Agriculture Success Story : शेतकरी आणि संघर्ष या दोन बाबी म्हणजे एकमेकांची सोबतच जणू. वाशीम जिल्ह्यात मंगरूळपीर तालुक्यातील कासोळा येथील रामेश्वर वसंतराव ठाकरे हे अशा संघर्षातून मार्ग काढणारे, प्रयोगशील आणि जिद्दी शेतकरी आहेत. अपयश पचवून, त्यातून शिकत शेतीत नवनवीन प्रयोग राबवण्याची वृत्ती त्यांनी कधीच सोडली नाही. म्हणूनच शेतीत पुन्हा चांगले यश मिळवून गावातील आदर्श शेतकरी म्हणून ओळख निर्माण करण्यापर्यंत त्यांनी यश मिळवले आहे. .हार मानेल तो शेतकरी कसला?ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वी जवळची सर्व पुंजी गुंतवून एक एकर क्षेत्रात द्राक्ष बाग उभारली. द्राक्षवेली चांगल्या जुळूनही आल्या. तीन वर्षे बाग मोठ्या कष्टाने जोपासली. मात्र हवामान बदलाचे चटके बसू लागले. परतीच्या पावसामुळे द्राक्षघडांना तडे जात होते. खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ बसेना. दरवर्षी लाखांवर खर्च येत होता आणि पैसे थोडेच हाती पडत होते. हे अर्थकारण परवडणारे नाही हे लक्षात येताच तीन वर्षांपूर्वी बाग काढून टाकावी लागली. हा प्रयोग तडीस गेला नसला तरी ठाकरे यांनी कच खाल्ली नाही. .त्यांनी अभ्यास व पूर्ण विचारांती बागेच्या स्ट्रक्चरवरच वेलवर्गीय पिके घेण्याचा निर्णय घेतला. पुढे हा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध झाले. आज ते बागेच्या स्ट्रक्चरवर मे महिन्यात दोडका घेतात. त्याची काढणी झाल्यानंतर कारल्याचे पीक घेतात. तालुक्याच्या ठिकाणी दोन्ही शेतीमालाची विक्री होते. दोडक्याला किलोला २५ ते ३० रुपयांपासून कमाल ७० ते ८० रुपयांपर्यंत, तर कारल्याला सरासरी ३५ रुपयांपर्यंत दर मिळतो. याच क्षेत्रात ३० हजार रुपये खर्च करून करटुल्याचे पीक घेण्याचाही प्रयत्न केला. परंतु त्याचे बियाणे अस्सल न निघाल्याने उत्पादन मिळाले नाही. सर्व पैसे पाण्यात गेले. प्रयोग फसला. पण हार मानेल तो शेतकरी कसला? ठाकरे यांनी अन्य पर्याय शोधण्यास सुरुवात केली..शून्य मशागत तंत्राने शेतीशेतीतील अपयशे बाजूला करीत आपल्या साडेसहा एकर शेतीत पिकांची विविधता जपण्यावर ठाकरे यांनी भर दिला. म्हणजे एका पिकात नुकसान झाले तरी अन्य पिकांचा पर्याय ठेवण्याची पद्धत वापरली. मागील काही वर्षांपासून जाणीवपूर्वक रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय शेतीवर अधिक भर दिला आहे. हंगामी पीकपद्धतीच मागील तीन वर्षांपासून सुमारे दोन एकरांत शून्य मशागत तंत्राचा वापर सुरू केला आहे. यात खरिपात गादीवाफ्यावर सोयाबीन, त्याच्या काढणीनंतर रब्बीत हरभरा व त्याच्या काढणीनंतर उन्हाळ्यात मूग अशी तीन पिके घेण्यात येतात. .Agriculture Success Story: महिला शेतकरी कंपनीपर्यंत रेवतीताईंचा प्रवास....या तंत्राच्या वापरामुळे मशागतीच्या खर्चात मोठी बचत होऊ लागली आहे. या पद्धतीत सोयाबीनचे एकरी १६ किलो बियाणे ते वापरतात. या तंत्राच्या शेतीद्वारे पहिल्या वर्षी सोयाबीनचे एकरी १० ते १२ क्विंटलपर्यंत, दुसऱ्या वर्षी (मागील वर्षी) हेच उत्पादन १४ क्विंटलपर्यंत पोहोचले. यंदाही पीक चांगल्या स्थितीत आहे. हरभऱ्याचे दोन वर्षांत एकरी १० ते १३ क्विंटलपर्यंत, तर मुगाचे पाच क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले आहे. सोयाबीनला प्रति क्विंटल ४५०० रुपये, हरभऱ्याला ५७०० रुपये, तर मुगाला सातहजारांपर्यंत दर मिळाले आहेत. शून्य मशागत तंत्रामुळे पीक अवशेष जागेवरच कुजत असल्याने जमिनीची सुपीकता वाढण्यासही मदत होत आहे. सहायक कृषी अधिकारी रामकिसन आरू यांनी माती परीक्षणासाठी मदत केली आहे. त्यामुळे जमिनीतील कमतरता दिसून येऊन त्यानुसार खतांचे नियोजन करणे शक्य झाले आहे..शेततळ्यात मत्स्य व्यवसायठाकरे यांना सन २०११-१२ मध्ये राष्ट्रीय कडधान्य अभियानांतर्गत २४ बाय २४ मीटर आकाराचे शेततळे मंजूर झाले. अनुदान स्वरूपात कृषी विभागाकडून एक लाख रुपये अनुदान देण्यात आले. त्यानंतर शेततळ्याचे अस्तरीकरण स्वतः शेततळ्याद्वारे शाश्वत जलस्रोत उपलब्ध केलाच, मात्र त्यात मत्स्यपालन करून अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोतही तयार केला आहे. दरवर्षी जुलै महिन्यामध्ये शेततळ्यात रोहू, कटला आदींचे मत्स्यबीज सोडले जाते. एक बॅच पूर्ण झाल्यानंतर माशाचे सरासरी सव्वा ते दीड किलोपर्यंत वजन मिळते. परिसरातील मत्स व्यावसायिक जागेवर येऊन किलोला १०० रुपयांच्या आसपास दराने मासे घेऊन जातात. मासे पकडण्याचे काम देखील ते करतात. त्याचा मेहनताना त्यांना किलोला २० रुपये याप्रमाणे द्यावा लागतो. वर्षाला या पूरक व्यवसायातून ६० ते ६५ हजारांचे उत्पन्न मिळते..Agriculture Success Story: नाशिकच्या मातीत घेतले ‘ॲव्होकॅडो’चे यशस्वी उत्पादन.शेतीतून साधली प्रगतीरामेश्वर यांना पत्नी दुर्गा यांची शेतीत मोठी साथ मिळते. त्यामुळेच शेतीतील कष्ट सुकर झाल्याची भावना ते व्यक्त करतात. शेतीतील उत्पन्नातूनच गावात टुमदार बंगला बांधता आला. मुलांना उच्च शिक्षण देता आले. मुलगी अश्विनी इंजिनिअर असून तिचा विवाह झाला आहे. दुसरी मुलगी दिव्या स्पर्धा परीक्षेची तयारी करते. मुलगा संचितने डी-फार्मसीचे शिक्षण घेतले आहे. सध्या तो कापड व्यवसायात व्यस्त आहे. आज कुठलेही कर्ज नसल्याचे ठाकरे अभिमानाने सांगतात..जलतारा स्पर्धेत सहभागवाशीम जिल्हा प्रशासनाने राबवलेल्या जलतारा (शोषखड्डा) स्पर्धेत ठाकरे यांनी सक्रिय सहभागी होत तीन ते चार ठिकाणी शोषखड्डे तयार केले. त्यामुळे पाण्याचा निचरा सुधारला. शेतातील विहिरीची पातळी १० ते १२ फुटांनी वाढली आहे. अन्य शेतकऱ्यांनाही ठाकरे यांनी जलतारा निर्मितीसाठी प्रेरणा दिली आहे. ठाकरे सामाजिक कार्यातही अग्रेसर असून गावातील विविध उपक्रमात पुढाकार घेतात.रामेश्वर ठाकरे ९९२२०९५६२५.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.