Farmer Agro Tourism Success Story : दैनंदिन धावपळ, धकाधकीच्या जीवनशैलीत निवांतपणा गरजेचा झाल्याने निसर्गरम्य ग्रामीण भागात शहरी पर्यटक रुळू लागले आहेत. यातूनच कृषी पर्यटनाला चालना मिळाली आहे. राजगड तालुका हा तसा भाताचे आगार. हा परिसर सह्याद्री रांगेत असल्याने पानशेत धरण, नद्या, धबधबे असल्याने पर्यटकांची या भागाला पसंती आहे. पानशेत धरणाच्या बॅकवॉटरच्या काठावर पोळे हे गाव आहे. या भागात भात शेती मोठ्या प्रमाणात होते. तसेच हक्काचे पीक म्हणून शेतकऱ्यांनी मेस बांबू लागवड केलेली आहे. हा भाग निसर्गरम्य असल्याने प्रयोगशील शेतकऱ्यांनी काळाची गरज ओळखून कृषी पर्यटनास चालना दिली आहे. यापैकीच एक आहेत पोळे गावातील अनंता निवंगुणे. त्याच्याकडे ३० एकर शेती आहे. त्यापैकी २० एकर डोंगरी भागात त्यांनी बांबू लागवड केली. .याचबरोबरीने २०१६ मध्ये कृषी पर्यटनास सुरवात केली. सुरुवातीला डोंगर उतारावर खाचरेकरून शेतीयोग्य जमीन केली. त्यानंतर भात, बांबू लागवडीला चालना दिली. हळूहळू कृषी पर्यटन करण्याच्या उद्देशाने माळरानावर विविध फळझाडांची लागवड केली. स्वतःच्या कल्पनेतून साकारलेल्या या प्रकल्पास त्यांनी आनंदवन कृषी पर्यटन केंद्र हे नाव दिले. पर्यटन केंद्राच्या एका बाजूस सह्याद्री डोंगररांग, दुसऱ्या बाजूस पानशेत धरण आणि पश्चिमेस ५ कि.मी अंतरावर कोकण कडा अशा नैसर्गिक सीमा असलेल्या भागात पर्यटन केंद्राचा चांगला विस्तार झाला आहे..Agri Tourism : उजाड माळरानावर बहरले कृषी पर्यटन केंद्र.विविध फळपिके, बांबू लागवडअनंता निवंगुणे यांनी कृषी विभागाच्या माध्यमातून सुरुवातीला फळबाग लागवड केली. त्यानंतर बांबू लागवड करून २०१६ मध्ये पर्यटकांसाठी विश्रांतीसाठी दोन खोल्या बांधल्या. हळूहळू कृषी पर्यटनाला सुरुवात केली. कृषी पर्यटनाची सर्व जबाबदारी त्याचे बंधू अरुण निवंगुणे सांभाळतात. आजही शेतीमध्ये दत्तात्रय, अनंता, अरुण, दीपक या चार भावांचे एकत्रित १८ व्यक्तींचे कुटुंब राहत आहे. यामध्ये काही जण शेती बघतात, तर काहीजण व्यवसाय करतात. त्यांनी पर्यटकांच्या मागणीनुसार हळूहळू सोईसुविधांसाठी वाढ केली. मागील आठ वर्षांपासून निवासी पर्यटक येण्यास सुरुवात झाली. पर्यटन उद्योगाचे व्यवस्थापन अनंता, अरुण हे दोन भाऊ करत आहे. या पर्यटन क्षेत्रामध्ये सध्या फणस ४००, जांभूळ २००, काजू २००, नारळ १५०, आंबा ८००, चिकू २५०, चिंच ५, लिंबू २०, आवळा १०० झाडांची लागवड आहे. दहा एकरावर फळबागेचा विस्तार झालेला आहे. या शिवारात भात, हळद तसेच दिड एकरावर विविध भाजीपाला पिकांची लागवड असते. याबरोबरीने डोंगरात करवंद, तोरण, आळू असा रानमेवा उपलब्ध असतो. शेती विकासासाठी‘आत्मा’चे निलेश अब्दागिरे, हेमंत पवार यांचे मार्गदर्शन मिळते..बांबूची शेती हा आनंदवन कृषी पर्यटनाचा पाया आहे. सुमारे दहा एकरांवर विविध जातीच्या बाबूंची लागवड केलेली आहे. यामध्ये मेस, माणगा, बोरबेट, कुडा, काटेरी कळक, मानवेल, ब्रँडीसा बांबू जातींचा समावेश आहे. हंगामाच्या काळात भात लागवड तसेच भाजीपाला, फळांची काढणी या प्रक्रियांमध्ये पर्यटकांना आवर्जून सहभागी करून घेण्यात येते. हंगामनिहाय खाद्यसंस्कृती उपलब्ध असल्याने हे केंद्र पर्यटकांच्या विशेष आवडीचे स्थळ ठरत आहे. दिवाळी ते जून या कालावधीत दर महिन्याला सरासरी ४०० पर्यटक भेटी देतात. पावसाळ्यात या संख्येत मोठी वाढ होते. याठिकाणी एकदिवसाच्या सहलीसाठी १००० रुपये प्रति व्यक्ती, ८०० रुपये मुलांसाठी तसेच निवासी सहलीच्या २४ तासांसाठी प्रति व्यक्ति २००० रुपये, १५०० रुपये मुलांसाठी असा दर आकारण्यात येतो. यामध्ये दिवसभराचे जेवण, चहा, नाष्टा यांचा समावेश आहे. पर्यटकांना राहण्यासाठी बांबूपासून बनविलेली घरे तसेच पक्या स्वरूपातील पाच खोल्या, टेन्ट आवश्यकतेनुसार उपलब्ध असतात. पर्यटकांना चुलीवरील शाकाहारी, मांसाहारी भोजन तसेच नाष्ट्यासाठी पोहे, उपमा, काकडीचे वडे, भोपळ्याचे वडे, घावन, थालीपीठ असे ग्रामीण पदार्थ असतात..Agri Tourism Business : कृषी पर्यटन झाला भक्कम आधाराचा व्यवसाय.वैशिष्ट्येनैसर्गिक पर्यावरणाचा अनुभव.पर्यटकांचा भात, हळद लागवड याचबरोबरीने वृक्षारोपण, फळबाग लागवडीमध्ये सहभाग.पर्यटन केंद्रासमोर भैरवनाथ मंदिर.फुलझाडांची योग्य पद्धतीने लागवड.वनविहाराचे आयोजनसह्याद्री रांगांत असणाऱ्या जंगलातील भटकंती विलक्षण अनुभव देणारी असते. भटकंतीसाठी विविध वनस्पतींनी भरलेले डोंगर आणि देवराई हा उत्तम पर्याय परिसरात उपलब्ध आहे. याठिकाणी कौटुंबिक सहल, शाळा, कॉलेजच्या सहली, अभ्यासदौरे, शासकीय संस्था, कंपन्यांचे ट्रेनिंग, उन्हाळी, हिवाळी शिबिर,छोटेखानी वाढदिवस, साखरपुडा असे उपक्रम कृषी पर्यटन केंद्रात होत असतात..पर्यटन केंद्रातील उपक्रमसेंद्रिय शेती, शेळीपालन, गावरान कुक्कुटपालन, गाई, म्हैसपालन.कचऱ्यापासून खत निर्मिती.बांबू, भात आणि फळबाग रोपवाटिका.टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तूंची निर्मिती.ग्रामीण संस्कृती, पारंपारिक अवजारांचा संग्रह.जंगल सफारीतून जंगली प्राणी,पशूपक्षांची माहिती.विविध महोत्सवाचे आयोजनभात लावणी, फळबाग लागवड, शिमगा महोत्सव.बांबू लागवड, रानभाज्या,रानमेवा महोत्सव.उन्हाळ्यात आमरस पार्टी.आकाश दर्शन..ऐतिहासिक ठिकाणे, पक्षिनिरीक्षणपर्यटनाच्या ठिकाणी समृद्ध वनवैभव शाबूत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पक्षी निरीक्षण महोत्सवाचे आयोजन केले जाते. यासह जवळच सिद्धेश्वर मंदिर,पांडवकालीन गुहा, शिवकालीन डेरेबंडा टेहळणी बुरूज, देवराई,जननी माता मंदिर अशा ठिकाणी पर्यटकांना भटकंतीसाठी नेले जाते.अनंता निवंगुणे, ९०११८२७०७०.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.