींच्या शेळीपालन व्यवसायातून कुटुंबाने आर्थिक स्थिरता मिळवून यश संपादन केले आहे..सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याची दुष्काळी अशीच ओळख आहे. इथला शेतकरी दुष्काळ पाठीवर घेऊनच जगतो. अशा प्रतिकूल परिस्थितीतही इथल्या मातीत रसाळ द्राक्षे आणि डाळिंबाच्या बागा फुलविण्याची किमया शेतकऱ्यांनी घडवली आहे. तालुक्याच्या उत्तरेला वसलेल्या येळवी गावानेही दुष्काळाचे चटके वर्षानुवर्षे सोसले. अवघ्या पंधरा ते वीस वर्षांपूर्वी इथं केवळ २० ते ३० टक्केच बागायती क्षेत्र होतं. उरलेली बहुतांश शेती पावसाच्या भरवशावर होती. मागील दहा वर्षांत गावात म्हैसाळ सिंचन योजनेचं पाणी आलं. त्यामुळे गावातील शेती बागायती झाली. आजमितीला ऊस आणि मका ही गावची दोन प्रमुख पिके आहेत..Farmer Success Story: भांगे- पाटील यांच्या हुरड्याची दिल्लीपर्यंत ओळख.हार न मानलेलं कुटुंबयेळवी गावातील राहुल रामहरी आवटे हा कष्टकरी आणि शेतीत नवे काही घडवण्याची स्वप्ने पाहणारा युवा शेतकरी. शेती आठ एकर. तीही कोरडवाहू. उत्पन्न अनिश्चित आणि घरची परिस्थितीही बेताचीच. परिस्थितीची जाणीव लहानपणापासूनच होती. वडील रामहरी यांनी बी.एस्सी.चं शिक्षण घेतलं. त्यानंतर महाड येथे त्यांना नोकरी मिळाली. तिथे चार वर्षे अनुभव घेतला. पण काही कारणांमुळे नोकरी सोडून पुन्हा ते गावी परतले. नंतर गावातच पोस्ट खात्यात नोकरी मिळाली आणि रामहरी कुटुंबाचा आधार बनले. .त्यांचा मुलगा अमोल आज लष्करी खात्यात सेवा बजावतोय. रामहरी यांची पत्नी इंदूबाई, अमोल यांची पत्नी नैना आणि राहुल यांची पत्नी सृष्टी असं हे छोटंसं पण प्रेमाच्या नात्यानं घट्ट बांधलेलं कुटुंब आहे. मर्यादित साधनं, दुष्काळाची सावली आणि शेतीतील अनिश्चितता असूनही या कुटुंबानं हार मानलेली नाही. परिस्थितीशी झुंज देत, कष्ट आणि आशेच्या जोरावर पुढे जाण्याची जिद्द हीच त्यांच्या जगण्याची खरी ओळख आहे. मका, गहू, ज्वारी अशी पीकपद्धती आहे..शेळीपालनातून जागला विश्वासराहुल यांनी बीए.चं शिक्षण पूर्ण करून आपल्या भावाप्रमाणे लष्करात भरती होण्याचं स्वप्न पाहिलं. दोन–तीन प्रयत्न केले. कसून तयारी केली. परंतु अपेक्षित यश लाभलं नाही. पुण्यात नोकरीचे प्रयत्न केले. पण पगार कमी, राहणं, खाणं, प्रवास हे खर्चाचं गणित पाहता महिन्याअखेरीस हाती फारसं काही उरत नाही असं जाणवलं. मग गावी परतून तिथेच काहीतरी स्वतःचं करावं या निर्णयापर्यंत राहुल आले. शेतीतून फार काही मिळत नव्हतं. पण शेतीपूरक असलेल्या घरच्या पाच–सहा शेळ्यांच्या पालनाचा काही आर्थिक आधार होता. कमी खर्चात, घरच्या घरी चालणारा हा व्यवसाय हळूहळू वाढवता येईल हे उमगलं. योग्य काळजी घेतली तर शेळीपालनातून नोकरीपेक्षा जास्त आणि स्थिर उत्पन्न मिळू शकतं हा विश्वास आला..Agriculture Success Story: काका-पुतण्याने संरक्षित शेतीतून बदलले चित्र.अभ्यास ठरला महत्त्वाचाशेळीपालनात यश मिळवायचं असेल तर आधी अभ्यास महत्त्वाचा आहे हे राहुल यांच्या लक्षात आलं होतं. मग परिसरातील अनुभवी शेतकऱ्यांकडे, तालुके आणि जिल्ह्यांत जाऊन जातिवंत शेळ्यांची माहिती घेण्यास सुरवात केली. यात बीटल, उस्मानाबादी आणि आफ्रिकन बोअर या जातींचा सखोल अभ्यास केला. वजन, खाद्य, रोगप्रतिकारक क्षमता, हवामान व विक्री व्यवस्था असे सर्व बारकावे टिपले. मुळात जतचा परिसर अतिशय उष्ण आणि कोरडा. त्यामुळे इथल्या वातावरणात कोणत्या जाती टिकतील, याचा सखोल विचार केला. यू ट्यूबवरही शेळीपालनाचे व्हिडिओ पाहिले. सर्वांगीण अभ्यासातून उस्मानाबादी शेळीलाच प्राधान्य दिले. मुळात घरच्या शेळ्या या जातीच्याच होत्या. .ही जात काटक आणि मध्यम आकाराची असते. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती अन्य जातींच्या तुलनेत जास्त आहे. मरतुकीचे प्रमाणही कमी राहते. मटणाची चवही उत्कृष्ट असल्याने बाजारात मोठी मागणी असते अशा सर्व वैशिष्ट्यांचा अभ्यास महत्त्वाचा ठरला. घरच्या शेळ्यांसह २०१९ पासून अर्धबंदिस्त पद्धतीने शेळीपालन सुरु केले. व्यवस्थापनात कोणतीही तडजोड केली नाही. बाजारात बोकडांची मागणी वाढू लागली. दरही चांगले मिळू लागले. शेळीपालनातील आत्मविश्वास वाढू लागला. हळूहळू परिसरातील शेतकऱ्यांकडून शेळ्या विकत आणल्या. आजमितीला ट मोठ्या ५० तर लहान ४० अशी शेळ्यांची संख्या नव्वदपर्यंत पोचली आहे..व्यवस्थापनातील ठळक बाबीतीन एकरांत चाऱ्याची नियोजनबद्ध लागवड. त्यात सुबाभूळ, दशरथ गवत, मेथी घास आणि नेपियर गवत यांचा समावेश. त्यातून वर्षभर दर्जेदार हिरवा चारा उपलब्ध होतो.दररोज सकाळी अर्धबंदिस्त शेडची स्वच्छता.स्वच्छता, आरोग्य व्यवस्थापन आणि वेळेवर लसीकरण यांना विशेष महत्त्व.पावसाळ्यात शेळ्यांना दिवसातून दोन वेळा चरण्यासाठी सोडले जाते. ओला व हिरवा चारा यांचे उत्तम संतुलन. त्यामुळे शेळ्यांची वाढ, आरोग्य आणि उत्पादनक्षमता चांगली राहते..विक्री व्यवस्थामाडग्याळ हे शेळी-मेंढीच्या बाजारासाठी पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण आहे. या ठिकाणी विक्रीचा आधार आवटे घेतात. सांगोला येथेही विक्रीसाठी ते जातात. अलीकडील काळात सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. त्यातूनही विक्रीला मोठा हातभार लागला आहे. व्यापाऱ्यांसोबतही चांगले संबंध प्रस्थापित केल्याने जागेवर बोकडांची विक्री करणे शक्य झाले आहे. त्यातून वाहतुकीचा आणि बाजारात जाण्याच्या वेळेची बचत झाली आहे. सुमारे १५ ते २० किलोपर्यंत वजन झालेल्या बोकडांची विक्री होते. सरासरी प्रति बोकडाला सात हजारांपेक्षा अधिकचा दर मिळतो. वर्षभरात सरासरी १०० ते१२० बोकडांची विक्री होते. खर्च वजा जाता काही लाखांचा नफा हाती येतो..घरच्यांची एकमेकांना साथशेळीपालन केवळ एका व्यक्तीच्या जोरावर यशस्वी होत नाही. त्यासाठी सातत्याने लक्ष देणारे आणि विश्वासू मनुष्यबळ गरजेचे असते. मजूर ठेवल्यास खर्च वाढतो. हे जाणून कुटुंबातील सर्व सदस्यांनी या व्यवसायात आपला हातभार लावला आहे. सर्वांनी मिळून काम केल्यामुळे व्यवस्थापन सोपे झाले, खर्च कमी झाला आणि कष्टही सुकर झाले. घरच्या शेतात गहू, मका, ज्वारी अशी पिके असतात. त्यात लेंडीखताचा वापर होतो. त्यातून जमिनीची सुपीकता सुधारण्यास मदत झाली असून उत्पादनही वाढले आहे.राहुल आवटे७७७५८४३९८०.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.