सातारा तालुक्यातील खडकी (ता. वाई) येथील शेतीनिष्ठ शेतकरी दादासाहेब शिंगटे-पाटील यांच्या मनोज व योगेश या दोन्ही चिरंजीवांनी जमिनीचा पोत टिकवीत हळदीच्या सेंद्रिय, दर्जेदार उत्पादनाला अधिक प्राधान्य दिले आहे. हळदीच्या दरातील अस्थिरता कमी करण्याच्या दृष्टीने हळदीपासून पावडर करत किसान व आदर्श या दोन ब्रँडची निर्मिती करून त्यास चांगली बाजारपेठही मिळवून दिली आहे. .सातारा जिल्हा म्हटले, की हळद व त्यातही वाई तालुक्याचे नाव प्रकर्षाने पुढे येते. तालुक्यातील बहुतांश शेतकरी कमी अधिक क्षेत्रावर हे पीक घेत असतात. शेतीला जोड म्हणून अनेकजण हळदीपासून पावडर निर्मिती करण्याच्या व्यवसायातही गुंतले आहेत. तालुक्यातील खडकी येथील दादासाहेब शिंगटे-पाटील हे प्रयोगशील व प्रगतिशील शेतकरी म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत. यापूर्वी शेतीनिष्ठ पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे..Organic Turmeric Farming : हळद पिकात सेंद्रिय शेतीचे महत्त्व .कुटुंबाची ३० एकर बागायत शेती आहे. त्यामध्ये सर्वाधिक १८ एकर ऊस, सहा एकर हळद, टोमॅटो तसेच कांदा, बटाटा, लसूण, तूर अशी हंगामनिहाय अन्य पिके घेतली जातात. दादासाहेबांना मनोज (थोरले) व योगेश अशी दोन मुले आहेत. मनोज यांचे बीकॉमपर्यंत तर योगेश यांचे एमएसस्सी ॲग्रीपर्यंत शिक्षण झाले आहे. मनोज यांना सेंद्रिय शेतीची अधिक आवड असल्याने त्यांनी सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण घेऊन त्यातील ज्ञान वाढवले आहे. धाकटे बंधू शेतीला पूरक म्हणून दोन ट्रॅक्टरद्वारे ऊस वाहतूक व्यवसाय करतात. .सेंद्रिय पद्धतीच्या व्यवस्थापनावर भर सेंद्रिय शेतीतील आवश्यकता म्हणून मनोज यांनी गाईंचे संगोपन सुरू केले. सध्या तीन देशी गाई आहेत. त्यांच्यापासून मिळणाऱ्या गोमूत्र व शेणापासून जीवमृत तयार करून त्याचा वापर केला जातो. सेंद्रिय पद्धतीने हळदीचे उत्पादन तर शेतात तयार होत होते. मात्र त्यास अनेक वेळा योग्य दर मिळत नसल्याने अपेक्षित फायदा होत नव्हता. पण म्हणून हळद पीक सोडणे शक्य नव्हते. अशावेळी पावडरीच्या माध्यमातून हळदीचे मूल्यवर्धन केले तर कष्टाच्या मालाचे नक्कीच चार पैसे जास्त मिळतील व समाधानही होईल असे मनोज यांना वाटले. शिवाय ग्राहकांनाही दर्जेदार, आरोग्यदायी हळद देणे शक्य होणार होते. मनोज यांनी या प्रक्रिया उद्योगासाठी घरच्यांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. परंतु तरीही त्यांनी घरच्यांची समजूत काढून हे धाडस करण्याचा निर्णय घेतला..Organic Farming : सेंद्रिय प्रमाणित शेतीचा तयार केला आदर्श.हळद पावडर निर्मितीसन २०१८ मध्ये ४० बाय ३० फूट क्षेत्रफळाचे शेड उभारून उद्योगाची सुरुवात केली. प्रति दिन ५०० किलो क्षमतेचे पल्व्हरायजर यंत्र व अन्य साधने आणली. साडेतीन लाख रुपये सुरवातीला भांडवल लागले. बाजारपेठेतील मागणीचा अंदाज सुरुवातीच्या काळात येत नाही. अशावेळी वर्षाला दहा क्विंटलपर्यंत हळद पावडरीचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. मागणी वाढेल तसतसे उत्पादन वाढवत नेले. सात वर्षांत ग्राहकांची मानसिकता, बाजारपेठ व उद्योगातील अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यातून सुधारणा करीत आज शिंगटे- पाटील कुटुंब या उद्योगात चांगल्या प्रकारे स्थिर झाले आहे. ....असा आहे कुटुंबाचा प्रक्रिया उद्योग हळदीच्या सेलम व फुले हरिद्रा या वाणांची लागवड केली जाते. त्यांच्यापासून तयार होते पावडर. हळदीचे क्षेत्र सहा एकरांपर्यंत. उत्पादन प्रति एकरी सुमारे ३२ क्विंटल. (वाळवलेले). एकूण हळद उत्पादनापैकी ४० टक्के पावडर निर्मिती. (सेंद्रिय उत्पादन) .Natural Organic Farming: पंचवीस लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आणणार.२५० ग्रॅम, एक किलो व ४० ते ५० किलो बल्कमध्ये असे पॅकिंग. अन्य शेतकऱ्यांनाही वर्षभरात ४० क्विंटलपर्यंत पावडर तयार करून दिली जाते. हरिद्रा वाणाच्या पावडरीचा किसान तर सेलम वाणाच्या पावडरीचा आदर्श असा ब्रॅण्ड. उद्योगाला-लागणारे एफएसएसएआयचे प्रमाणपत्र तसेच आवश्यक परवाना घेतले आहेत. .थेट ग्राहक हीच बाजारपेठपाटील कुटुंबाने नाशिक, पुणे, मुंबई, कल्याण या भागांत थेट हक्काचे ग्राहक तयार केले आहेत. त्यांच्याकडून दरवर्षी ऑर्डर येते. त्यानुसार वाहतुकीद्वारे ती घरपोच दिली जाते. तीनशे रुपये प्रति किलो अशी हळदीची एमआरपी आहे. याशिवाय कच्च्या हळदीची देखील मागणीनुसार पुणे- गुलटेकडी मार्केटला विक्री केली जाते. पाटील कुटुंबाकडे आंबे हळदही असून ग्राहकांच्या मागणीनुसार ६०० रुपये प्रति किलो दराने तिची विक्री केली जाते..Organic Farming : प्रयोगशीलतेचा वारसा समर्थपणे वाढविला .याशिवाय हळदीचे काप तयार करून, उन्हात वाळवून वर्षाकाठी १०० किलोपर्यंत विक्री होते. मागील सात वर्षांच्या काळात वार्षिक उलाढालीत टप्प्याटप्प्याने वाढ झाली आहे. सन २०२२ मध्ये ३५ ते ४० क्विंटल वार्षिक उत्पादन झाले. त्या वेळी हळदीच्या दरांत वाढ झाल्याने पावडरीसही चांगला दर मिळाला होता. मागील वर्षी दर कमी झाल्याने ६० ते ७० क्विंटल निर्मिती केली. आता वर्षाला ८० ते ९० क्विंटल उत्पादनापर्यंत पल्ला गाठला आहे. .‘ॲॅग्रोवन’ माझा सखा मनोज ॲग्रोवनचे पहिल्या दिवसापासूनचे वाचक आहेत. तांत्रिक लेख, यशकथा यांचा उपयोग त्यांना होतोच. मात्र मशागत व अन्य ललित लेखांचेही मी आवर्जून वाचन करतो. मशागत या सदराचे कात्रण व्हॉटस ॲप स्टेटसला ठेवत असल्याचेही मनोज यांनी सांगितले..घरच्यांची साथ ठरलीय महत्त्वाची मनोज यांच्यासह पत्नी प्राची, बंधू योगेश, त्यांची पत्नी अनुजा असे घरातील सर्व सदस्य शेती, पूरक व प्रक्रिया उद्योगात एकदिलाने काम करतात. वडील दादासाहेब व आई छाया यांचे मार्गदर्शन कायम आहे. हळद व अन्य पिकांसाठी बोरगाव येथील कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांचे सातत्याने मार्गदर्शन होते. सेंद्रिय पध्दतीच्या निर्मितीतून ग्राहकांच्या आरोग्यालाही फायदा होत असल्याचे वेगळे समाधान मिळते असे मनोज सांगतात. .उत्पन्नाचे स्रोत वाढविले हळदीची काढणी झाल्यानंतर त्या शेतात पुढे उसाची लागवड होते. आडसाली उसाचे एकरी ६५ ते ७० टन उत्पादन मिळते. देशी दुधापासून तूप तयार करून त्याची प्रति किलो दोन हजार रुपये दराने विक्री होते. चार म्हशीचेही संगोपन केले जाते. मागील वर्षीपासून सेंद्रिय पद्धतीने गूळनिर्मितीला चालना दिली आहे. ऊस शेतीचे व्यवस्थापन सेंद्रिय पद्धतीने होते. नजीकच्या गुऱ्हाळघरातून गूळ तयार करून घेतला जातो. अर्धा, एक किलोच्या ढेपा तयार करून १०० रुपये प्रति किलो दराने विक्री केली जाते. सेंद्रिय हळदीप्रमाणे सेंद्रिय गुळालाही मागणी चांगली असल्याने टप्प्याटप्प्याने उत्पादनात वाढ करणार असल्याचे मनोज यांनी सांगितले. मनोज शिंगटे-पाटील ९९७०००९५६१.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.