
नगर जिल्ह्यातील कोळगाव हा ऊसपट्टा म्हणून प्रसिद्ध आहे. येथील प्रशांत लगड यांनी आपल्या १० एकर शेतीला पूरक म्हणून चार वर्षांपूर्वी रेशीम व्यवसाय सुरू केला. घरातील सर्वांचा हातभार, शेड व्यवस्थापन, गुणवत्तापूर्ण उत्पादनातून या व्यवसायात यश मिळवत आर्थिक प्रगती साधली आहे. नगर जिल्ह्यातील कोळगाव (ता. श्रीगोंदा) परिसरात कॅनॉलमुळे पाण्याची चांगली उपलब्धता आहे. त्यामुळे शेतकरी उसासह अन्य नगदी पिके घेतात. लिंबू लागवडीलाही भागात शेतकरी प्राधान्य देतात. गावातील प्रशांत पांडुरंग लगड यांची वडिलोपार्जित दहा एकर शेती आहे. वीस वर्षांपूर्वी अभियांत्रिकी पदविकेपर्यंत त्यांचे शिक्षण झाले. शिक्षणानंतर काही दिवसांतच वडिलांचे निधन झाले. त्यामुळे प्रशांत यांनी नोकरी न करता शेतीचीच जबाबदारी सांभाळली. सध्या त्यांच्याकडे पाच एकर ऊस, दीड एकर लिंबू बाग आहे. पूरक व्यवसायाचा पर्याय शेतीमालाच्या दरांतील अस्थिरता, वाढलेले खर्च या बाबी पाहता केवळ पिकांवर अवलंबून राहणे शक्य नव्हते. सोळा संकरित गायींचे पालन करून सात वर्षे दुग्ध व्यवसाय केला. मात्र मजुरांची टंचाई, मिळणारे अल्प दर यामुळे हा व्यवसाय थांबवला. दोन- तीन एकरांवर सहा वर्षांपूर्वी विविध भाजीपाला पिकांची लागवड करून तीन वर्षे भाजीपालाही पिकवला. पण पुन्हा मजूरटंचाईमुळे उत्पादन घेणे थांबविले. अखेर विविध पूरक व्यवसायांचा अभ्यास व त्यांचे अर्थकारण अभ्यासून रेशीम व्यवसायाला पसंती दिली. चार वर्षांपासून आज त्यात सातत्य आहे. मित्रांच्या मार्गदर्शनातून वाटचाल प्रशांत यांचे तालुक्यातील काष्टी येथील अविनाश धामणे, लोणी प्रवरा येथील विवेक लगड हे मित्र साधारण दहा वर्षांपासून रेशीम शेती करतात. त्यांचे मार्गदर्शन मिळू लागले. पुणे जिल्ह्यातील काही रेशीम व्यवसायांचीही पाहणी केली. साडेतीन लाख रुपये खर्च करून शेड उभारले. लोणी (ता. राहाता) येथून रोपे आणून पहिल्या वर्षी एक एकरात तुतीची लागवड केली. चांगले व्यवस्थापन करून पहिल्या वर्षी चांगले रेशीम उत्पादन घेतले. आत्मविश्वास वाढला. त्यानंतर एक एकर तुतीची वाढ केली. व्यवस्थापनातील मुद्दे जिल्हा रेशीम कार्यालयाकडून अंडीपुंज आणली जातात. बायव्होल्टाइन रेशीम कीटकांपासून कोषनिर्मिती होते. चॉकी संगोपन प्रशांत स्वतःच करतात. रेशीम अळ्यांना विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असतो. त्याद्वारे मरतूक टाळण्यासाठी व्यवस्थापन स्वच्छतापूर्ण व हवेशीर वातावरणात केले जाते. चंद्रिका जाळ्या, ट्रे, त्यासाठी लागणारे साहित्य निर्जंतूक केले जाते. वातावरणानुसार आर्द्रता व उष्णता योग्य ठेवली जाते. तुतीला एकरी तीन ते चार ट्रॅक्टर ट्रॉली शेणखत, जिवामृत, सेंद्रिय खतांचा वापर होतो. त्यामुळे पाल्याचा दर्जा सुधारतो. उत्पादन आज दोन एकर तुती क्षेत्राच्या आधारे वर्षभरात सुमारे पाच बॅचेस घेतल्या जातात. प्रति बॅच ३०० अंडीपुंजांची असते. त्यातून २४० ते ३०० किलोपर्यंत उत्पादन मिळते. त्यासाठी उत्पादन खर्च २५ हजार रुपयांपर्यंत असतो. वर्षभरात मिळून सुमारे १५०० किलोपर्यंत रेशीम कोषांचे उत्पादन मिळते. सुमारे तीन जोडपी कामांसाठी तैनात केली आहेत. शिवाय घरचे सर्व सदस्य देखील राबत असल्याचे श्रमांची विभागणी होऊन खर्च कमी झाला आहे. विक्री, दर व बाजारपेठा विक्री करण्यासाठी बीड, जालना या बाजारपेठा प्रशांत यांना सोईस्कर ठरत आहेत. ते सांगतात की रामनगर (बंगळूर) येथील बाजारपेठेत दर चांगले मिळतात. मात्र अंतर जास्त असल्याने व एकट्यालाच सगळी कसरत करावी लागत असल्याने अन्य बाजारपेठांचे पर्याय फायदेशीर ठरतात. शिवाय स्थानिक पातळीवरही रेशीम खरेदी करणारे व्यापारी येतात. अलीकडील वर्षांचा विचार केल्यास कोषांना प्रति किलो तीनशे ते साडेतीनशे रुपये दर मिळत आहे. लॉकडाउन काळात दर अत्यंत घटले होते. आता मात्र परिस्थिती सुधारत आहे. सध्या मागणी अधिक असल्याने दरही बऱ्यापैकी असल्याने शेतकरी रेशीम शेतीकडे वळत असल्याचे प्रशांत सांगतात. शेतीतील उत्पादन प्रशांत यांनी शेतीकडेही चांगल्या प्रकारे लक्ष दिले आहे. सात वर्षांपासून ते उसाची पट्टा पद्धतीने पाच फुटांवर लागवड करतात. पाल्याची कुट्टी करून त्याचे खत तयार करतात. त्याचा चांगला फायदा झाला आहे. एकरी ७० ते ८० टनांपर्यंत ते उत्पादन घेतात. लिंबाचेही एकरी १० टनांपर्यंत उत्पादन मिळते. त्याची स्थानिक बाजारात विक्री करतात. बारमाही पीक म्हणून त्याकडे पाहिले जाते. वर्षभरात लिंबापासून सुमारे दोन ते तीन लाखांचे उत्पन्न मिळते. ट्रॅक्टरच्या कामांतून उत्पन्न जोड प्रशांत यांनी उत्पन्नवाढीचे विविध पर्याय वाढवून घरचे व शेतीचे अर्थकारण उंचावले आहे. स्वतःच्या शेतीकामांसाठी सात वर्षांपूर्वी पाच लाख रुपये खर्च करून ट्रॅक्टर खरेदी केला. आज त्याच्याच मदतीने बाहेरही रोजंदारीने तो भाडेतत्वावर देतात. त्यातून वर्षाला साधारणपणे दोन ते तीन लाख रुपयांचा आर्थिक हातभार लागतो. प्रतिक्रिया शेतीला पूरक म्हणून रेशीम व्यवसाय मला निश्चित फायदेशीर ठरला आहे. अन्य व्यवसायांच्या तुलनेत त्यात जोखीम वा नुकसानीचे प्रमाण कमी आहे. जिद्द, चिकाटी, परिश्रमांची तयारी ठेवल्यास त्यात निश्चित प्रगती साधता येते. -प्रशांत लगड, ९८८१९८१०५४
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.