Dairy Farmer Success Story : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ हा दुष्काळी तालुका आहे. प्रतिकूलतेतही येथील शेतकऱ्यांनी द्राक्ष, डाळिंब आदी पिके यशस्वी केली आहेत. तालुक्यात दंडोबाच्या डोंगराच्या पायथ्याशी सुमारे चार हजार लोकसंख्येचे खरसिंग गाव वसले आहे. दुष्काळाच्या झळा सोसताना येथील गावकऱ्यांनी संकटांतून वेळोवेळी उभे राहण्याचे बळ दाखवले. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून कृष्णामाईचं पाणी अवतरल्यानंतर गावचं चित्र पालटण्यास मदत झाली. शिवार हिरवं झालं. .गावातील उद्धव व लक्ष्मी या पाटील दांपत्याचे घर व त्यानजिकच गोठा आहे. अनेक वर्षांपासून जातिवंत पंढरपुरी म्हशीचे संवर्धन करणारे कुटुंब म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे. शेती सहा एकर. आज त्यांचे चिरंजीव हणमंत आईवडिलांचा शेती व म्हैसपालनाचा वारसा नेटाने पुढे चालवत आहेत. हणमंत यांचे वडील उद्धव त्यांच्या काळात सांगली येथे शिक्षणासाठी होते. त्यांचे शिक्षण जुनी अकरावी. कुस्तीची खूप आवड असल्याने आखाड्यातील मातीचा छंद लागला. शिक्षण घेत असतानाच कै. संभाजी पवार, यांच्यासह तासगाव तालुक्यातील सावर्डे गावातील पहिलवानांसोबत मैत्री झाली. त्यातून तालीम घडू लागली. कुस्त्यांचे पटही जिंकले. बैलांच्या शर्यतीचाही नाद होता. त्यातही आपला ठसा उमटवला.अर्थात हे सर्व करताना शेती आणि घरच्या जनावरांकडं मात्र कदापीही दुर्लक्ष झाले नाही..पंढरपुरी म्हैस : हलक्या चाऱ्यावर तग धरणारी काटक जात.पंढरपुरी म्हशीपालनाचा विचारहणमंत यांची आई जुन्या आठवणींमध्ये रमतात. त्या सांगतात की घरी जित्राबं होती. पण दुभती म्हैस नव्हती.आरग (ता. मिरज) हे माझं माहेर. तिकडे नांदतं गोकूळ होतं. मग वडिलांकडेच दुभत्या म्हशीची मागणी केली. त्यांनी पहिल्या वेताची म्हैस बैलगाडीला बांधून आणून आमच्या दावणीला बांधली. तिथूनच जातिवंत म्हशीची पैदास सुरु झाली. हळूहळू एकाची दोन, दोनाची चार अशी दावणीला दुभती जनावरं वाढू लागली. हणमंत सांगतात की आमच्या गावापासून अवघ्या पाच किलोमीटरवर गवळेवाडी गाव आहे. तिथे अनेक गवळी होते. तिथल्या शेतकऱ्यांच्या दावणीला जातिवंत पंढरपुरी म्हशी होत्या. पंचक्रोशीत दूध खरेदी-विक्रीचा व्यवसाय चालायचा. आमच्या गावातील शेतकरी त्या गावात ये-जा करायचे. त्यातूनच तिथल्या गवळ्यांशी मैत्री झाली. तिथं जाऊन म्हशींच्या संगोपनाविषयी अधिक माहिती घेऊ लागलो. त्यातूनच या म्हशींचे महत्त्व अधोरेखित झाले. आपल्या गोठ्यातही त्यांची पैदास वाढविण्याविषयी घरी एकमत झालं..महैसपालनाचा प्रवासकाळ होता १९९०-९१ चा. गवळेवाडीतून दोन पंढरपुरी म्हैस खरेदी करण्यापासून हणमंत यांचा मुख्य प्रवास सुरु झाला. मग दोन आणखी म्हशी घेतल्या. हळूहळू गोठ्यात पैदास सुरु झाली. सन २००५ मध्ये मिरजेतील संजय आजरेकर आणि अशोक आजरेकर यांच्या माध्यमातून जातिवंत म्हशीची ओळख, पारख कशी करायची? वळू कसा निवडायचा असे अनेक बारकावे कळू लागले. त्यातून प्रत्येक ठिकाणी जाऊन जनावर आणण्याचा छंदच जडला. जिद्द, चिकाटी, नाद आणि कष्ट अशी चार सूत्रे पाटील कुटुंबाने समोर ठेवली. आजमितीला गोठ्यात लहान- मोठ्या धरून २७ ते २८ जातिवंत पंढरपुरी म्हशींचे संगोपन केले जात आहे..Pandharpuri Buffalo : चाऱ्याचा खर्च कमी तरीही दूध उत्पादनाला दमदार 'पंढरपुरी म्हैस'.घरोघरी रतिबाद्वारे थेट विक्रीसंपूर्ण पाटील कुटुंबच गोठ्यात राबते. एकही मजूर त्यांनी मदतीसाठी ठेवलेला नाही. म्हशीच्या संगोपनाबरोबरच खरशिंग आणि देशिंग या गावांमध्ये जाऊन हणमंत घरोघरी व हॉटेल व्यावसायिकांना दुधाचे रतीब घालण्याचे कष्ट उचलतात. सुमारे ४० ते ४५ रोजचे ग्राहक आहेत. दररोजचे ५० ते ६० लिटर ल व कमाल १०० लिटरपर्यंत दूध संकलन होते. प्रति लिटर ६० ते ७० रुपये दर मिळतो. ताज्या, खात्रीशीर, गुणवत्ताप्राप्त दुधाला ग्राहकांकडून चांगली मागणी असते..पंढरपुरी म्हशीची वैशिष्ट्येलांब, तलवारीसारखी वर्तुळाकार शिंगेचेहरा लांब, रंग काळा, उंची, लांबी आणि काटकपणा अधिकउत्कृष्ट प्रजनन क्षमता (जास्त वेत असणारी)भाकडकाळ कमी.सरासरी दोन्ही वेळेस १४ लिटरच्या आसपास दुधाचे उत्पादन.शांत आणि लळा लावणारी म्हैस.प्रतिकारशक्ती चांगली.वंशावळ जपण्याचा प्रयत्नहणमंत सांगतात की म्हशीची वंशावळ शुध्द व उच्च दर्जाची ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच व्यवसायात यशस्वीपणे टिकून राहणे शक्य झाले आहे. पैदाशीसाठी गोठ्यातील वळूचा वापर न करताना अन्यत्र ठिकाणच्या वळूचा उपयोग करतो. मेटी, भारीकांडी, तेलकट भोरी, कोचारी खडी, पंचकल्याणी आदी नावांवरूनही म्हशीची ओळख केली जाते. याच व्यवसायातून संसार उभा केला आहे. सोयीसुविधा तयार केल्या..अतिरिक्त उत्पन्नसर्वसाधारण दुग्धव्यवसायातून ५० टक्के नफा हाती येतो. वर्षाकाठी अंदाजे २५ ट्रेलर शेणखत मिळते. शेतासाठी आवश्यक शेणखत वापरून उर्वरित खताची प्रति ट्रेलर सहा हजार रुपये दराने विक्री होते. त्यातून एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. पंढरपुरी म्हशीला बाजारात मागणी चांगली आहे.हणमंत सांगतात की जनावरांच्या बाजारात स्वतः जाऊन कधीच विक्री केलेली नाही. बांधावरच सांगली, कोल्हापूर, सोलापूर, विजापूर या ठिकाणचे पशुपालक येऊन घेऊन जातात. एका महिन्याचे वय असणाऱ्या रेडीस १० हजार ते २० हजार रुपये तर पहिल्या आणि दुसऱ्या वेताच्या म्हशीला दीड लाख ते दोन लाख रुपये दर मिळतो. वर्षभरात चार ते पाचच्या दरम्यान जनावरांची विक्री होते. खरेदीसाठी येतात. कारण जातिवंत म्हैस असल्याने, पशुपालक अगोदरच बुकिंग करतात, असे हणमंत पाटील सांगतात.हणमंत पाटील ९६३७९६४११९.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.