Agriculture Success Story : वैभववाडी तालुका हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे टोक मानले जाते. वैभववाडी शहर आणि कोकिसरे गाव यामध्ये बारमाही वाहणाऱ्या शांती नदीची हद्द आहे. शहरालगत असल्याने नदीलगत लोकवस्ती वाढली आहे. शहरापासून दोन- तीन किलोमीटरवर कोकिसरे बोर्चीवाडी गाव आहे. येथील बहुतांशी शेतकरी खरीप हंगामात भात, नाचणी पिकांची लागवड करतात. तर रब्बी हंगामात भुईमूग, चवळी, मूग, वाल तसेच भाजीपाल्यासारखी पिके घेतात. शांती नदी आणि खांबलवाडी लघुसिंचन प्रकल्प यामुळे या भागात ऊसशेती देखील बाळसे धरू लागली आहे. .जगण्यासाठीचा संघर्षयाच कोकिसरे बोर्चीवाडीत संतोष गोविंद इस्वलकर राहतात. त्यांची पाच एकर शेती आहे. त्यातील दोन एकरांत ते भात घेतात. एक एकरात उन्हाळ्यात मूग, वाल, कुळीथ,चवळी आदी पिके त्यांच्याकडे असतात. त्यांच्या घरापासून काही अंतरावरून शांती नदी वाहते. नैसर्गिकदृष्ट्या समृध्द असा हा भाग आहे. संतोष याचे बालपण, शिक्षण येथेच झाले. घरची कमजोर आर्थिक परिस्थिती व शेतातील उत्पन्नाला मर्यादा असल्याने लहानवयापासूनच संतोष यांच्या वाट्याला संघर्ष आला. दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी वैभववाडी येथील स्टेशनरी दुकानात काम करण्यास सुरवात केली..Dairy Farming : दुग्ध व प्रक्रिया व्यवसायातून शोधला आनंद .शेती आणि तुटपुंज्या पगारातील नोकरीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह कसाबसा चालायचा. त्यानंतर परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी स्वतःची पानटपरी सुरू करण्याचे ठरवले. तळेरे- कोल्हापूर महामार्गालगत एका हॉटेलबाहेर हा व्यवसाय सुरूही केला. सोबत अन्य वस्तूही तेथे मिळू लागल्या. कामाप्रति निष्ठा असल्याने पानटपरीचा व्यवसाय उत्तमपणे चालत होता. मात्र काही वर्षांपूर्वी स्टॉल हटाव मोहीम शहरात राबविण्यास सुरवात झाली. यामध्ये संतोष यांची टपरी देखील हटविण्यात आली. मोठी आपत्ती त्यांच्यावर कोसळली. परंतु जिद्दी संतोष यांनी एका हॉटेलबाहेरच्या गाळ्यात आपला व्यवसाय सुरू केला.तेथेही दोन तीन वर्षे पानटपरी चालविली. परंतु काही कारणास्तव तीही बंद करावी लागली..समस्यांनीच दिले दुग्धव्यवसायाला बळजगण्यासाठी, संसार चालवण्यासाठी सतत धडपड करण्याची गरज होती. त्यातून रिक्षा व्यवसाय बरा वाटला. दोन- तीन वर्षे प्रामाणिकपणे हा व्यवसाय केला. वैभववाडी रेल्वे स्थानक एक- दीड किलोमीटरवर असल्यामुळे व्यवसायात जम बसला. नेमके त्याचवेळी कोरोनाचे संकट ओढविले. रोजीरोटीचा एकमेव असलेला रिक्षा व्यवसाय ठप्प झाला. त्यामुळे आर्थिक स्त्रोतच बंद झाला. कोरोनाची झळ सर्वाबरोबर संतोष यांनाही बसली. त्या काळात फळे, भाज्यांप्रमाणे जीवनावश्यक वस्तुंची विक्री मात्र सुरू होती. त्यामध्ये दुधाचा समावेश होता. त्यावेळी दुग्ध व्यवसाय कधीही संकटात सापडणार नाही याची संतोष यांना खात्री पटली. त्याला कारणही तसेच होते. त्यांच्या घरी वडिलोपार्जित एका म्हशीचे पालन केले जायचे. परंतु त्याला व्यावसायिक स्वरूप नव्हते. मात्र जनावरे संगोपनातील अनुभव मात्र संतोष यांच्याकडे लहानपणापासूनच तयार झाला होता. याच व्यवसायात प्रगती करायचे त्यांनी ठरवले..व्यवसायाला आली गतीम्हशींची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवण्यास सुरवात झाली. तसतसे दूधसंकलनही काही प्रमाणात वाढू लागले. सन २०२० च्या दरम्यान मिरज (जि. सांगली) येथून मुऱ्हा जातीची म्हैस खरेदी केली. त्यासाठी ९५ हजार रुपयांची स्वगुंतवणुक केली. महिनाभराने जिल्हा बँकेकडून ७५ हजार आणि काही स्वगुंतवणूक करून आणखी एक मुऱ्हा म्हैस घेतली. सन २०२३ मध्ये हरियानातून एक लाख ४० हजार रुपये किमतीची म्हैस घेतली. त्यासाठी जिल्हा बँकेकडून कर्ज घेतले. सुरवातीचा काही काळ डेअरीला दुधाला पुरवठा केला. परंतु दुधाला मिळणारा दर हा तुलनेत खूप कमी होता. त्यामुळे दुधाची थेट विक्री करण्याचे प्रयत्न सुरू केले. पानटपरी, रिक्षा व्यवसाय यांच्या माध्यमातून संतोष वैभववाडी शहर परिसरात सर्वांच्या परिचयाचे होते. त्याचा फायदा झाला. शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापक यांच्याशी संपर्क साधण्यास सुरवात केली. अनेकांनी क्षणाचाही विलंब न करता तत्काळ दररोज दूध खरेदी करण्याची तयारी दर्शवली. संतोष यांचा आत्मविश्वास व हुरूप वाढू लागला. त्यातून व्यवसायाला गती प्राप्त झाली..Dairy Farming: दुधातील फॅट, एसएनएफवर परिणाम करणारे घटक.व्यवसायाचे आजचे स्वरूपआज दुग्ध व्यवसायात सुमारे सहा वर्षांचा अनुभव तयार झाला आहे. सुरवातीच्या एक म्हशीपासून आज म्हशींची संख्या सातपर्यंत पोचवली आहे. म्हशींचे मुक्तपालन केले जाते. माळरानावर मुबलक गवत उपलब्ध असल्यामुळे सकाळी आठ ते अकरा आणि सायंकाळी चार ते साडेसहा या वेळेत त्यांना चरावयास नेण्यात येते. बाकी आवश्यक धान्य भुस्सा, पेंडी आदींचा वापर होतोच. उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याची चणचण भासू नये यासाठी मका, हत्तीगवत यांची लागवड केली आहे. संतोष यांना पत्नी स्वरा यांची शेतीसह दुग्धव्यवसायात मोठी मदत होते. दोघांच्या एकत्रित कष्टामुळेच घरची आर्थिक घडी व्यवस्थित बसली आहे. मजूर ठेवण्याची गरज भासलेली नाही. दांपत्याचा दिवस पहाटे पाच वाजल्यापासून सुरू होतो. वर्षभराची सरासरी पाहिली तर प्रति दिन २२ ते २५ लिटर दूधसंकलन होते. रोजचे १० ते १५ ग्राहक आहेत. घरापासून शहरातील बाजार परिसरात तीन किलोमीटर परिसरातच ग्राहक राहत असल्याने संतोष दुचाकीवरून दररोज दुधाचा रतीब देतात. पूर्वीपासून एका हॉटेलला दुधाचा पुरवठा व्हायचा. तेही ग्राहक आज टिकवले आहे. सचोटी, प्रामाणिकपणा तसेच दुधाची गुणवत्ता जपल्याने ग्राहक समाधानी आहेत. मागणी सतत वाढती आहे. थेट विक्रीतून प्रति लिटर ७० रुपये दर मिळतो. व्यवसायातून वर्षाला पाच लाख ते सहा लाखांच्या आसपास उलाढाल होते. शिवाय भातशेतीचे उत्पन्न कुटुंबासाठी आधारभूत ठरले आहे..अशी झाली प्रगतीमनासारखी प्रगती झाली. मिळणाऱ्या उत्पन्नातून ३० ते ४० हजार रुपये खर्चून गोठा दुरुस्ती करता आली. सन २०२३ मध्ये २४ हजार रुपये किमतीचे कडबा कुट्टी यंत्र, ४५ हजार रुपये किमतीचे पॉवर वीडर आणि ४० हजार रुपये किमतीचे भातझोडणी यंत्र खरेदी केले. नियमित, ताजे उत्पन्न सुरू झाल्याने आर्थिक नियोजन सोपे झाले. घरांची दुरुस्ती केली. अंगण बांधकाम केले. घरच्या शेतीत शेणखताचा मुबलक वापर करता येत आहे. गरजेनुसार त्याची विक्री देखील केली जाते. संतोष यांना एकेकाळी जगण्यासाठी संघर्ष करावा लागला. नुकसान सोसले. समस्यांना तोंड दिले. मात्र मोठ्या चिकाटीने त्यांनी दुग्धव्यवसाय सुरू करून तो टिकवला. वाढवला. सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त केली. आयुष्यात मानसिक व आर्थिक समाधान मिळवले. प्रयत्नांची दखल घेत वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाने २०२२-२३ चा उत्कृष्ट पशुपालक पुरस्काराने संतोष यांना सन्मानित केले आहे.संतोष इस्वलकर ७५१७२५४५५२.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.