Milk Revolution Kolhapur : कोल्हापूर जिल्हा निसर्गसंपन्न, हिरवळीत न्हालेला, मेहनती माणसांच्या घामाने ओला झालेला. इथल्या शेतकरी कुटुंबांच्या जीवनात गाई-म्हशी म्हणजे केवळ जनावरे नसून उपजीविकेचा आधारच. या कष्टाला योग्य किंमत मिळवून देत महिलांना नवा आत्मविश्वास दिला तो सहकारी दूध संघांनी. पूर्वी गावोगावच्या अंगणात स्त्रिया गाई-म्हशी पाळत, दूध काढत पण त्यांना घराबाहेर स्वतःचं नाव नव्हतं. पुरुषच बाजारपेठेत जात. स्त्रिया मागे पडलेल्या. दूध संघांनी ही प्रथा मोडून काढली. उत्पादकांना फायद्याचे गणित समजावून सांगितले. औषधोपचारासह दूध विक्री पर्यंत ‘डोअर टू डोअर’ सुविधा दिल्या. यामुळे महिलांचा आत्मविश्वास दुणावला. ज्येष्ठ महिलेपासून ते युवतीपर्यंत दुग्ध व्यवसाय स्वीकारला गेला. एका म्हशीपासून ते शेकडो गाई व म्हशींचा सांभाळ करण्याचे कसब महिलांनी लिलया सांभाळले. दूध संकलन केंद्रात आज स्त्रिया स्वतः दूध ओततात, हिशेब करतात आणि स्वतःच्या कमाईचा हक्काने उपयोग करतात..गोकूळ, वारणा आदींसह अन्य सहकारी दुग्ध संस्थांनी बाजारात पाऊल ठेवल्यापासून ग्रामीण भागात दुग्ध व्यवसाय विस्तारला. संघामध्ये जरूर स्पर्धा आहे, पण ती विधायक आहे. अनेक सुविधा देत शेतकऱ्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न झाला. ज्या उत्पादकाला जो संघ फायदेशीर ठरेल तिकडे उत्पादक दूध देऊ लागले.या व्यवसायाला महिलांच्या कष्टांची झालर असल्याने संघांनी महिला उत्पादकांना प्रशिक्षण देवून त्यांना तांत्रिक मार्गदर्शन केले. विशेष सहली, तज्ज्ञांच्या भेटी वाढवत सभासदांचा गोठा निर्जंतुक व चांगला राहील याची खबरदारी घेतली. फोन केला की संघाचा कर्मचारी हजर अशी सेवा ठेवली यामुळे अनेक महिलांना उत्साह आला. रिबेट सारख्या फरकेच्या रक्कमेने सणावारांच्या खर्चाची बेगमी झाली. वासरू संगोपन योजना, कर्ज योजनांमुळे जनावरे वाढविण्यासाठीचा ताणही कमी झाला. यामुळे अनेक खेड्यांनी दूध क्रांती केली. छोट्या गावातही हजारो लिटर दूध संकलन होऊ लागले. पूर्वीच्या काळात, ग्रामीण भागातील महिलांचे जीवन घराच्या चार भिंतींच्या आतच बंदिस्त होतं. त्यांची ओळख ‘कोणाची तरी बायको’, ‘कोणाची तरी आई’ एवढ्यापुरतीच मर्यादित होती. त्यांचे जग फक्त चूल आणि मूल एवढंच होतं. कुटुंबातील आर्थिक निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना नव्हता. रोजच्या गरजांसाठीही त्यांना नवऱ्यावर किंवा कुटुंबातील इतर पुरुषांवर अवलंबून राहावं लागत असे. पण जेव्हापासून गावात सहकारी दुग्ध संस्था सुरू झाल्या, तेव्हापासून त्यांच्या आयुष्यात एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली. हा अध्याय आहे स्वावलंबन, आत्मसन्मान आणि सक्षमतेचा..Dairy Farming Success : संघर्षाला मिळाला पूर्णविराम.गावातील प्रत्येक घरात पहाटेची सुरुवात आता वेगळ्या पद्धतीने होते. सूर्य उगवण्याआधीच महिला आपल्या गोठ्यात जातात. त्यांच्या गाई-म्हशींना हाक मारतात, त्यांच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवतात. हा केवळ एक व्यवहार नाही, तर एक भावनिक बंध आहे. त्यांच्या मेहनतीचं प्रतीक असलेलं दूध काढताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास दिसतो. ते दूध आता फक्त घरातील वापरासाठी नाही, तर त्यांच्या भविष्यासाठी, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या स्वप्नांसाठी आहे. हे दूध घेऊन त्या डेअरीच्या केंद्रावर जातात. पूर्वी एकलकोंड्या राहिलेल्या या महिला आता एकत्र आल्या आहेत. त्यांच्यात एकजुटीची भावना निर्माण झाली आहे. या डेअरीच्या केंद्रावर त्यांना फक्त पैसेच मिळत नाहीत, तर एक व्यासपीठ मिळतं, जिथे त्या मोकळेपणाने व्यक्त होऊ शकतात..सहकारी दुग्ध संस्थेमुळे महिलांना मिळणारे उत्पन्न जरी सुरुवातीला कमी असले, तरी त्यांच्यासाठी ते खूप महत्त्वाचे आहे. हे पैसे त्यांच्या स्वतःच्या मालकीचे आहेत. या पैशांचा वापर त्या आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी, घरातल्या लहानसहान गरजांसाठी करू शकतात. पूर्वी घरातल्या छोट्या गोष्टींसाठीही पतीकडे हात पसराव्या लागणाऱ्या या महिला आता आत्मनिर्भर झाल्या आहेत. त्यांच्या मुलांच्या हातात नवीन पुस्तकं, दप्तरे आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याची ताकद आता त्यांच्या स्वतःच्या कमाईत आहे. या आर्थिक स्वातंत्र्यामुळे त्यांच्यात एक मोठा बदल घडला आहे. घरातल्या निर्णयांमध्ये आता त्यांच्या मताला किंमत दिली जाते. त्या आता केवळ गृहिणी नाहीत, तर कुटुंबाच्या आर्थिक व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग बनल्या आहेत. त्यांच्यात आलेला आत्मविश्वास त्यांच्या बोलण्यात, त्यांच्या वागण्यात स्पष्ट दिसतो. गावातल्या डेअरीच्या बैठकांमध्ये त्या सहभागी होतात. आपल्या समस्या आणि सूचना मांडतात. त्यांच्या या सहभागामुळे गावाच्या आणि डेअरीच्या विकासातही त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी केवळ स्वतःचे आयुष्यच नाही, तर आपल्या कुटुंबाचे आणि गावाचेही भविष्य बदलले आहे..महिलांमधील या बदलामुळे गावातील सामाजिक आणि आर्थिक जीवनशैलीतही मोठा फरक पडला. त्यांच्या कमाईमुळे कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारली. कुपोषण आणि गरिबी कमी होण्यास मदत झाली. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा स्तर वाढला. गावातील इतर महिलांनाही त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली आहे. ‘जर ती करू शकते, तर मी पण करू शकेन,’ ही भावना प्रत्येक महिलेच्या मनात रुजली. त्यामुळे एका महिलेच्या यशामुळे अनेक महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडत आहेत.सहकारी दुग्ध संस्था ही केवळ दुधाचा व्यवसाय करणारी संस्था नाही, तर ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणाचे एक महत्त्वाचे केंद्र बनली आहे. आज जेव्हा आपण एखाद्या गावात जातो, तेव्हा आपल्याला एक वेगळं चित्र दिसतं. आनंदाने, उत्साहाने काम करणाऱ्या महिला, त्यांच्या डोळ्यात भविष्याची स्वप्ने आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वासाचा एक नवा प्रकाश. हा प्रकाश आहे.स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा, स्वतःची ओळख निर्माण करण्याचा आणि स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार बनण्याचा. दुधाचा प्रत्येक थेंब त्यांच्या या प्रवासाची साक्ष देतो. सहकारी दुग्ध संस्थांनी ग्रामीण महिलांच्या आयुष्यात जो बदल घडवला आहे, तो केवळ आर्थिक नाही, तर तो त्यांचे अस्तित्व, आत्मसन्मान आणि स्वातंत्र्याला कवेत घेणारा आहे. आपल्या कष्टाच्या जोरावर यशस्वी झालेल्या महिलांचे अनुभव नक्कीच प्रेरणादायी आहेत. अनेक महिलांशी संवाद साधताना त्यांच्यातील आत्मविश्वास, व्यावसायिक वृत्ती निश्चितपणे सकारात्मक ऊर्जा देते..गोठा ते रॅंप...पहाटेचे चार वाजलेले. आकाश अजून काळोखाने झाकलेलं. गोठ्यात गाईंचा मंद आवाज घुमतोय. हातात बादली घेऊन अब्दुललाट (ता. शिरोळ) येथील पूनम पाटील आत शिरते. गाईला थोपटत ती कुजबुजते ‘गं, आजचं दूध आपल्या मेहनतीचा अभिमान ठरणार.’ तिच्या चेहऱ्यावर थकवा नसतो, उलट डोळ्यांत स्वप्नांची चमक असते.लहानपणापासूनच कष्ट पूनमच्या सोबतीला. संसाराची जबाबदारी, गाई-गुरांचं संगोपन, दूध विक्री या सर्वांच्या पलीकडेही तिच्या मनात एक आवाज सतत घुमायचा- मी काहीतरी वेगळं करून दाखवणार.‘आपण गाईंच्या संगोपनात थोडं विज्ञान आणलं, मशिनने दूध काढलं, पोषणाचं नीट नियोजन केलं तर?’ पूनमनं नवऱ्याला विचारलं. नवरा हसून म्हणाला, ‘तुझ्यातली जिद्द मला आवडते. करूया प्रयत्न.’ आणि मग गोठा झाला आदर्श. गावकरी म्हणू लागले, ‘पूनमचा गोठा म्हणजे शिकण्यासारखी शाळा.’साधी गावाकडची स्त्री पण तिने गोठ्यात विज्ञान आणलं. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गाईंचं संगोपन केलं. पशुपालनाच्या जुन्या पद्धतींना आधुनिकतेची जोड दिली. दूध संघाला दूध पुरवठा करून आर्थिक गणित जुळवले. तिच्या गोठ्याने हळूहळू आदर्श गोठ्याचं रूप घेतलं. गावकुसाबाहेरचं जग तिच्या यशोगाथेकडे पाहू लागलं. पण पूनमची कहाणी इथेच संपली नाही. एक दिवस तिला संधी मिळाली. फॅशन शोच्या रॅम्पवर चालण्याची!ती संध्याकाळ वेगळीच होती. सभागृह झगमगून गेलेलं, कानठळ्या बसवणारा टाळ्यांचा गजर, झगझगीत दिव्यांचा प्रकाश आणि त्यात उभं असलेलं पूनमचं साधं, पण आत्मविश्वासानं उजळलेलं रूप. क्षणभर तिच्या मनात भीती होती. ‘मी? गावाकडची? गोठ्यातली?’ पण पुढच्याच क्षणी तिने स्वतःलाच कुजबुजलं, ‘ज्या पायांनी गोठ्यातील चिखल तुडवला आहे, तेच पाय रॅम्पवर चालायला कमी पडतील का?’ मग ती रॅम्पवर उतरली. त्या प्रत्येक पावलात आत्मविश्वास दाटून वाहत होता. प्रेक्षकांचा टाळ्यांचा गजर जणू सांगत होता- ‘पूनम, तू जिंकलीस!’ तिच्या चेहऱ्यावरचं हास्य हे केवळ सौंदर्याचं नव्हतं, तर संघर्षावर मात केलेल्या स्त्रीच्या विजयाचं प्रतीक होतं. शेणामूतापासून लांब जात शेती, गोठ्याला नावे ठेवणाऱ्या आजच्या युवा पिढीला सणसणीत उत्तर देणारं. शेणामूतातील हातपायही रॅंपवर चालत आज गोठा व्यवसायाला प्रतिष्ठा देत आहेत.- पूनम पाटील, ९९२२८१२२४७.Dairy Farming Success : प्रतिकूल परिस्थितीवर केली धीरोदात्तपणे मात.त्यांचं दूध आमचं आयुष्य फुलवतंय...कोदवडे (ता. राधानगरी) हे करवीर व राधानगरी तालुक्याच्या सीमेवरील हिरवाईने नटलेलं गाव. या गावात सविता रंगराव पाटील यांचा पतीच्या साह्याने वाढवत नेलेला चाळीस जनावरांचा गोठा आहे. ‘गोकुळ’सारख्या सहकारी संस्थेतून अनेक लाभ घेत उत्पन्नाचा मुख्य स्रोत बनविला आहे. त्या विषयी सविता सांगतात, “त्या दिवसात चारच गाई होत्या. एकेका गाईकडे बघताना त्यात आपलं भवितव्यच दिसायचं. त्यातच घराची गरज भागवायची, मुलांचं भविष्य घडवायचं!” चार गाईंतून हळूहळू त्यांनी जनावरांची संख्या वाढवत नेली. फक्त गाईमध्ये गुंतवणूक करून न थांबता हरियाना, गवळाट, मुऱ्हा जातींच्या म्हशी खरेदी केल्या. सध्या त्यांच्या गोठ्यात दोन खिलार बैल, तीन खिलार पाडी, सात एचएफ गाई आणि चाळीस म्हशी आहेत. सकाळ-संध्याकाळ गोकुळला सव्वाशे ते दीडशे लिटर दूध जातं. जनावरांवर संपूर्ण कुटुंब जीव लावतं. पती रंगराव यांच्या भक्कम साथीने सासरे सदाशिव पाटील, सासूबाई मालूबाई यांच्या साथीने जनावरांची देखभाल सुरू आहे. “आम्ही म्हातारे झालो तरी जनावरांच्या सेवेतला आनंद वेगळाच आहे. जनावरं म्हणजे घरचेच सदस्य,” असे सविता यांच्या सासूबाई मालूताई म्हणतात. सविता यांची मुले रुद्र व स्वराली हे शालेय शिक्षण घेत आहेत. हळूहळू करत आजवर सुमारे चाळीस लाखांची गुंतवणूक झाली आहे. सहकारी दूध संस्थांच्या माध्यमातून मिळणाऱ्या सबसिडी, विमा योजना, वैरण अनुदान, वासरू संगोपन योजना या सर्व सुविधा व्यवसायाला बळ देतात. पण खरी ताकद कष्टाची आहे. बाहेरच्या व्यक्तीवर विसंबून न राहता परिश्रम केल्यानेच आज वर्षाला सहा ते सात लाखांचे उत्पन्न पाटील कुटुंबीय मिळवीत आहे.‘‘कोरोनाचा काळ असो वा महापुराची झळ, अनेक वेळा अडचणी आल्या. संकटं आली, पण आम्ही पाय रोवून उभे राहिलो. जनावरे आमचं बळ आहेत, त्यांचं दूध आमचं आयुष्य फुलवतंय,” असे सांगताना सविता भावनिक होतात. - सविता पाटील ९८६०४३४४१७.हा निखळ आनंद कोण हिरावू शकतो?कळंबे तर्फ कळे (ता. करवीर) या गावात सूर्याचं तांबडं फुटायच्या आधीच अर्चना हिंमतराव देसाईंच्या गोठ्यातला दिवा लागलेला असतो. गाईंचा गोंगाट, भिजक्या चाऱ्याचा सुगंध, आणि दूध काढणाऱ्या मशिनचा हलका आवाज, पक्ष्यांच्या किलबिलाटाआधी सुरू होतो. त्यांच्याकडच्या एच.एफ. जातीच्या गाई म्हणजे त्याची लेकरंच. कोणाचं दूध कमी झालं, कोणाच्या डोळ्यात पाणी आलं, कुणाचं रवंथ थांबलं हे सगळं त्यांच्या बारीक नजरेतून सुटत नाही. बाहेर कुठंबी कितीबी कामं असली, तरी गाईंना वैरणींची ओंजळ आणि पाणी दिल्याशिवाय, त्यांच्या अंगावरून हात फिरवल्याशिवाय उबदार वाटत नाही. ‘गोठ्यात गाय हवीच,’ या त्यांचा हट्टाखातर कर्ज काढून गाय आणली. रिकामा गोठा त्यांच्या अंगावर येतो. त्यांची उलाघाल वाढते. गाईंच्या श्वासात आपलं जगणं ऐकू येतं. घरातलं कोणी आजारी पडलं तर डॉक्टर बोलावता येतो, पण गोठा रिकामा राहिला तर त्यांचं मन आजारी पडतं. या गाईंच्या प्रेमातूनच त्यांनी स्वतःची दूध संस्था उभी केली. अर्चना स्वतः अध्यक्ष आहेत. मशिननं दूध काढणं, गोठ्यात स्वच्छता ठेवणं, चारापाणी वेळेवर देणं या सगळ्या छोट्या गोष्टींना त्यांनी आधुनिकतेचा स्पर्श दिला. पण गाईंशी बोलणं, त्यांना हाताने कुरवाळणं, डोक्यावरून हात फिरवणं, हा आपलेपणाचा स्पर्श त्यांनी कधी कमी होऊ दिला नाही. बाहेरचं जग विचारतं, ‘‘इतका कष्ट करून काय मिळतं?’’ तेव्हा त्यांच्या डोळ्यांत नेहमी चमकते ती समाधानाची ठिणगी. केवळ दूध काढणं आणि विकणं म्हणजे दूध व्यवसाय नाही. गाईला जीव लावला तर त्या तुमचं आयुष्यच सुंदर करून टाकतात. मग अर्चना म्हणतात, तसं गोठा हा फक्त उपजीविकेचं साधन राहत नाही. गोकुळसारख्या सहकारी दूध संघामुळे त्यांच्या घरात समृद्घी नांदतेय. भल्या पहाटेच अर्चनाची पावलं शेताची वाट धरतात. हातात कोयता वैरण कापताना मनातल्या गाण्याला ताल देतो. चारा रांगोळीसारखा साचतो. केसांत गवताच्या बिया अडकतात, पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद चमकतो. थोड्याच वेळात बिंडा भरून हिरवीगार वैरण खांद्यावर जड वाटत असली, तरी मन मात्र हलकं होऊन जाते. कारण त्यांच्या डोळ्यांसमोर चारा खाताना चमकणारे गाईंचे डोळे असतात. वझं घेऊन घराचा उंबरठा ओलांडत नाही, तोच गोठ्यातली जनावरं हलक्या हंबरण्यानं तिला साद घालतात. पैसे येतात, जातात पण हा निखळ आनंद कोण हिरावू शकतो, हे विचारताना अर्चना देसाई यांचे डोळे गाईपेक्षाही अधिक चकाकतात.अर्चना देसाई ८३८०८७४८४५.कष्टानं माणूस झिजत नाही, तर वाढतोयेळवडे (ता. राधानगरी) येथे असलेला साधा गोठा. पाच एकर ऊस, भाताची शेती, मेहनती हात, वडिलांच्या कष्टाळू वृत्तीवर उभा राहिलेला राजश्री साताप्पा पाटील यांचा संसार. १९९४ पासून त्यांनी गाईंची माया जपली. दहा गाईंमधून सुरू झालेला प्रवास, आज चार गाईंपर्यंत येऊन थांबला असला, तरी दर दहा दिवसांनी मिळणारे सहा-सात हजारांचे बिल त्यांच्या कुटुंबाला दिलासा देत होता. आत्मविश्वास वाढवत होता. हा आपल्या हक्काचा पैसा आहे, ही जाणीवच राजश्रींच्या चेहऱ्यावर तजेला आणत होती. २५ वर्षांपासून गावातील भावेश्वरी सहकारी दूध संस्थेला त्यांनी सातत्याने दूध पुरवलं. एकदाही बिल अडले नाही, उशीर झाला नाही. एका वर्षात २५ हजार लिटर दूध पुरवठ्याबद्दल त्यांना मिळालेली सोन्याची अंगठी अन्य कोणत्याही दागिन्यापेक्षा मोलाची वाटते. कारण ती त्यांच्या श्रमांची आणि प्रामाणिकतेची साक्ष आहे.‘‘भात, ऊस किंवा फुलशेतीतली प्रचंड खर्च अनिश्चितता असते. कोविडच्या काळात सगळंच बंद पडलं होतं तेव्हा खरी पाठराखण केली ती गोठ्याने, मुलगा निरंजन आणि मुलगी उच्चशिक्षण घेऊ शकली, तेही गोठ्यामुळेच,’’ हे सांगताना राजश्रींच्या शब्दांत गाईबद्दलची कृतज्ञता ओसंडून वाहते. पती साताप्पा त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून साथ देतात. आज कुटुंब खाऊन पिऊन सुखी या सदरात मोडतं. कष्टानं माणूस झिजत नाही, तर वाढतो, हे त्या हसऱ्या चेहऱ्यानं सांगतात.- राजश्री पाटील, ७३८७४७१३१३.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.