Woman Farmer Story: कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील गायत्री धनंजय मुळीक यांनी देशी गाईंच्या संगोपनाची आवड जपली. त्यांच्या सहवासात दिवसाचा प्रत्येक क्षण त्यांचा आनंदी होऊन जातो. सेंद्रिय पद्धतीने देशी गोसंगोपन करताना त्यास व्यावसायिक दृष्टिकोन देताना पारंपरिक पद्धतीने चुलीवर देशी व सेंद्रिय पद्धतीने तूपनिर्मिती करून त्याला चांगली बाजारपेठ देण्याचेही प्रयत्न गायत्री यांनी यशस्वी केले आहेत. गाईंची जोपासना हा त्यांच्यासाठी केवळ व्यवसाय नसून गाई- वासरांसोबत मायेची वीण त्यांनी गुंफली आहे. .कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील गायत्री मुळीक यांची ओळख आज केवळ गृहिणी अशी न राहाता आदर्श गो संगोपन करणारी शेतकरी उद्योजक महिला अशी झाली आहे. सांगली जिल्ह्यातील मळणगाव हे त्यांचे माहेर. शिरोळ हे त्यांचे आजोळ आहे. अर्थशास्त्र विषयातील एमएची पदवी घेतलेल्या गायत्री यांचा शिरोळ येथील धनंजय मुळीक यांच्याशी विवाह झाला. पुणे स्थित ज्येष्ठ कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक हे गायत्री यांचे सासरे. कुटुंबाची एकूण १८ एकर शेती असून, पैकी नऊ एकर क्षेत्र एकाच ठिकाणी आहे..ऊस, ज्वारी, गहू, मका, भाजीपाला, फळपिके अशी विविधता आहे. सेंद्रिय शेतीवर कुटुंबाचा मोठा विश्वास आहे. येथेच फार्म हाउस असून मुक्त, बंदिस्त अशा प्रकारचा गोठा आहे. सुमारे दहा साहिवाल गाई आणि नऊ वासरे आहेत. दोन कपिला गाई आहेत. प्रति दिन ८, १०, १२ ते १४ लिटरपर्यंत दूध देण्याची गाईंची क्षमता आहे..Dairy Farming Success: पशुपालनातून सावरले अर्थकारण.गायत्री चालविताहेत गोसंगोपनाचा वारसाकुटुंबाचा गोसंगोपनाचा वारसा गायत्री पुढे चालवत आहेत. त्यांच्यासाठी गोठा केवळ दूध उत्पादनाचे ठिकाण नाही. तर आनंद आणि समाधान देणारी जागा आहे. गाई गोठ्यात आणल्या त्या दिवशी वासरेही सोबत होती. प्रवासातून आलेल्या मुक्या जिवांना एकत्र ठेवल्यानंतर प्रत्येक वासरू आपल्या आईला शोधून तिच्याकडे धाव घेत होते. हा क्षण पाहून गायत्री भारावून गेल्या. जनावरांनाही भावना, नाती असतात याची जाणीव अधिक तीव्रतेने झाली. आज गोठ्यातील प्रत्येक गाय आणि वासरू त्यांच्या सवयीचे झाले आहे. त्यांच्या अंगावरून हात फिरवल्यावरच दिवस सुरू होतो. .गाईंना सुरक्षितता, स्वच्छता, मोकळीक आणि आराम मिळणे महत्त्वाचे असते हे लक्षात घेऊन गोठ्यातील दिनक्रम त्यांनी आखला आहे. नदीचे पाणी फिल्टर करून निर्जंतुक करून मगच पिण्यासाठी उपलब्ध करून दिले जाते. प्रत्येक गाईसमोर छोटे भांडे ठेवले आहे. भांड्याला तोंड लावताच गरजेइतके पाणी त्यात येते. आवश्यक पोषक घटकांची चाटणवीटही देण्यात येते. उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून गोठ्यात पंखे बसवले आहेत. गोसंगोपनासाठी एक भय्या व एक कुटुंब तैनात केले असले, तरी गायत्री स्वतः प्रत्येक कामात सहभागी होत असतात. दूध काढणे, ताक बनवणे, लोणी काढणे, स्वच्छता करणे किंवा अन्य कोणतेही काम असो या सर्वांमध्ये आपला सहभाग असायला हवा असे त्या सांगतात..चारा व्यवस्थापनसुमारे सात वर्षांपासून चाऱ्याची पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने शेती असल्याने दुधाची गुणवत्तादेखील सेंद्रिय पद्धतीने जपणे शक्य झाले आहे. सुमारे चार एकर क्षेत्र चाऱ्यासाठी राखून ठेवले आहे. तेथे ज्वारी, मका तसेच अन्य चारा पिकांची लागवड केली जाते. टप्प्याटप्प्याने पेरणी केल्याने पेरणी ते कापणी हे चक्र वर्षभर सुरू असते. कडुनिंब, शेवगा यांचाही चाऱ्यासाठी वापर होतो. त्यामुळे वर्षभर खाद्याचा पुरवठा होत राहतो. वासरांसाठी खास लसूणघासाची स्वतंत्र लागवड केली आहे..Dairy Farming Business: दुग्ध व्यवसायच दुष्काळात तारून नेईल.देशी तुपाची निर्मितीदेशी गोसंगोपन करताना घरच्या सर्व सदस्यांना दर्जेदार, आरोग्यदायी, रसायन अंशमुक्त दूध मिळावे ही गायत्री आणि कुटुंबातील सर्वांचीच इच्छा होती. पण त्याचबरोबर ग्राहकांनाही अशाच गुणवत्तेचे दूध, तूप उपलब्ध करून द्यायचे असा विचार कुटुंबाने केला. सध्या गोठ्यातून दररोज ७० ते ८० लिटर दूध उपलब्ध होते. दूध संघाला पुरवठा झाल्यानंतर उर्वरित दुधाची स्थानिक ग्राहकांना थेट विक्री होते. चांगल्या व्यवस्थापनामुळे दुधातील फॅटचे प्रमाणही चांगले आहे. प्रति लिटर ९० ते १०० रुपये असा दुधाचा दर आहे. .औषधी वापरासाठीही ग्राहक दूध खरेदी करतात. तूप पारंपरिक पद्धतीने चुलीवर तयार होते. त्यामुळे त्याला विशिष्ट चव मिळते. दह्याला विरजण लावण्यापासून लोणी काढण्यापर्यंत प्रत्येक प्रक्रियेत गायत्री स्वतः लक्ष घालतात. महिन्याला सुमारे ५० ते ६० किलो तूप तयार होते. स्थानिक ग्राहकांकडून तुपाला मागणी आहेच. मात्र सासरे पुणे येथे राहात असल्याने तूप तेथेही पाठविण्यात येते. मुंबईतील ग्राहकांकडूनही मागणी आहे. काही ग्राहक घरी येऊन तूप घेऊन जातात. काही जण आगाऊ मागणी नोंदवितात. पाव, अर्धा व एक किलो पॅकिंगमधील या तुपाचा तीन हजार तीनशे रुपये प्रति किलो असा दर आहे..पदार्थ पूर्णपणे ‘हायजेनिक’ अवस्थेत तयार करण्यावर भर असतो. भूमाता गोशाळा या फार्मच्या नावानेच उत्पादनांची विक्री होते. आता पनीर निर्मितीकडे लक्ष दिले आहे. साहिवाल गाईंच्या दुधापासून तयार होणाऱ्या पनीरला चांगली चव आणि मऊपणा असल्याचा गायत्री यांचा अनुभव आहे. सध्या मागणीनुसार पनीर तयार होते. मात्र नियमित विक्री वाढवण्यासाठी ग्राहकवर्ग निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ग्राहकांच्या गरजा समजून घेणे, उत्पादनाचा दर्जा टिकवणे आणि विक्रीची योग्य व्यवस्था निर्माण करणे यावर गायत्री यांनी भर दिला आहे..कुटुंबाप्रमाणे जपले कामगारांनागायत्री यांनी गोठ्यातील कामगारांना कुटुंबाप्रमाणे जपले आहे. शेतात एकत्र काम करणे, उपलब्ध फळांचा आस्वाद घेणे आणि एकत्र बसून जेवणे हा त्यांच्या दिनक्रमाचा भाग आहे. आनंदाने दिवस घालवल्यामुळे कामाच्या वातावरणात आपलेपणा टिकून राहतो. ‘मेडिटेशन’ मध्येही त्यांना रस आहे. अभियंता व कंत्राटदार असलेले पती धनंजय यांचे मोठे पाठबळ त्यांना लाभले आहे. मुलगा ऋषिकेश ‘केमिकल इंजिनिअरिंग ला असून, वेदिका या पदवीधर मुलीने टूर ॲण्ड ट्रॅव्हल्स क्षेत्रात स्टार्ट अप सुरू केला आहे.गायत्री मुळीकस ९५४५५९०७४५.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.