Agriculture Success Story : सातारा जिल्ह्यातील काशीळ हे पुणे- बंगळूर महामार्गावरील महत्त्वाचे गाव आहे. बागायती पट्टा असलेल्या या भागात ऊस हे मुख्य पीक व त्याचबरोबर आले, भाजीपाला ही देखील महत्त्वाची पिके आहेत. दरांमध्ये सातत्याने होत असलेली चढ-उतार, हवामान बदल आदी कारणांमुळे शेतकरी तुलनेने सुरक्षित मात्र नफा देणाऱ्या पिकांचा शोध घेत आहेत. उसाच्या पट्ट्यात नवे प्रयोगही सुरू आहेत. काशीळ येथील नथुराम माने यांचे कुटुंबही शेतीत प्रयोगशील आहे. त्यांची पाच एकर बागायती शेती आहे. सुदाम व सचिन अशी त्यांना दोन मुले आहेत. पैकी सुदाम वडिलांसोबत शेती करतात. कृषी पदवीधर असलेले सचिन यांनी खासगी बॅंकेत नोकरी केली. आज ते एका खत कंपनीचे वितरक म्हणून काम पाहतात. .ड्रॅगन फ्रूटचा प्रयोगपीकबदल माने कुटुंबासाठी महत्त्वाचा होता. त्यासाठी ते तुलनेने कमी जोखमीच्या फळपिकाच्या शोधात होते. त्यातून ड्रॅगन फ्रूट फळशेतीविषयी अधिक रस निर्माण झाला. त्यादृष्टीने लागवड तंत्र व बाजारपेठ याबाबत अधिक ज्ञान घेण्यास सुरुवात झाली. दहा शेतकऱ्यांना एकत्र करून हैदराबाद तसेच अनेक ठिकाणी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी दिल्या. शेती कमी असल्याने सुरुवातीला अर्धा एकरांवरच लागवडीचा निर्णय घेतला. मात्र प्रचलित रिंग पोल पद्धतीचा वापर न करता थोडा वेगळा प्रयोग केला. यात सिमेंटच्या खांबावर (पोल) २० मिमी जाडीचे लोखंडी बार वापरले. या पद्धतीत एकरी ४०० या नुसार अर्ध्या एकरांत २०० पोल बसले. दोन पोलमधील अंतर १० फूट ठेवले. पूर्वीच्या प्रचलित पद्धतीत एकरी २८०० पर्यंत रोपे बसतात. या पद्धतीत रोपांची एकरी संख्या ५५०० ते सहा हजारांपर्यंत जाते. त्यामुळे कमी जागेत उत्पादनवाढीस वाव मिळतो. पहिल्या प्रयोगात अर्ध्या एकरांत तीन टनांच्या आसपास उत्पादन मिळाले..पहिल्या प्रयोगानंतर हुरूप वाढलापहिल्या प्रयोगानंतर हुरूप वाढला. कष्ट, भांडवल व मिळणारे उत्पादन या दृष्टीने हे पीक फायदेशीर ठरू शकते असा विश्वास वाटला. पुढील प्रयोगात २०२२ मध्ये सिमेंटपोल ऐवजी चिराविटांचा वापर करून अर्ध्या एकरांत पुन्हा लागवड केली. पूर्वीच्या पद्धतीत एका पोलमध्ये चार रोपे बसायची. आता त्याऐवजी आठ रोपे बसू लागली. हळूहळू अजून काही प्रयोग व सुधारणा सुरू झाल्या. रोपांवरील खर्च कमी करण्याच्या दृष्टीने स्वतःकडील रोपांचा वापर सुरू केला. बाग लवकर सुरू होण्याच्या दृष्टीने अडीच ते तीन फुटी रोपांचा वापर सुर केला. त्यामुळे सर्व फुटवे ठेवता येतात. सन २०२३ मध्ये ५० गुंठे क्षेत्रावर लागवड केली. यात लोखंडी बारऐवजी बेदाणा उत्पादनात वापरली जाते त्या पद्धतीच्या काळ्या वायरचा (प्रति सरी सहा वायर्स) वापर केला. ही वायर आतून भरीव असते. सहा हजार रोपांची लागवड झाली. यात एकरी वायरचा खर्च ५० हजार रुपये, सिमेंट पोल एक लाख व अन्य मिळून दोन लाख ८० हजार रुपये खर्च आला. हाच खर्च आधीच्या पद्धतींमध्ये त्यातून अधिक होतो..Dragon Fruit Production: ड्रॅगन फ्रूटची प्रतिवर्ष चार हजार हेक्टर वाढ.उत्पादन व बाजारपेठविविध प्रयोगांमधून एकरी खर्च कमी करण्याबरोबर उत्पादन वाढ घेण्यास माने यशस्वी झाले आहेत. त्यांना वायर पद्धतीत ५० गुंठ्यांत सहा टन उत्पादन मिळाले. आता पुन्हा २०२४ मध्ये लागवड वाढवली असून आजमितीस ड्रॅगन फ्रूटचे एकूण क्षेत्र चार एकर आहे. सध्या नव्या लागवडीचा बहर सुरू आहे. आतून व बाहेरून लाल अशा जंबो फळाची जात घेतली आहे. जूनमध्ये सुरू झालेली बाग नोव्हेंबरपर्यंत सुरू राहते. यात वीस दिवसांच्या अंतराने आठ ते दहा व त्यातही दोन मोठे बहर मिळतात. फळांची विक्री सुरुवातीच्या काळात सातारा, सांगली या स्थानिक बाजारपेठेत केली. आता प्रामुख्याने पुणे बाजार समितीत विक्री केली जात आहे. काही प्रमाणात मुंबई येथेही माल पाठवला. सरासरी ८० ते १०० रुपये प्रति किलो हंगामाच्या सुरुवातीला दर मिळतो. त्यानंतर तो ७० रुपये वा त्याहून कमी मिळतो. फळांची ४००, ३००, २०० ग्रॅम अशी प्रतवारी केली जाते. त्यामुळे दर चांगला मिळण्यास मदत होते..कोल्ड स्टोअरेजचा वापरबाजारपेठेत बहुतांश वेळा एकाच वेळी फळांची आवक होत असल्याने दर कमी मिळण्याचा धोका असतो. त्यामुळे माने यांनी ड्रॅगन फ्रूटची फळे खासगी कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवण्यावर भर दिला आहे.समाधानकारक दर मिळाल्यानंतर फळे विक्रीस काढली जातात. किलोला चार रुपये असा कोल्ड स्टोअरेजसाठी मागील वर्षी दर होता. यंदा तो दोन रुपये आहे. मात्र बाजारात अधिक दर मिळतात त्यावेळी हा खर्च निघून जातो असे सचिन सांगतात. हंगाम वर्षभर सुरू राहण्यासाठी एलईडी बल्बचा प्रयोग करण्याची तयारी सुरू आहे..Dragon Fruit Benefits: क्षेत्र वाढते, जाणीव-जागृती वाढवा.व्यवस्थापनातील ठळक बाबीव्यवस्थापनातील महत्त्वाचे मुद्दे सांगायचे तर शेणखत, कोंबडी खत, निंबोळी पेंड, जीवामृत यांचा वापर केला जातो. उन्हाळ्यात सनबर्निंगची समस्या येऊ नये म्हणून सहा फूट उंचीचे शेडनेट संपूर्ण बागेत उभारले आहे. पावसाळ्यात त्याचा उपयोग होत नाही. त्याच्या उभारणीसाठी एकरी लाख रुपये खर्च येतो. मात्र फळाची गुणवत्ता टिकून राहात असल्याने दरांमध्ये फायदा होतो. पाण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर होतो. योग्य काळात शेंडा छाटणी होते. त्यामुळे नवा फुटवा येण्यास मदत होते..लागवड नवी असताना त्यात पहिल्या वर्षी आल्याचे आंतरपीक घेतले. त्यानंतर हळदही घेतली आहे. त्यातून मुख्य फळाचा उत्पादन खर्च कमी केला आहे. सन २०२३ मध्ये ड्रॅगन फ्रूटची नर्सरी सुरू केली आहे. अडीच ते तीन फूट उंचीची रोपे तयार केली जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना सर्व फुटवे ठेवता येतात व बाग लवकर सुरू होते. परिसरातील तसेच छत्रपती संभाजीनगर, कागल, जुन्नर तसेच मध्य प्रदेशातील काही शेतकऱ्यांपर्यंत रोपे पोहोचली आहेत. विहीर व नदीवरून पाइपलाइन करून पाण्याची व्यवस्था केली आहे.सचिन सांगतात, की आमच्या भागात अनेकवेळा वातावरणाच्या विविध अवस्था पाहण्यास मिळतात. काही वेळा थंडी असते. धुके, पावसाळी वातावरण असते. अशावेळी द्राक्ष, डाळिंबासारख्या पिकांमध्ये जोखीम मोठी असते. त्या तुलनेत ड्रॅगन फ्रूट पीक नक्कीच आश्वासक ठरले आहे. म्हणूनच अर्ध्या एकरांवरून त्याचा चार एकरांत विस्तार केला आहे.वाहतूक झाली सोपीकाढलेल्या फळांची शेतातून वाहतूक सोपी व्हावी यासाठी लोखंडी नांगराच्या स्ट्रक्चरमध्ये सुधारणा करून त्याचा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. तो थेट ट्रॅक्टरला जोडला आहे. त्यावर सुमारे तीस क्रेटपर्यंत माल ठेवता येतो. न कलंडता ते शेतातून नेता येतात.सचिन माने ९७६५७०७२६३सुदाम माने ७५०७०४२७४१.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.