सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धालवली (ता.देवगड) येथील दीपक व सुगंधा या सरवणकर दांपत्याकडे पूर्वी प्रत्येकी एक भाकड गाय आणि म्हैस होती. त्यांनी उत्तम पैदास निर्मिती (ब्रिडिंग) तंत्राचा सखोल अभ्यास करून देशी जनावरांची वंशावळ सुधारली. दूध उत्पादकता वाढवण्याचा प्रयत्न केला. आजमितीला रोजचे दूध संकलन १५० लिटरपर्यंत आहे. त्यातून कोकणात दुग्धव्यवसायातून अर्थकारणाला गती देण्यात दांपत्याला यश मिळाले आहे. .सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धालवली हे मुंबई-गोवा महामार्गावरील खारेपाटणपासून आठ किलोमीटरवर असलेले गाव आहे. प्रसिद्ध वाघोटन खाडीचे पात्र या गावात आहे. अर्थात या खाडीमुळेच गावात दरवर्षी पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात शेतात घुसते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. गावात आंबा, काजूच्या बागा आहेत. येथील शेतकरी खरिपात भात, नाचणीसह रब्बीत कुळीथ, मूग, मटकी, चवळी, उडीद अशी पिके घेतात. +खाऱ्या पाण्याच्या परिसरात येत असल्याने या कडधान्यांना विशिष्ट चव असते. त्यामुळे बाजारपेठेपेक्षा ३० ते ४० रुपये अधिक दराने येथील कडधान्ये पुणे, मुंबई, कोल्हापूरसारख्या शहरातील ग्राहक खरेदी करतात. येथील मटकीला प्रचंड मागणी असते. .सरवणकरांची शेती याच गावातील दीपक सरवणकर यांची संयुक्त कुटुंबाची सात एकर तर वैयक्तिक एक एकर शेती आहे. खाडीच्या पाण्यामुळे भात आणि कडधान्ये एवढीच पिके ते घेतात. दहावी व त्यानंतर इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन शाखेतील तीन वर्षाचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला. त्यानंतर गावीच इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरुस्तीचा व्यवसाय सुरू केला. त्यात त्यांनी चांगली आर्थिक स्थैर्यही मिळवले. परिसरातील गावांमधून ग्राहक त्यांना वस्तू दुरुस्तीसाठी बोलावीत. हा व्यवसाय पाच- सहा वर्षे केला. या व्यवसायाला अजून आर्थिक जोड देण्याची गरज होती. धालवली परिसरात मोठ्या प्रमाणात भात घेण्यात येतो. त्या तुलनेत अद्ययावत राइस मिल परिसरात नव्हती. त्यामुळे सरवरणकर यांनी मिल सुरू करण्याचा निर्णय घेतला. .राईसमिलने दिला टर्निंग पॉइंट राइस मिल व्यवसायाला आवश्यक टेम्पो खरेदी केल्यानंतर त्याच्या परवान्यासाठी दीपक कुडाळ येथील संबंधित कार्यालयात गेले होते. त्यावेळी कुडाळ तालुक्यातील मित्र भेटला. या भागातील जनावरांचा मालक आपली भाकड गाय आणि म्हैस मोफत देणार असून तुला ती घ्यायची आहे का असे त्या मित्राने विचारले. त्यावेळी दुग्धव्यवसाय सुरू करण्याची ही चांगली संधी असल्याचे दीपक यांना जाणवले. प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन त्यांनी जनावरे पाहिली. घरातील मंडळींशी चर्चा केली. अधिक वेळ न दवडता दोन्ही जनावरे घरी आणली देखील. .तंत्रशुद्ध पैदाशीवर भरपंधरा वर्षापूर्वी या परिसरात जनावरे संगोपन विषयातील मार्गदर्शन व सेवा यंत्रणा आजच्याएवढी विकसित नव्हती. मात्र जिद्दी दीपक यांनी खारेपाटण येथे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. धर्माजी भुते यांची भेट घेऊन सल्ला घेतला. त्यानुसार दोन्ही जनावरांच्या वैद्यकीय तपासण्या झाल्या. डॉ, भुते यांनी काही उपचारही सांगितले. भाकड जनावरे व त्यांच्यावरील उपचार हा परिसरातील लोकांसाठी चेष्टेचा विषय ठरू लागला. वेळ आणि पैसा अशा दोन्ही गोष्टी तू वाया घालवीत असल्याचे काही लोक म्हणू लागले. परंतु तिकडे लक्ष न देता तज्ज्ञांचे मार्गदर्शन, उपचार, स्वअभ्यासातून तंत्रवापर व व्यवस्थापन सुधारणा यावर दीपक यांनी अधिक भर दिला. त्यातून पुढे दोन्ही जनावरे गाभण राहिली. .पैदास तंत्रावर दिला भर दरम्यान जिल्ह्यातील पोंभुर्ले येथील दुग्धोत्पादक दत्तप्रसाद जांभेकर यांनी जनावरांच्या सेक्स सॉर्टेड सिमेन या आधुनिक तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले. या पैदास तंत्रज्ञानात कालवड होण्याचीच शक्यता सर्वाधिक असते. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील दत्तवाड येथील दुग्धोत्पादक अप्पासो पाटील यांचेही मार्गदर्शन मिळाले. त्यांच्याकडून जातिवंत गीर वळूचे सिमेन स्ट्रॉच्या स्वरूपात मिळाले. त्यातून या देशी गायीची वंशावळ सुधारण्यास मदत झाली. पूर्वी ही गाय एका वेळेला केवळ दीड लिटर दूध द्यायची. आता तिची कालवड पाच लिटर दूध देऊ लागली. म्हशीचीही वंशसुधारणा करण्यास सुरवात झाली. ‘एनडीडीबी’ या देशातील अग्रणी संस्थेकडील उच्चक्षमतेच्या व जातिवंत रेड्यांच्या विविध जातींच्या सिमेनचा वापर केला. त्यातून दर्जेदार कालवडी जन्माला आल्या. .व्यवसायाचे फलितदीपक यांच्या तंत्रशुद्ध व्यवस्थापनाची प्रेरणा मिळून परिसरातील शेतकऱ्यांनीही हा व्यवसाय सुरू केला आहे. दीपक यांनी स्वतःचे दूध संकलन केंद्र सुरू केले. त्यांच्या गोठ्यातील २५ लिटरपर्यंत तर अन्य परिसरातील मिळून दीडशे लिटरपर्यंत दूध संकलन होते. अमूल कंपनीला पुरवठा होतो. म्हशीच्या दुधाला सरासरी ६३ रुपये तर गायीच्या दुधाला ३४ रुपये प्रति लिटर दर मिळतो. व्यवसायातून वर्षभर ताजे उत्पन्न मिळण्याची सोय झाली आहे. .वार्षिक सात लाख ३४ हजार रुपयांची उलाढाल होते. आंबा काजू आदी पिकांमधूनही ८० हजार रुपयांपर्यंत उलाढाल होते. त्यातून शेती व कुटुंबाचे अर्थकारण उंचावणे दांपत्याला शक्य झाले आहे. याच व्यवसायातून कडबा कुट्टी यंत्र घेता आले. सन २०२४ मध्ये जिल्हा बँकेकडून कर्ज मिळून हरियानातून दोन म्हशी घेता आल्या. स्व गुंतवणुकीतून ६०० चौरस फुटाचा पक्का गोठा बांधला..आले व्यावसायिक स्वरूप आज आपल्या दुग्धव्यवसायाला चांगल्या आर्थिक क्षमतेपर्यंत पोचवण्यापर्यंत दीपक यांनी चांगले यश मिळवले आहे. त्यांना साथ मिळली ती पत्नी सुगंधा यांची. एकमेकांच्या साथीने दोघे अहोरात्र राबतात.ज्ञानाची देवाणघेवाण करतात. आजमितीला गोठ्यातील गायी व म्हशी मिळून १२ व हरियानातून अलीकडेच आणलेल्या दोन म्हशी अशी एकूण १४ जनावरे आहेत. सुपर नेपियर व अन्य प्रकारच्या चाऱ्यासाठी काही क्षेत्र राखीव ठेवले आहे. गोठ्याचे ठिकाण जंगलमय वातावरणात आहे. तेथे जनावरे मुक्तसंचार करतात. पावसाळ्यात येथे मुबलक चारा असतो.दीपक सरवणकर ८२६२९४४८७३, ९२०९३१३१०९.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.