जवसाच्या यशस्वी शेतीचे आत्मसात झाले तंत्र

घारोळा (घरणी) (जि. लातूर) येथील हाडाचे प्रयोगशील शेतकरी अशोकराव धोंडिराम चिंते यांनी सुमारे आठ वर्षांपासून जवस पिकाच्या शेतीत सातत्य ठेवत उत्पादकतेचे तंत्र आत्मसात केले आहे. तज्ज्ञांचे मार्गदर्शन, उत्तम व्यवस्थापन, सुधारित वाण व अनुभवातून एकरी ७ ते ८ क्विंटलपर्यंत उत्पादन घेताना अर्थकारणही फायदेशीर केले आहे.
चिंते यांचे जवसाचे पीक.
चिंते यांचे जवसाचे पीक.

घारोळा (घरणी) (जि. लातूर) येथील हाडाचे प्रयोगशील शेतकरी अशोकराव धोंडिराम चिंते यांनी सुमारे आठ वर्षांपासून जवस पिकाच्या शेतीत सातत्य ठेवत उत्पादकतेचे तंत्र आत्मसात केले आहे. तज्ज्ञांचे मार्गदर्शन, उत्तम व्यवस्थापन, सुधारित वाण व अनुभवातून एकरी ७ ते ८ क्विंटलपर्यंत उत्पादन घेताना अर्थकारणही फायदेशीर केले आहे.   काही व्यक्ती अशा असतात की नेहमी नवीन प्रयोग, तंत्रज्ञान, पिके यांच्या मागे ते झपाट्याने लागलेले असतात. त्यातील बारकावे शोधून स्वत:चे कसब पणाला लावून त्यात यशस्वी होतात. त्यातीलच एक म्हणजे लातूर जिल्ह्यात घारोळा (घरणी) (ता. चाकूर) येथील हाडाचे प्रयोगशील शेतकरी अशोकराव धोंडिराम चिंते होत. वयाच्या साठीच्या आसपास असताना त्यांची प्रयोगशीलता पाहून थक्क व्हायला होते. सोयाबीन, हरभरा व अन्य बीजोत्पादनात अग्रेसर असलेल्या लातूर स्थित ओमसाई प्रोड्यूसर कंपनीची धुरा ते समर्थपणे सांभाळत आहेत. जवसाच्या शेतीला सुरुवात एकदा लातूर येथील गळीत धान्य संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. एम.के. घोडके यांच्याकडे जवसाचे एलएसएल- ९३ (लातूर जवस- ९३) जातीचे शंभर किलो बियाणे शंभर टक्के अनुदानावर वाटपासाठी आले होते. अशोकराव तेव्हा नुकतेच सोयाबीन बीजोत्पादनात उतरलेले होते. त्यांनाही दहा किलो बियाणे देण्यात आले. तीळ, जवस, कारळ, हुलगा आदींचे बियाणे किती खोलवर पेरावे, मातीत ओल किती असावी आदी बाळकडू अशोकरावांना वाडवडिलांकडून मिळालेच होते. जवसाची शेतीही फायदेशीर करण्याचे त्यांनी ठरवले. सुरुवातीच्या प्रयोगांत चांगली मशागत, गावरान खते देऊन ओल असताना, कमी खोलीत ऑक्टोबरमध्ये वेळेत पेरणी केली. चांगली मेहनत व वेळोवेळी मार्गदर्शन घेत एकरी पाच क्विंटल उत्पादन घेतले. दोन किलोचे पॅकिंग करून बियाणे जवळचे मित्र व पाहुण्यांना दिले. जवसाचे महत्त्व मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणात, त्याखालोखाल राजस्थान, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, ओरिसा, उत्तरप्रदेश, छत्तीसगड, पश्‍चिम बंगाल, आसाम या राज्यात जवसाची शेती होते. महाराष्ट्राचा विचार करता विदर्भात, तर मराठवाड्यात उस्मानाबाद, लातूर, बीड व नांदेड, नगर, सोलापूर या जिल्ह्यांत हे पीक घेतले जाते. बागायती उत्पादन घेतल्यास फायद्याचे पीक आहे. हरभऱ्याप्रमाणे कापणी करता येते. सुमारे ८० टक्के बोंडे पक्व झाल्यास कापणी करावी व दोन-तीन दिवस वाळवून लहान यंत्राद्वारे किंवा बडवून रास करावी. विशेष म्हणजे दोन वर्षे साठवून ठेवले तरी बियाण्याला कीड लागत नाही. उगवणही चांगली होते. दर मिळेपर्यंत ठेवले तरी नुकसान होत नाही. या पिकात औषधी गुणधर्म आहेत. हृदयविकार, सांधेदुखी तसेच अन्य महत्त्वाच्या आजारांना ते प्रतिबंध करते. ‘ॲन्टी ऑक्सिडंट्‍स’ घटक त्यात आहेत. मुखशुद्धी, चटणी या व्यतिरिक्त उद्योगक्षेत्रातही त्यास मागणी आहे. अशोकरावांची जवस शेती

  • सन २०१४ पासून जवसाच्या शेतीत सातत्य ठेवले ते आजयागत आहे.
  • दरवर्षी तीन ते चार एकर. यंदा हे क्षेत्र सुमारे १० एकर.
  • जवस हे आकाराने लहान, रब्बीतील कोरडवाहू अर्थात कमी पाण्यावर येणारे, सोटमूळ वर्गातले,
  • तेलवर्गीय व तसे दुर्लक्षित पीक. अन्य पिकांच्या बाजूला घरच्या चटणीसाठी दहा-वीस ओळी घेतल्या जायच्या. व्यापारी दृष्टिकोनातून मराठवाड्यात वा
  • महाराष्ट्रात सहसा मोठ्या क्षेत्रावर त्याची लागवड पाहायला मिळत नाही. मात्र अनेक वर्षांच्या अनुभवातून हरभरा पिकाला पर्यायी पीक म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे, त्याचे अर्थकारण बहुतांश शेतकऱ्यांना कळले पाहिजे असे अशोकरावांचे प्रयत्न असतात.
  • पूर्वी ते नागपूर २६० वाणाची लागवड करायचे. त्याचा कालावधी १२० दिवसांपर्यंत होता.
  • अलीकडील वर्षांत एलएसएल- ९३ हे वाण ते वापरतात. त्याची उंची एक फूट आहे. ते सुमारे ९५ दिवसांत पक्व होते. फुटवे ८ ते १० मिळतात.
  • बियाणे एकरी ८ ते १० किलो लागते.
  • लागवड ऑक्टोबरपासून डिसेंबरपर्यंत करता येते.
  • जमीन नांगरून, कुळवून, ढेकळे फोडून, ओल असताना कमी म्हणजे दोन ते अडीच इंच खोलीवर दहा इंच रूंदीवर पेरणी.
  • पाणी न धरणारी निचऱ्याची मध्यम ते भारी काळी जमीन. गावरान खत मिसळून पेरणी.
  • पुढे उगवणीला पुरेसा ओलावा असावा. फुटवे फुटताना, फुलांचे बोंडात रूपांतर होताना असे तीन वेळा पाणी. पहिल्या दोन वेळा तुषारद्वारे तर तिसऱ्या वेळी रेन पाइपद्वारे.
  • उत्पादन- एकरी पाच ते आठ क्विंटलपर्यंत.
  • दर- सात हजारांपासून ते यंदा १० हजार रुपयांपर्यंत.
  • उत्पादन खर्च- १० ते १५ हजार रुपयांपर्यंत.
  • लागवडीतील टिप्स

  • अशोकराव सांगतात की सातत्याने सोयाबीन, हरभरा अशी पिके घेत राहिल्याने रोग-किडींचे व हरभऱ्यात मरचे प्रमाण वाढल्याचे आढळते. जवस हे पीक म्हणूनच फेरपालटासाठी महत्त्वाचे आहे.
  • हरभऱ्यापेक्षा उत्पादन कमी येत नाही. या पिकाएवढाच किंबहुना जास्त आर्थिक फायदा जवसातून होतो. पाणी कमी लागते. गळीत धान्य असल्याने तेलात स्वावलंबी होता येते. त्याचे दरही शक्यतो फार वरखाली झालेले दिसत नाहीत.
  • जनावरे या पिकास खात नाहीत.
  • या पिकाचा बेवड चांगला असते. तण जास्त उगवत नाही. खते कमी लागतात. रोग- किडींचा फारसा प्रादुर्भाव नाही. वातावरणातील बदलानुसार करपा, भुरी, मूळसड आदी समस्या क्वचित येतात.
  • तज्ज्ञांच्या भेटी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, लातूर येथील कृषी विज्ञान केंद्र, हैदराबाद व कानपूर येथील शास्त्रज्ञांनी अशोकराव यांच्या शेताला भेट देऊन जवस व्यवस्थापनाचे कौतुक केले आहे. अशोकराव सांगतात, की बियाणे म्हणूनही विक्री करतो. त्यास किलोला १२० ते १५० रुपयांपर्यंत दर आहे. या पिकासंबंधी ते शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शनही करतात. सोयाबीन, हरभरा, तूर, करडई आदींचे यशस्वी बीजोत्पादन त्यांनी यापूर्वी यशस्वी केले आहे. या प्रयोगशीलतेमुळे शासन, कृषी विद्यापीठ व कृषी विभाग स्तरावर पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. संपर्क- अशोक चिंते, ९४०४६८१८८१, ९९२३२९६४५२ (लेखक निवृत्त कृषी अधिकारी व शेती- पर्यावरणाचे अभ्यासक आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com