Women Farmer Maharashtra: आईच्या कष्टांची शिदोरी आणि आजोबांनी दिलेल्या शेतीतून करजगाव (ता. चांदूर बाजार, जि. अमरावती) येथील भारती पोहोरकार यांनी स्वत:चे विश्व उभारले. नोकरी सोडून त्यांनी मातीशी नातं घट्ट करत संत्रा बाग फुलविली. जमीन सुपीकता, काटेकोर व्यवस्थापनातून दर्जेदार फळ उत्पादनावर भर देत त्यांनी आर्थिक विकास साधला. गावातील महिलांच्या सहकार्याने शेतकरी बचत गट तयार करून तंत्रज्ञान प्रसारावर भर दिला आहे..काही जणांचे आयुष्य जन्मताच आव्हान घेऊन येतं. लहान वयातच मायेचा आधार सुटतो आणि जीवनाची वाट काटेरी बनते. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीत घडलेली माणसं पुढे आपल्या कष्टांनी इतिहास घडवतात. करजगाव (जि.अमरावती) येथील भारती पोहोरकार यांची अशीच कहाणी आहे. कौटुंबिक वाद, संघर्षमय बालपण आणि बिकट आर्थिक परिस्थितीशी धडपडत त्यांनी संत्रा बाग चांगल्या प्रकारे फुलविली आहे..या प्रवासाबाबत भारती पोहोरकार म्हणाल्या, की मी सात महिन्यांची असतानाच आयुष्याला मोठे वळण लागले. कौटुंबिक परिस्थितीमुळे आई सुमित्रा मला करजगाव येथे माहेरी घेऊन आली. माझे आजोबा किसनराव भोगे यांच्या घरी बालपण गेले. आजोबांचे मायेचे छत्र आणि आईची जिद्द यावर माझी वाटचाल सुरू झाली. उदरनिर्वाहासाठी आजोबांनी आईला एक एकर चार गुंठे शेती आणि राहण्यासाठी घर दिले. हाच शेताचा तुकडा पुढे माझ्या प्रगतीचा पाया ठरला..Orange Farming: अभिनेते भारत गणेशपुरे यांनी जाणून घेतले संत्रा शेतीचे तंत्र.लहानपणापासूनच शेती हेच भारती यांचे खेळाचे मैदान बनले. आई भाजीपाला पिके घेत असे आणि भारती आईसोबत शेतात राबत असे. मातीशी नातं जोडतच त्यांचे शिक्षण सुरू झाले. प्राथमिक शिक्षणापासून वाणिज्य शाखेतील पदवीपर्यंत त्यांनी सातत्य राखले. अभ्यासात हुशार असलेल्या भारतीने कोणत्याही शिकवणीशिवाय एम.कॉम.मध्ये प्रथम श्रेणी मिळवली. स्पर्धा परीक्षांतून शासकीय नोकरीचे स्वप्न पाहिले, पण यश हुलकावणी देत राहिले. त्यामुळे खासगी कार्यालयात नोकरीला सुरवात केली..शेतीला प्राधान्यआईला हातभार लागावा म्हणून भारतीताईंनी चांदूरबाजार येथे तेरा वर्षे अकाउंटंट म्हणून नोकरी धरली. पण मन मात्र शेतीमध्ये रमत होते. इतरांकडे राबण्यापेक्षा स्वतःच्या शेतीत कष्ट करावेत, हा विचार त्यांच्या मनात रुजत गेला. अखेर त्यांनी २०१६ मध्ये शेतीची सूत्रे स्वतःच्या हाती घेतली. सुरुवातीला भाजीपाला, मिरची, कांदा यांसारख्या पिकांतून प्रयोग सुरू केले. मात्र बाजारातील दराची अनिश्चितता आणि कमी जमीनधारणेमुळे अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. खर्च वजा जाता फारसे काही हातात राहत नव्हते. तेव्हा भारतीताईंनी गावशिवारातील मुख्य पीक असलेल्या संत्रा बागेकडे वळण्याचा निर्णय घेतला..दर्जेदार पीक उत्पादनाचे गणित लक्षात घेऊन भारतीताईंनी जमीन सुपीकतेवर भर दिला. पहिल्या टप्यात हिरवळीच्या पिकांची लागवड केली. संत्रा लागवडीच्यापूर्वी परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतीला भेटी देत तंत्रज्ञान समजावून घेतले. प्रयोगशील शेतकरी पुष्पक खापरे, कृषी विभागाचे सिट्रस इस्टेट, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि अचलपूर येथील कृषी संशोधन केंद्रातील तज्ज्ञांच्याकडून संत्रा बागेच्या व्यवस्थापनाचे बारकावे समजून घेतले. बाजारपेठेचा अंदाज बांधून २०१६ मध्ये भारतीताईंनी एक एकर चार गुंठे क्षेत्रावर संत्रा लागवडीचे नियोजन केले. जमीनधारणा कमी असल्याने त्यांनी १६ बाय १६ फूट अंतर ठेवून नागपुरी संत्रा कलमांची लागवड केली..कमी जागेत अधिक झाडे बसवून उत्पादनक्षमता वाढवण्याचा हा तांत्रिक प्रयोग होता. पहिल्यापासूनच खत, पाणी नियोजनावर भर दिल्याने कलमांची जोमदार वाढ झाली. ठिबक तसेच काही वेळा तुषार सिंचनाचा वापराचे नियोजन ठेवले. पहिली चार वर्ष संत्राबागेत मिरची, कांदा आणि हिरवळीच्या पिकांचे आंतरपीक घेतले. कलमांच्या लागवडीनंतर सहाव्या वर्षी व्यावसायिक फळ उत्पादनाला गती मिळाली. तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार एकात्मिक कीड, रोग नियंत्रणावर भर दिला आहे..Orange Farming: अहिल्यानगरच्या संत्रा उत्पादकांसाठी ‘ऑरेंजव्हॅली’ .हिरवळीची पिके, सेंद्रिय खते आणि जिवाणू संवर्धकांच्या वापरावर भर दिल्याने जमिनीची सुपीकता चांगल्या प्रकारे टिकून राहिली आहे. मधमाश्यांच्या परागीकरण प्रक्रियेला धक्का लागू नये यासाठी फुलोऱ्याच्या काळात कोणतीही रासायनिक कीडनाशकांची फवारणी केली जात नाही. परागीकरण जितके चांगले, तितके फळधारणेचे प्रमाण अधिक हे त्यांना अनुभवातून समजून आले आहे..फळ वाढीच्या अवस्थेनुसार शिफारशीत अन्नद्रव्यांचा वापर केला जातो. कीड नियंत्रणासाठी चिकट सापळे, प्रकाश सापळ्यांचा वापर करून रासायनिक कीडनाशकांचा नियंत्रित वापर केला जातो. झाडाच्या बुंध्यापासून चार फूट अंतरावर रिंगण करून खत देऊन मातीने झाकले जाते. जमिनीचा पोत सुधारल्याने संत्रा कलमांची वाढ जोमदार झाली. झाडांची प्रतिकारशक्ती मजबूत झाल्याने फळगळतीवर प्रभावी नियंत्रण मिळाले. बागेच्या व्यवस्थापनासाठी गरजेपुरते मजूर घेतले जातात..दर्जेदार फळांचे उत्पादन : भारतीताईंनी बागेचे चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन ठेवल्याने फळांची जोमदार वाढ दिसून येते. मृग बहरावर त्यांचा भर आहे. गेल्यावर्षी त्यांना २० टन फळांचे उत्पादन मिळाले. फळांचा उत्तम दर्जा असल्याने व्यापारी चढ्या दराने बागेतच खरेदी करतात. या फळबागेतून वार्षिक चार लाखांची उलाढाल होते. पावसाळी हंगामात झेंडू आणि अंबाडीचे आंतरपीक घेतले जाते. त्यातूनही चांगली मिळकत होते. आता परिसरातील शेतकरी भारतीताईंच्या संत्रा बागेला भेट देऊन तेथील तंत्रज्ञान आत्मसात करतात, ही मोठी उपलब्धी आहे..संघर्षातून आत्मनिर्भरता : भारतीताईंनी मातीशी नातं घट्ट करत शास्त्रोक्त शेतीचा आदर्श उभा केला. आज भारतीताई केवळ संत्रा उत्पादक नाहीत, तर संघर्षातून घडलेली आत्मनिर्भर महिला शेतकरी म्हणून पुढे आल्या आहेत. गावातील पंधरा महिला शेतकऱ्यांना एकत्र करून नारीशक्ती शेतकरी समूह गट स्थापन केला आहे. या गटाच्या माध्यमातून शेतीमधील नवीन तंत्रज्ञान पोहोचविण्याचे त्यांचा प्रयत्न आहे. शेतीमधील कार्य लक्षात घेऊन स्वयंसेवी संस्थेने त्यांना युवा शेतकरी पुरस्काराने गौरविले आहे. कमी जमीन, मर्यादित साधने आणि प्रतिकूल परिस्थिती असूनही योग्य तंत्रज्ञान, अभ्यासू वृत्ती आणि अथक परिश्रमाच्या जोरावर शेतीतही चांगले जीवन घडवता येते, हे भारतीताईंनी सिद्ध करून दाखवले आहे.भारती पोहोरकार ९७६४७ ३३४५८.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.