युवा शेतकऱ्याने केले यशस्वी ब्रॉयलर पक्षीपालन 

पोल्ट्री व्यवसायात घरच्यांचीसाथ महेश म्हणाले की, दुष्काळात शेतीतून उत्पन्न मिळवण्यावर अनेक मर्यादा येत आहेत. ब्रॉयलर पक्ष्यांच्या व्यवसायाचा म्हणूनच शेतीला मोठा आधार झाला आहे. दोन कायमस्वरूपी मजूर आहेत. मात्र आईवडील, भाऊ व दोघांच्या पत्नी असे घरचे पाच ते सहा सदस्य मिळून व्यवसायात राबत असल्यानेच व्यवसाय आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे शक्य झाले.
युवा शेतकऱ्याने केले यशस्वी ब्रॉयलर पक्षीपालन 
युवा शेतकऱ्याने केले यशस्वी ब्रॉयलर पक्षीपालन 

लातूर जिल्ह्यातील हडोळती येथील महेश गोजेवाड या तरुणाने दुष्काळात शेतीत आलेल्या मर्यादा ओळखून ब्रॉयलर कोंबडीपालन सुरू केले. सातत्यपूर्ण प्रयत्नांमधून एक हजार पक्ष्यांपासून सुरू केलेला हा व्यवसाय साडेसहा हजार पक्ष्यांपर्यंत विस्तारला आहे. वर्षाला सुमारे सहा बॅचेसमधून समाधानकारक उत्पादन घेत पक्ष्यांना चांगली बाजारपेठही मिळवली आहे. दुष्काळातील शेतीला या व्यवसायातून त्याने चांगलाच आधार दिला आहे.  लातूर जिल्ह्यात हडोळती (ता. अहमदपूर) येथील महेश गोजेवाड यांची सुमारे दहा एकर शेती आहे. मात्र सातत्याने येत असलेल्या दुष्काळामुळे विविध पिके घेण्यावर मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे महेश यांनी पूरक व्यवसायांची चाचपणी सुरू केली. पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय पदविका अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला. या क्षेत्रात नोकरी मिळण्याची अपेक्षा होती. मात्र सेवादाता म्हणून व्यवसाय सुरू केला. त्याद्वारे दुग्ध व्यवसायातील बारकावे अभ्यासले.  शेतीतून राजकारणात व पुन्हा शेतीत  दरम्यान, गावाच्या राजकारणाची गोडी लागली. ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्यावर शेतीकडे म्हणावे तसे लक्ष देणे शक्य होईना. त्यामुळे कष्टाच्या भाकरीकडे दुर्लक्ष झाले. मग महेश पुन्हा शेतीकडे वळले. दुग्ध व्यवसाय जेमतेम सुरू होता. मात्र अधिक अभ्यास केल्यानंतर ब्रॉयलर पक्ष्यांचा व्यवसाय फायदेशीर राहील असे वाटले. जिल्हा परिषदेच्या योजनेतून एक हजार ब्रॉयलर कोंबडीपालनाची योजना राबवण्यास सुरवात केली. यातूनच व्यवसायाची पहाट झाली असे म्हणता येईल  व्यवसायातील ठळक बाबी 

  • व्यवसाय अधिक क्षमतेने चालावा यासाठी लातूर, नांदेड जिल्ह्यांतील पोल्ट्री व्यवसाय महेश यांनी प्रत्यक्ष पाहिले. हैदराबाद तसेच पुणे येथील पोल्ट्री प्रदर्शनांनाही भेटी दिल्या. 
  • सुमारे १५ लाख रुपये खर्च करून शेड उभारले. यात १०० बाय ३० फूट व १४० बाय २५ फूट आकाराची दोन शेडस आहेत. 
  • व्यवसायात अजून १४ लाख रुपयांची गुंतवणूकदेखील अपेक्षित असल्याचे ते सांगतात. 
  • व्यवसायात मिळत असलेले उत्पन्नच पुन्हा भांडवल म्हणून वापरून वृद्धी केली. 
  • एक दिवसाचे पिलू १५ रुपयांपासून ते २५, ३० व कमाल ४५ रुपयांना खरेदी करावे लागते. 
  • हंगामानुर त्यांचे दर बदलतात. 
  • चार वर्षांपूर्वी एक हजार पक्ष्यांच्या संगोपन सुरू केलेला हा व्यवसाय आज साडेसहा हजार पक्ष्यांपर्यंत विस्तारला आहे. 
  • पुणे येथील या क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीकडून एक दिवसाची पिले संगोपनासाठी उपलब्ध होतात. 
  • कोंबड्यांचे सूक्ष्म निरीक्षण करण्याची महेश यांची सवय आहे. त्यामुळे चांगले व्यवस्थापन करणे सोपे होते. त्यांना आजाराची लागण झाल्यास ते समजून येते. हा व्यवसाय यशस्वी करताना लसीकरणाच्या वेळाही काटेकोर पाळण्यात येतात. 
  • संगोपन करताना वातावरण बदलाचाही फटका बसतो. 
  • सुमारे पाच टक्क्यांपर्यंत मरतुकीचे प्रमाण. 
  • पूर्ण लक्ष घालून जिद्द व परिश्रमाच्या जोरावरच तो यशस्वी करावा लागतो असा महेश यांचा अनुभव आहे. 
  • अर्थकारण व विक्री व्यवस्था 

  • सुमारे ४५ दिवस संगोपन केल्यानंतर पक्षी सरासरी अडीच किलो वजनाचे म्हणजेच विक्रीयोग्य होतात. 
  • वर्षभरात सुमारे पाच ते सहा बॅचेस घेतल्या जातात. 
  • पक्ष्यांची विक्री व्यवस्था जागेवरच होत असल्याने फारशी जोखीम नसते. जो व्यापारी चांगला दर देईल त्याला पक्ष्यांची विक्री केली जाते. 
  • वर्षाची सरासरी पकडली तर प्रति किलो ७२ रुपये दर मिळतो. हा दर खाली घसरून ५२ रुपयेदेखील होतो. तर कमाल ११८ रुपयांवरही जातो. 
  • प्रति पक्ष्याच्या संगोपनासाठी प्रति बॅचमागे पशुखाद्याचा खर्च ८० रुपये असतो. अलीकडील काळात मका व अन्य खाद्याचे दर वाढले आहेत. 
  • प्रति पक्ष्यामागे सुमारे २० ते २५ रुपये नफा मिळू शकतो. अर्थात हंगाम, उत्पादन खर्च, मजुरी, दरांतील चढउतार यानुसार नफा घटतोही. 
  • वर्षाकाठी सुमारे २५ ट्रॅक्टर ट्रॉली कोंबडीखत मिळते. प्रति ट्रॉली तीन ते चार हजार रुपये दराने त्याची विक्री होते. 
  • सुमारे ७० ते ७५ टक्के खर्च पशुखाद्यावर होतो. 
  • युवकांना मोफत प्रशिक्षण-  महेश यांच्या घरातील वडीलधाऱ्यांनी सरपंच, उपसरपंद अशी पदे भूषवली आहेत. महेशदेखील ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आहेत. युवकांना या व्यवसायासाठी प्रेरणा मिळावी यासाठी महेश इच्छुक शेतकऱ्यांना या व्यवसायात मोफत मार्गदर्शन करतात. व्यवसाय करताना जोखीम स्वीकारण्याची मानसिक तयारी केली. गावाच्या राजकारणाकडे वेळ देण्यापेक्षा आपल्या भाकरीवर लक्ष केंद्रित करून पूर्ण वेळ दिल्यास यशाच्या पायघड्या साद घालतात अशी आत्मविश्र्वासपूर्वक प्रतिक्रिया महेश देतात. मिळालेल्या संधीचे सोने केल्यास निश्चितच यश मिळते. हडोळतीच्या या युवकाची ही झेप जिल्ह्यासाठी कौतुकास्पद व अनेकांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॅा. भूपेंद्र बोधनकर व्यक्त करतात.  संपर्क- महेश गोजेवाड- ९६८९६६१८८९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com