बीटरूटला वर्षभर मागणी; उलाढाल कोटीच्या घरात

सावकर बबन दौडकर यांची बिटाची शेती
सावकर बबन दौडकर यांची बिटाची शेती

आधुनिक आहारशैलीत सॅलड व पर्यायाने बीटरूटचा वापर होतो. त्यास वर्षभर मागणी असते. पुणे- गुलटेकडी ही बीटरूटसाठी महत्त्वाची व मोठी बाजारपेठ आहे. वर्षभर आवक सुरू राहून उलाढालही कोट्यवधींच्या घरात जात असते. त्यामुळे शेतकऱ्यांकडून या पिकाला पसंती देण्यात येते. यंदा पुणे बाजारपेठेत बीट चांगलेच भाव खात असून, कधी नव्हे एवढे चांगले दर मिळत आहेत. पावसातून पीक वाचलेल्या व थेट विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळण्याची संधी त्यातून प्राप्त झाली.   अलीकडील काळात नेहमीच्या भाजीपाल्याबरोबर बीटरूट (प्रचलित भाषेत बीट) या भाजीच्या लागवडीकडेही शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. आधुनिक आहारशैलीत सॅलड व त्यात बीटचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांनी या पिकाला पसंती दिल्याचे दिसते. पुणे- गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी महाराज बाजार समितीत बीट हादेखील महत्त्वाचा घटक असून, त्याचा चांगला उठाव होत असतो. पावसामुळे दरांत वाढ यंदा ऑगस्ट ते ऑक्टोबरपर्यंत पडत राहिलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतीमालाच्या उत्पादनात घट झाली. त्यामुळे गुलटेकडी बाजारात आवक कमी होऊन बहुतांशी सर्वच भाजीपाला दरांत वाढ झाल्याचे दिसले. याला बीटही अपवाद ठरले नाही. दरवर्षी बिटाला थंडीच्या दिवसांत चांगले दर मिळत असले, तरी चालू वर्षी हे दर प्रतिकिलो २५-३० रुपयांपर्यंत पोचले. किरकोळ ग्राहकांना हेच बीट ४० ते ५० रुपयांप्रमाणे खरेदी करावे लागत आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, मंचर, यवत, खामगाव, दौडा या भागांत बिटाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. यंदा मुसळधार पावसामुळे त्याचे मोठे नुकसान झाले. त्याचा परिणाम उत्पादनावर व आवकेवर झाला. बीट पोषक स्थिती व मार्केट शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार साधारणपणे कोरडे हवामान असेल, तर बीट अधिक चांगल्या पद्धतीने येते. अतिपाऊस व जास्त तापमान त्यास सहन होत नाही. साधारणपणे लागवडीनंतर अडीच महिन्यांनंतर उत्पादन सुरू होते. उत्पादन सुरू झाल्यानंतर एकदाच काढणी होते. एकरी जवळपास ५ ते ६ टन उत्पादन मिळते. उत्पादित बिटाची शेतकरी जवळच्या मार्केटमध्ये विक्री करतात. पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागातील दौंड, इंदापूर, बारामती, आंबेगाव, खेड तालुक्यांतील शेतकऱ्यांना गुलटेकडीचे मार्केट जवळ आहे. व्यापारी हा माल पुढे परराज्यांत पाठवतात. पावसाळ्यातील जुलै ते ऑगस्ट या कालावधीत आंबेगाव, मंचर, यवत, दौंड परिसरातून मोठी आवक असते. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले दर मिळण्यास मदत होते. हंगाम व दर पुणे जिल्हा परिसरात सप्टेंबरच्या काळात उत्पादन सुरू होते. साहजिकच एकाच वेळी भरपूर माल विक्रीसाठी उपलब्ध होतो. या कालावधीत गुलटेकडी मार्केटमध्ये सुमारे २ ते अडीच हजार टन आवक होते. रविवारच्या दिवशी ती पाच ते सहा टनांवर पोचते. त्यामुळे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर या कालावधीत दर कमी म्हणजे साधारण प्रतिकिलो १० ते २० रुपये असतात. काही वेळेस त्याहून ते कमी होतात. यंदा मात्र परिस्थिती वेगळी आहे. बाजारपेठेत सरासरी एक ते दोन टनांची आवक होत असल्याने दर किलोला २५ ते ३० रुपये होते. असे राहतात दर (प्रति किलो)

कालावधी आवक सरासरी दर रु.
जुलै ते ऑक्टोबर सर्वाधिक १० ते २० रु
नोव्हेंबर ते मार्च कमी २०-३० रु
मार्च ते मे सर्वांत कमी ३० -६० रु.

  बिटाचे महत्त्व

  • काढणीनंतर पाच ते सहा दिवस टिकते.
  • सॅलड म्हणून अधिक वापर.
  • ग्राहकांकडून वर्षभर मागणी. सर्वाधिक मागणी हॉटेल व्यावसायिकांकडून.
  • पुण्यातून परराज्यांत जातो बीट  पुणे परिसरात जेव्हा लागवडी अधिक होतात तेव्हा उत्पादनात वाढ होते. अशा वेळेस पुणे मार्केटमध्ये आवकेत वाढ होते. त्या वेळी परराज्यांतून मागणी आल्यास तेथे बीट पाठविण्याची गरज असते. परराज्यांतील इंदूर, आग्रा, बंगळूर, बनारस, कोलकता, दिल्ली या ठिकाणी सुमारे १५ ते २० टन बीट पाठविले जाते. त्यामुळे पुण्यातील दर काही प्रमाणात स्थिर राहण्यास मदत होते.

    उलाढाल

  • पुणे मार्केटमध्ये वर्षभर प्रतिकिलो २० ते ३० रुपये दर. अनेक वेळा १० रुपयांपर्यंतची दर.
  • जुलै ते डिसेंबर या कालावधीत महिन्याला २० ते २५ लाख रुपयांच्या दरम्यान
  • तर डिसेंबर ते मार्च या कालावधीत ५ ते १० लाख रुपयांच्या दरम्यान उलाढाल
  • गुलटेकडी येथे २०१७-१८ मध्ये वर्षभरात २३ हजार ८६४ क्विंटल आवक झाली.
  • त्यातून चार कोटी २९ लाख ५५ हजार २०० रुपये, तर २०१८-१९ मध्ये २६ हजार १६२ क्विंटल आवकेसह तीन कोटी १३ लाख ९४ हजार ४०० रुपये उलाढाल झाली.
  • प्रतिक्रिया  पुणे मार्केटमध्ये पुणे जिल्ह्यातील अनेक भागांतून दररोज दोन ते तीन टन आवक होते. हंगामात ती मोठ्या प्रमाणात असतो. - अरविंद नवले, व्यापारी बिटाला किरकोळ व्यापाऱ्यांसह हॉटेल व्यावसायिकांकडून सर्वाधिक मागणी असते. त्यामुळे वर्षभर चांगले दर मिळत असले, तरी हिवाळ्यात व उन्हाळ्यात योग्य नियोजन केल्यास अधिक दर मिळू शकतील. - सदाशिव हरीभाऊ रायकर, व्यापारी, शेतकरी अनुभव दौडकरवाडी (ता. राजगुरुनगर, जि. पुणे) येथील येथील सावकर बबन दौडकर म्हणाले, की २००० पासून बीट घेतो. पंधरा ऑगस्ट आणि ऑक्टोबर अशा दोन वेळेस एक ते दोन एकरांत लागवड करतो. सुमारे दोन महिन्यांनंतर उत्पादन सुरू होते. पाटपाण्याने पाणी देतो. सारा पद्धतीचा उपयोग होतो. अलीकडील वर्षांपासून रासायनिक खतांऐवजी शेणखत व कोंबडीखताचा वापर होतो. ग्राहकांना चांगल्या प्रतीचा माल देणे त्यामुळे शक्य होते. या पिकात कीड-रोगांचा प्रादुर्भाव तसा कमी होतो. रासायनिक कीटकनाशकांऐवजी गोमूत्राचा वापर करतो. एकरी २० ते २५ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. पुणे शहर व मंचर जवळ असल्याने येथेच विक्री करण्यावर भर असतो. त्यामुळे ग्राहकांना जागेवर ताजा माल मिळतो. ऑगस्टमधील लागवड केलेल्या बिटाला अधिक चांगला दर मिळतो असा अनुभव आहे. यंदा पहिल्यांदाच मंचर येथे ऑक्टोबरमधील बिटाला सर्वाधिक प्रतिकिलो ४० ते ५० दर मिळाला, असेही दौडकर यांनी सांगितले. संपर्क - सावकर बबन दौडकर - ९८५००७६१२५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com