Women Empowerment: विदर्भाच्या काळ्या मातीत एक वेगळीच जिद्द आहे. इथला कणा कष्टाने घडलेला असतो आणि मने ही उत्तुंग स्वप्नं पाहणारी दिसून येतात.. ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ या उक्तीला सार्थ ठरविणारे एक धगधगते व्यक्तिमत्त्व म्हणजे पिंजर (ता. बार्शीटाकळी, जि. अकोला) येथील उषाताई देशमुख. घरची गरिबी, सामाजिक बंधने आणि भांडवलाचा अभाव अशा अनेक अडचणींच्या कातळांना धडक देत शून्यातून स्वतःचा उद्योग उभा करणाऱ्या यशस्वी उद्योजिकेची ही कहाणी....माणसाचे दिवस नेहमी सारखे नसतात. उषाताईंचे माहेर बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील. लग्नानंतर त्या अकोला जिल्ह्यातील पिंजर (ता. बार्शीटाकळी) येथे आल्या. वडिलांकडून त्यांना शेतीचा वारसा लाभलेला असला तरी वडिलोपार्जित शेती अवघ्या काही रुपयांत विकल्या गेल्याचे दुःखद वास्तव त्यांनी अनुभवलेले होते. सासरीही परिस्थिती काही सोपी नव्हती. संसाराची जबाबदारी, मुलांचे शिक्षण आणि भविष्याची चिंता अशा कात्रीत त्या सापडल्या होत्या. .Women Agri Entrepreneur: गृहिणी नव्हे, ‘टेक्नोसॅव्ही’ कृषी उद्योजिका.व्यवसायासाठी गाठीशी लाखो रुपये हवेत असे म्हटले जाते. पण उषाताईंनी हा समज मोडीत काढला. त्यांच्याकडे भांडवल नसतानाही काहीतरी करून दाखवण्याच्या ऊर्मीतून त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला. हातातली सोन्याची एक छोटीशी अंगठी गहाण ठेवत मिळालेल्या तुटपुंज्या रकमेतून पहिली बकरी खरेदी केली. ही बकरी म्हणजे त्यांचे उद्योजकतेच्या दिशेने पडलेले पहिले पाऊल होते..संघर्ष आणि परिश्रमाची पराकाष्ठात्यांची घोडदौड पुढे रेशन दुकानाच्या कामापर्यंत पोहोचली. स्वतःच्या शेतीसोबतच इतरांची जमीन ठेक्याने घेऊन काम सुरू ठेवले. पतीच्या रेशन दुकानात मदत करतानाच लोकांशी संपर्क वाढवला. त्यांच्या दोन्ही मुलांनीही आईच्या कष्टाची जाणीव ठेवून शिक्षणासोबतच व्यवसायात रस घेतला. आज त्यांचा एक मुलगा रेशन दुकान चालविण्याच्या कामात मदत करतो, तर दुसरा मुलगा कृषिमाल निविष्ठा विक्रीचा व्यवसाय सांभाळतो..बँकेत आत्मसन्मानाची लढाईउषाताईंचा प्रवास सोपा नव्हता. जेव्हा त्यांना व्यवसायाचा विस्तार करायचा होता, तेव्हा त्या पहिल्यांदा बँकेत गेल्या. त्यांना केवळ २० हजार रुपये कर्ज हवे होते. पण कागदपत्रांची पूर्तता आणि बँकिंगच्या क्लिष्ट नियमांच्या दबावात या ग्रामीण महिलेचा आवाज कोण ऐकणार? त्यांना कर्ज नाकारले गेले. तो क्षण त्यांच्यासाठी अपमानास्पद होता. .पण त्या डगमगल्या नाहीत. नियतीलाही जिद्दीसमोर झुकावे लागले. त्यांनी ‘उमेद’ अभियानांतर्गत ‘भाग्यलक्ष्मी महिला बचत गट’ आणि कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली ‘लक्ष्मी शेतकरी उत्पादक गट’ स्थापन केला. त्यांच्या कामाचा व्याप आणि प्रामाणिकपणा पाहून ज्या बँकेने पूर्वी २० हजार रुपये नाकारले होते, त्याच बँकेने त्यांना १८ लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले. यातूनच त्यांनी पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत स्वतःचा प्रक्रिया व प्रतवारी उद्योग साकारला..Women Entrepreneur: महिलांना व्यवसाय सुरू करण्याची सुवर्णसंधी; केंद्र सरकारच्या या ७ महत्त्वाच्या योजना जाणून घ्या.‘ग्रेडिंग’ची किमयाउषाताईंच्या उद्योगाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा सामाजिक दृष्टिकोन. शेतकरी राबून गहू पिकवतो, पण विक्रीच्या वेळी त्यात कचरा किंवा माती असल्याचे सांगून व्यापारी भाव पाडतात. ही लूट थांबविण्यासाठी उषाताईंनी स्वच्छता व प्रतवारीचा प्रकल्प उभा केला. यात प्रामुख्याने गव्हाची स्वच्छता व प्रतवारी सुरु झालेली आहे. आज हा प्रक्रिया उद्योग पिंजर परिसरातील तब्बल ६५ गावांसाठी वरदान ठरला आहे. गव्हाचे उत्तम, मध्यम आणि बारीक अशा तीन श्रेणींत वर्गीकरण केले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला बाजारभाव मिळू लागला. मागील वर्षी त्यांनी तब्बल ५ हजार क्विंटल गव्हाची स्वच्छता केली. यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधीही निर्माण झाल्या आहेत. या वर्षीचा हंगाम सुरू झालेला आहे..दुःख पचवून पूर्ण केली स्वप्नेउषाताईंच्या या प्रवासात नियतीने त्यांच्यावर मोठे आघातही केले. पतीच्या आजारपणात त्यांनी आणि मुलांनी शर्थीचे प्रयत्न केले. लाखोंचा खर्च केला, पण काळाने २०२४ मध्ये त्यांना हिरावून नेले. कोसळलेला दुःखाचा डोंगर त्यांनी पचवला. खचून न जाता कुटुंबाचा मुख्य आधारस्तंभ बनून मुलांच्या पाठीशी उभ्या आहेत. त्यांनी आता भूमी आधार शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून मिलेट उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे आणि वर्षभर ग्रामीण महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे हे त्यांचे ध्येय असल्याचे त्या सांगतात. त्यांच्या कार्याचा लौकिक वाढतो आहे. त्यांना उत्पादनांसाठी कायमस्वरूपी मार्केटिंग व व्यासपीठाची मात्र मदत हवी आहे..योजनांचे पाठबळकृषी खात्याच्या पुढाकाराने पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून जिल्ह्यात पहिला आटा प्लँट उभारणाऱ्या उषाताईंना एक लाख ५ हजार रुपयांचे शासकीय अनुदान मिळाले. तीन लाख १६ हजार रुपयांची ही यंत्रसामग्री त्यांनी आणली. यात वेगवेगळ्या प्रकारचे पीठ तयार केले जाते. यात डोसा, इडली, धपाटा, पराठा असे मिश्रण तयार करतात. यानंतर त्यांची मोठी झेप म्हणजे क्लीनिंग, ग्रेडिंग प्लँट ठरला. सुमारे १२ लाख ८७ हजारांचे बँककर्ज घेत त्यांनी सुमारे १७ लाख ८७ हजार रुपयांची यंत्र सामग्री बसवली आहे. तालुका कृषी अधिकारी संध्या करवा यांनी त्यांच्या या उद्योगांना वेळोवेळी भेटी देत प्रोत्साहन दिले..कल्पकतेला फुटले पंखसन २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष’ (तृणधान्य वर्ष) म्हणून साजरे झाले. या संधीचे उषाताईंनी सोन्यात रूपांतर केले. आपल्या पूर्वजांच्या ताटातील सकस तृणधान्ये आज विस्मृतीत जात आहेत, हे पाहून त्यांनी नऊ तृणधान्यांच्या मिश्र पिठाची संकल्पना मांडली. अकोला कृषी विज्ञान केंद्रातील गृहविज्ञान शाखेच्या प्रमुख कीर्ती देशमुख यांच्याकडून त्यांनी तांत्रिक प्रशिक्षण घेतले. ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर, मका, मूग, उडीद आणि हरभरा अशा नऊ धान्यांचा पौष्टिक संगम त्यांनी साधला..या एकाच पिठातून डोसा, इडली, थालीपीठ, धपाटे आणि आप्पे असे नानाविध पदार्थ झटपट बनवता येऊ लागले. पिंजरसारख्या गावातून तयार झालेले हे पीठ आज चेन्नई, दिल्ली, हैदराबाद आणि मुंबईपर्यंत पोहोचले आहे. वाशी येथील ‘सरस’ प्रदर्शन आणि अकोल्यातील डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ‘ॲग्रोटेक’मध्ये त्यांच्या उत्पादनांना मोठी पसंती मिळाली. केवळ एका वर्षात दीड लाखाहून अधिक रुपयांच्या पिठाची विक्री करत त्यांनी ग्रामीण उद्योजकतेचा नवा आदर्श निर्माण केला.उषाताई देशमुख ८००७५०७७७९.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.