Village Success Story : अहिल्यानगर जिल्ह्यात शेवगाव तालुक्याच्या बहुतांश भागाला शाश्वत पाणी उपलब्ध नाही. पाऊस, विंधन विहिरींवर अवलंबून शेती आहे. या भागातून ढोरा ही प्रमुख नदी जाते. त्या परिसरातील गावांच्या शिवारात साधारण पाच साखळी बंधारे आहेत. याच तालुक्यात सामनगाव हे चार हजार लोकसंख्येचे गाव असून अंदाजे साडेचारशे कुटुंबे येथे राहतात. आदिनाथ रामनाथ कापरे हे लोकनियुक्त सरपंच असून प्रमोद सुरेश कांबळे उपसरपंच आहेत तर संगीता नजन, कॄष्णा सातपुते, सुदाम झाडे, आत्माराम निकम, सुभद्रा काळे, लता नजन, विमल कांबळे व शीला मस्के या सदस्य आहेत. देविदास पंडित ग्रामसेवक आहेत. .दुष्काळ निवारण्यासाठी सरसावले ग्रामस्थसामनगाव आणि परिसरातील गावांना सातत्याने दुष्काळाशी लढा द्यावा लागला होता. ही परिस्थिती बदलण्यासाठी सामनगावच्या गावकऱ्यांनी पुढाकार घेतला. नदीवरील बंधाऱ्यासह जलसंधारण, खोली-रुंदीकरण करण्यासाठी अडीच वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. महिला, तरुणांसह ज्येष्ठ मंडळी या कार्यासाठी सरसावले.स्थानिक प्रशासनासह भारत फोर्ज कंपनीनेही गावकऱ्यांच्या श्रमाला आर्थिक बळ दिले. होणाऱ्या खर्चात दहा टक्के वाटा लोकसहभागातील राहिला. या सर्वांच्या एकत्रित ऊर्जेतून कोट्यवधी रुपयाची किंमत होईल एवढे काम झाले. सामनगावासह मळेगाव, आखेगाव, लोळेगाव वाघोली शिवारातही अशीच जलसंधारणाची कामे झाली. त्यामुळे परिसरातील ही सर्व गावे दुष्काळमुक्त झाली. प्रत्येक गावचे सरपंच, उपसरपंच व स्थानिक कार्यकर्त्यासह भागातील सामाजिक कार्यकर्ते तसेच वाघोलीचे सरपंच उमेश भालसिंग यांनी परिसरातील या कामांसाठी पुढाकार घेतला..Water Conservation: लोकसहभागातून जलसमृद्ध गावाची लोक चळवळ व्हावी.पीक पद्धतीत झाला बदलगावशिवारात पूर्वी कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी, बाजरी यासारखी पिके घेतली जात. नदी खोलीकरणाच्या झालेल्या कामांमुळे पाणीसाठा वाढीस मदत झाली. विहिरी, विंधनविहिरीला पाणी उपलब्ध झाल्याने पाणीटंचाई संपली. पूर्वी जानेवारी-फेब्रुवारीतच पाणीटंचाई जाणवायची. आता उन्हाळाभर विहिरींना पाणी उपलब्ध असते. दोन वर्षांपासून गावाला पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरची गरज भासलेली नाही. पाण्याची शाश्वत सोय होऊ लागल्याने पीक पद्धत बदलण्यास मदत झाली आहे. सामनगावच्या सुमारे १०३२ हेक्टर क्षेत्रापैकी ९१८ हेक्टर क्षेत्रावर विविध पिके असतात. त्यात ऊसक्षेत्र वाढत आहे. पूर्वी कापूस पिकाचे अनेकवेळा वाढीच्या महत्त्वाच्या काळात पाण्याअभावी नुकसान व्हायचे. आता ते टाळणे शक्य झाले आहे. या पिकाची साडेचारशे हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड होत आहे. दीडशे हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कांदा घेण्यात येतो. काही शेतकरी उन्हाळी पिकेही घेऊ लागले आहेत. शिवारात सुमारे चाळीसच्या जवळपास शेततळी आहेत. त्यामुळे पाण्याची शाश्वती झाली आहे..दुग्ध व्यवसायाला मोठी चालनागावातील शेतकऱ्यांनी शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड दिली होती. मात्र पाण्याअभावी पुरेसा चारा घेता येत नसल्याची अडचण होती. दुष्काळी परिस्थितीला त्यांना वारंवार सामोरे जावे लागत होते. आता बारमाही पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने दुग्ध व्यवसाय करणे शक्य झाले आहेत. गावात पूर्वी तीस ते पस्तीस शेतकरी दुग्धव्यवसाय करीत. मागील दोन वर्षांत सव्वाशेच्या जवळपास शेतकरी पशुपालन करू लागले आहेत. सुमारे दोनहजार लिटरपेक्षा अधिक दुधाचे दररोज संकलन होते. त्यातील आठशे ते हजार लिटर दुधाची थेट ग्राहकांना विक्री होत असल्याचे शेतकरी सांगतात.आदिनाथ कापरे (सरपंच) ९५१८७८१८६१.Water Conservation: श्रद्धा-सबुरी संस्थेने रुजविला जलसंधारणाचा पॅटर्न .नियोजन मित्रमंडळाचा सहभागसामनगाव येथे नियोजन मित्रमंडळ कार्यरत आहे. शिवराज सातपुते अध्यक्ष तर उमेश घुगरे उपाध्यक्ष आहेत. प्रशांत सातपुते, प्रशांत कळकुंबे, अनिकेत कळकुंबे, गौरव म्हस्के, कार्तिक झाडे, योगेश अर्जुन, ऋषिकेश वाघमारे, गौरव बावधनकर, ओंकार सातपुते, तेजस काते, किरण कळकुंबे, विवेक कांबळे, अनिल कळकुंबे, मुकुंद शेळके, गणेश खैरमोडे, नीलेश झाडे, रोहित कांबळे, आकाश झाडे, शुभम काळे, दादासाहेब कळकुंबे, अशोक झाडे, देवदास कांबळे आदी तरुणांचा या मंडळाच्या स्थापनेत महत्त्वाचा वाटा आहे. प्रामुख्याने गणेशोत्सव, नवरात्र व प्रासंगिक कार्यक्रमानिमित्त रक्तदान शिबिर, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, महिलांसाठी आरोग्य शिबिरे, नेत्रतपासणी आदी उपक्रम घेतले जातात. लोकसहभाग, श्रमदानातही तरुणांचा सक्रिय सहभाग असतो..महिला बचत गटातून सक्षमतासामनगावात मागील दहा वर्षांत महिलांनी बचत गट करण्याला प्राधान्य दिले. आजमितीला सुमारे २१ महिला बचत गट कार्यरत आहेत. गटांना बँकांनी कर्ज स्वरूपात आर्थिक हातभार दिल्याने महिलांमध्ये आर्थिक सक्षमता येण्यास मदत झाली आहे. बचत गटाच्या माध्यमातून गावातील सुमारे २५० महिला दर महिन्याला बचत करतात. कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्ध व्यवसाय, शिवणकाम आदी व्यवसायांमधून त्यांनी स्वयंरोजगार उपलब्ध केला आहे. बचतीमधून अंतर्गत व्यवहार करत एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ हे धोरण राबवत महिला एकमेकींना गरजेवेळी मदत करतात. संगीता पोपट कळकुंबे या बचत गटासाठी समन्वयक म्हणून काम करतात..सामनगावचे उपक्रमगावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत पाच हजार विविध वृक्षांची घनवन पद्धतीने वृक्षलागवड. याशिवाय शेतकऱ्यांना दोन वर्षांपासून दरवर्षी ५०० फळझाडांच्या रोपांचे वाटप.या उपक्रमामुळे पद्मश्री पोपटराव पवार, आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते गावाचा गौरव.गावच्या वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची कामे. गरजू लोकांना घरकुलांचा लाभ.शेतकऱ्यांना विविध शेती योजनांचा लाभ मिळण्यासाठी पुढाकार.गाव हागणदारीमुक्त. शंभर टक्के शौचालयाचा वापर.तंटामुक्त अभियानातून तंटे मिटविण्याचा प्रयत्न. गावाला निर्मलग्राम व तंटामुक्त अभियानाचा पुरस्कार प्राप्त.शेतीतील नवे तंत्रज्ञान, नवे पीकवाण आदी बाबींविषयी शेतकऱ्यांना कॄषी विभागामार्फत मार्गदर्शन..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.