चिकाटीने दुग्ध व्यवसाय केला फायदेशीर

गावंडे कुटुंब अनेक वर्षांपासून दुधाळ जनावरांचे संगोपन करतात.
गावंडे कुटुंब अनेक वर्षांपासून दुधाळ जनावरांचे संगोपन करतात.

आजोबांच्या काळापासून सुरू असलेला दुग्ध व्यवसाय बाभूळगाव (जि. अकोला) येथील गावंडे बंधूंनी चिकाटीने टिकवण्यात यश मिळवलेच, शिवाय मूल्यवर्धन म्हणजेच प्रक्रियायुक्त उत्पादनांची निर्मिती करून व्यवसायाचे अर्थकारण सुधारले आहे. सुमारे ५५ जनावरांचे संगोपन करताना दुधाचा रतीब, स्वतःच्या दुकानातून दूध विक्री करताना व्यवसायातील नफा वाढविण्याचे काम त्यांनी केले आहे. ज्याचे घरी गाय त्याला कमी काय असे म्हटले जाते. तसे पाहायला गेल्यास विदर्भात दुग्धव्यवसाय पश्‍चिम महाराष्ट्राप्रमाणे विकसित झाला नाही. तरीही अनेक शेतकरी स्वबळावर या व्यवसायाला बळकटी देण्याचे काम करीत आहेत. अकोला शहरापासून साधारणतः दहा किलोमीटरवर असलेल्या बाभूळगाव गावाबाबत हेच सांगता येईल. हे गावच दुग्धव्यवसायासाठी प्रसिध्द आहे. गावंडे कुटुंबाने जपलेला आदर्श किशोर गावंडे सांगतात की, आमच्या आजोबांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला, तेव्हा त्यांच्याकडे तीन ते चार जनावरे होती. आमच्या वडिलांनी म्हणजे श्रीराम यांनी तो नेटाने चालवला. आता गोविंदा व उमेश या माझ्या भावांसमवेत व्यवसाय वाढवत नेला आहे. दरवर्षी त्यात काही ना काही सुधारणा करण्याचा आमचा प्रयत्न असतो. किशोर म्हणतात त्याप्रमाणे गावंडे कटुंबाने व्यवसाय वृद्धीसाठी घेतलेली मेहनत अत्यंत महत्त्वाची आहे. एकतर त्यांच्याकडे कोणतीही शेती नव्हती. मागील काही वर्षांत केवळ दुग्ध व्यवसायाच्या पाठबळावर सहा एकर शेती विकत घेणे त्यांनी शक्य केले. ५७ जनावरांचे संगोपन गावंडे यांच्याकडे आज ४० म्हशी व १७ गायी आहेत. म्हशींमध्ये मुऱ्हा, मेहसाणा तर गायींमध्ये जर्सी, होलस्टिन जातींचा समावेश आहे. दिवसाला ६५० ते ७०० लिटरपर्यंत दूध संकलन होते. वर्षाची सरासरी थोडी कमी भरते. थेट विक्रीतून नफा दुग्ध व्यवसायातील खर्च अलीकडे वाढला आहे. साहजिकच नफ्याचे प्रमाण अत्यंत काठावर आले आहे. अशा वेळी दूध डेअरीला देण्यापेक्षा थेट विक्री करून नफा वाढवण्यावर गावंडे यांनी भर दिला आहे. दुधाचे रतीब घातले जाते. दोघा बंधूंवर ही जबाबदारी आहे. गायीचे प्रति लिटर ४० रुपये तर म्हशीचे प्रति लिटर ६० रुपये असा दर आहे. केवळ रतीबावर भागणार नाही म्हणून बाभूळगावात स्वतःच्या दुकानामधूनही थेट विक्री केली जाते. रतीब व दुकान अशी मिळून रोजची विक्री ३०० लिटरपर्यंत होते. उर्वरित दूध खासगी डेअरीला दिले जाते. प्रक्रियेतून मूल्यवर्धन दुधाची गुणवत्ता चांगली असल्याने ग्राहक व डेअरी अशा दोन्ही ठिकाणी त्याला पसंती मिळते. प्रक्रिया हा नफा मिळवण्याचा आणखी एक मार्ग आहे हे गावंडे यांनी ओळखले. चार वर्षांपासून त्यांनी दुधापासून पदार्थ तयार करण्यास सुरवात केली आहे. पनीर, ताक, श्रीखंड आदींची निर्मिती केली जाते. प्रत्येक हंगामानुसार पदार्थाची मागणी कमी-जास्त होत असते. मात्र पनीरला दररोज म्हणजे पाच किलोपर्यंत मागणी राहते. हंगामात दिवसाला १० लिटर दही, ताक विक्री होते. एवढे सगळे कष्ट, व्याप उचलल्यानंतर व्यवसायातून दिवसाला समाधानकारक उत्पन्न हाती पडते. अर्थात उत्पन्नातील ६० ते ७० टक्के खर्चही असतो. कर्ज न घेता व्यवसायाचा विस्तार व्यवसाय वाढवत नेत असताना बँकेचे कुठले कर्ज किंवा योजनेच्या अनुदानाची मदत घेतली नाही. टप्प्याटप्प्याने वृद्धी करताना साठत आलेली रक्कम एकत्र करीत भांडवल उभारले. आज ५५ जनावरांपैकी सुमारे २० ते २२ जनावरांची पैदास गोठ्यात झालेली आहे. जनावरांच्या खरेदीवरील खर्चात एका अर्थाने केलेली ही महाबचतच म्हणायला हवी. वैरण देण्यासाठी चौरस आकाराचे टप बांधले आहेत. त्यामुळे तो वाया जात नाही. पाणी पिण्यासाठी गोठा परिसरातच हौद बांधला आहे. हा सर्व खर्च व्यवसायातील उत्पन्नातूनच करण्यात आला आहे. रोजगार निर्मिती तीनही भावांनी हाच व्यवसाय करिअर म्हणून निवडला आहे. त्यातून स्वरोजगार मिळतो आहेच. शिवाय तीन जणांना वर्षभर रोजगार दिला आहे. प्रत्येकाला दरमहा ९००० हजार रुपये वेतन दिले जाते. याशिवाय भाकड झालेली जनावरे चारण्यासाठी दोघांना काम उपलब्ध झाले आहे. दूध देणे बंद झाल्यानंतर अनेक वेळा जनावरांची विक्री केली जाते. गावंडे मात्र भाकड जनावरांची विक्री करीत नाहीत. ही जनावरे सांभाळण्यासाठी त्यांनी मजूर ठेवले आहेत. शेणखत विक्रीतून उत्पन्न जनावरांपासून वर्षाला सुमारे ६० ते ७० ट्रॉली शेण उपलब्ध होते. आपल्या कापूस, ज्वारी अशा पिकांत त्याचा वापर करून उर्वरित शेणखताची विक्री केली जाते. त्यातून वर्षाला सुमारे दीड ते दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. ही एक प्रकारे बोनस रक्कमच असते. चाऱ्याचे नियोजन गावंडे आपल्या सहा एकरांपैकी चार एकरांत चारा पीक घेतात. त्यातून ओल्या चाऱ्याची सोय होते. सोबतच हरभऱ्याचे कुटार, कडबा कुट्टी, ढेपीचा वापर केला आहे. हिरवा चारा अजून मिळावा यासाठी गावाशेजारील एक शेत कराराने कसण्यास घेतले आहे. जिल्हा परिषद कृषी विभागाच्या योजनेतून अनुदानावर कुट्टी यंत्र घेतले आहे. वर्षभर पुरेल एवढ्या चाऱ्याची प्रत्येक हंगामातून व्यवस्था केली जाते. यासाठी मोठे गोदाम उभारले आहे. परिसरातील गावांमधूनही गरजेनुसार चारा खरेदी होते. बाभूळगाव...दूध पुरवठादारांचे गाव ! अकोला शहरापासून काही अंतरावर असलेले बाभूळगाव हे अकोला शहरातील नागरिकांना दूध पुरवठा करणारे गाव म्हणून ओळखले जाते. शहराची लोकसंख्या वाढत असून या तुलनेत स्थानिक पातळीवर दूध उत्पादन होत नाही. अकोलेकरांची दुधाची तहान आजही अन्य जिल्ह्यांतील दुधाने भागते. अशा स्थितीत बाभूळगावसारख्या छोट्या गावात दररोज पाच हजार लिटरपेक्षा अधिक दूध उत्पादित होणे ही उल्लेखनीय बाब म्हणावी लागेल. किशोर गावंडे यांच्यासारखे ३० ते ४० जण मोठे दूध पुरवठादार आहेत. दररोज दोन्ही वेळेस ३० ते ४० गाड्यांमधून अकोला येथे दूध नेले जाते. दुधाळ जनावरांची संख्याही वाढत आहे. यातून गावात रोजगार निर्मिती झाल्याचे गावंडे यांनी सांगितले. पुरस्कारांतून कामांची दखल अनेक वर्षांपासून गावंडे दुग्ध व्यवसाय अविरतपणे करीत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत रोटरी क्लब अकोला व जय गजानन कृषी मित्र परिवारातर्फे किशोर गावंडे यांचा कृषी दीपस्तंभ पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.   किशोर गावंडे, ९७६५०३३३७५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com