उत्पादनाबरोबरच उभारले विक्री व्यवस्थेचे व्यासपीठ

गटशेतीचा गाडा ओढताना शेतकऱ्यांना उत्पादित मालाच्या विक्रीची व्यवस्था सक्षम नसणे ही प्रमुख अडचण आली. ब्रॅंडच्या माध्यमातून विक्री व्यवस्था उभी केल्यास मालाला उचित दर व उत्पन्न वाढू शकते याची खात्री स्व:अनुभवातून आली. आता ॲग्रोव्हिजन गटशेतीसंघांतर्गत सर्व शेतकऱ्यांचा माल एकाच ब्रॅंडने विकण्यात येत आहे. -संजय मोरे पाटील अध्यक्ष, ॲग्रोव्हिजन गटशेतीसंघ संपर्क- ९४२२३७८५९३
  एग्रोव्हिजन गटशेतीच्या शिवार फेरीत सहभागी शेतकरी.
एग्रोव्हिजन गटशेतीच्या शिवार फेरीत सहभागी शेतकरी.

जालना जिल्ह्यातील ‘ॲग्रोव्हिजन’ या शेतकऱ्यांच्या संघानं गटशेती केलीच. मात्र, केवळ उत्पादनापुरते मर्यादित न राहता प्रक्रिया, ग्रेडिंग, पॅकिंग, विक्री, रोपवाटिका, यांत्रिकीकरण, तंत्रज्ञान आदींच्या माध्यमातून कक्षा रुंदावल्या. मासिक चर्चासत्रे, व्हॉट्‌स ग्रुप आदींमधून त्यास विस्ताराचे रूप दिले. जवळपास बारा जिल्ह्यांतील साडेसहाशेवर शेतकऱ्यांसोबत नाळ जोडली. आता तर औरंगाबादसारख्या शहरात विभागीय कार्यालय उघडून विक्री व्यवस्था मजबूत करताना व्यावसायिक शेतीचेही पाऊल पुढे टाकले आहे.   ॲग्रोव्हीजन गटशेती संघाची मुहूर्तमेढ रोवणारे संजय दमोतराव मोरे- पाटील मूळचे जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्‍यातील नळविहिरा येथील शेतकरी. वडिलोपार्जित ३६ एकर शेती. त्यातील सात एकर वगळता संपूर्ण कोरडवाहू. गटशेती करण्यासाठी पुढाकार घेऊन २००३ पासून त्यांनी काम सुरू केले. दोन वर्षांनी २४ शेतकऱ्यांना सोबत घेऊन २००५ मध्ये ‘ॲग्रोव्हिजन’ गटशेती संघाची अधिकृत स्थापना केली. शेतकरी जोडत गेले. एकमेकांत चर्चा, ज्ञान यांची देवाणघेवाण होत गेली. मग संघासोबत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील तसेच बुलडाणा, सोलापूर, नाशिक, पालघर आदी जिल्ह्यांतील जवळपास २२ गावांतील साडेसहाशे शेतकरी प्रत्यक्ष जोडले गेले. सीताफळ, आंबा, डाळिंब, आवळा तसेच कपाशी, तूर, उडीद, मूग, सोयाबीन, रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, कांदा, मिरची आदी विविध पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांचा गटात समावेश राहिला. मासिक चर्चासत्रातून संवाद प्रत्येक महिन्याच्या नऊ तारखेला ॲग्रोव्हिजन गटशेतीसंघाचे चर्चासत्र आयोजित केले जाते. त्यामध्ये शिवार फेरी, गटचर्चा, अहवाल वाचन होते. केवळ अनुदानापुरती शेती मर्यादित न राहता व्यावसायिक दृष्टिकोन तयार करण्याचा प्रयत्न गटाच्या माध्यमातून केला जातो. शिवाय तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाची शेतीला जोड देण्याविषयी तसेच विक्री व्यवस्था आदींविषयीही मार्गदर्शन केलं जातं. गटशेतीचं पुढच पाऊल संघाचे संजय मोरे-पाटील यांनी गटशेतीअंतर्गत शेतमाल विक्रीची सोय होण्यासाठी आपल्या नळविहिरा गावाच्या नावावर स्वतःचा "नल" हा ब्रॅंड तयार केला. प्रत्येक फळासाठी या ब्रॅंडनेमचा वापर करून विक्रीसाठी चार रंगी बॉक्‍स पॅकिंग तयार करून घेतले. विक्री प्रतिनिधींसाठी ड्रेसकोड तयार केला. सुरवात स्वत:च्या माल विक्रीच्या माध्यमातून करताना कमाल शंभर किमी परिसरातील विक्री ठिकाणे व त्यांच्या वेळा निश्‍चित केल्या. त्यासाठी स्वतंत्र वाहन ठेवले. ते योग्य प्रकारे सजविण्यात आले. ध्वनीक्षेपकाचा वापर करून शेतमालाचे मार्केटिंग केले. संपूर्ण सेंद्रिय पध्दतीनेच मालाचे उत्पादन होत असल्याने तसाही प्रचार केला. नैसर्गिकरित्या झाडांवरच पिकलेल्या फळांच्या वीट चवीनं ग्राहकांना भुरळ घातली. त्यांचा मोठा प्रतिसाद मिळू लागला. गुणवत्ता व प्रामाणिकपणाच्या बळावर हा विश्वास वाढत गेला. आता या ब्रॅंडचा वापर गटशेतीतील अन्य शेतकऱ्यांना मिळू लागला आहे. उभारलं गटशेतीचं कार्यालय आपल्या पाटील कृषी फार्मवरील उत्पादित आंबा, डाळिंब, सीताफळ आदी फळपिकांच्या थेट विक्रीतून आलेल्या यशस्वी अनुभवामुळे मोरे यांचा आत्मविश्‍वास वाढला. या धाडसातूनच त्यांनी औरंगाबाद येथे गटशेतीचं विभागीय कार्यालय सात जून, २०१८ मध्ये सुरू केलं. जवळपास डिसेंबरपर्यंत शेतकरी, ग्राहक तसेच मालाच्या विक्रीला मिळणारा प्रतिसाद अनुभवला. त्याचेही उत्साहवर्धक परिणाम दिसू लागल्यानंतरच पुढील काही कालावधीतच म्हणजे सहा डिसेंबर रोजी विभागीय कार्यालयाचे उद्‌घाटन केले. या वेळी शेतकऱ्यांसह कृषी विभागाचे अधिकारी व मान्यवर देखील उपस्थित होते. गटाचे पाऊल पडले पुढे- (ठळक वैशिष्ट्ये)

  • एक हजारांवर शेतकऱ्यांनी दिली कार्यालयाला भेट
  • यंदा वीस शेतकऱ्यांच्या शेतमालाला मिळणार संघाचे ब्रॅंडनेम
  • भेट देणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला होते इत्यंभूत मार्गदर्शन
  • विक्री व्यवस्थापनाचे धडे देण्यावर भर
  • फळपीक व इतर पीकविम्यासाठी आवश्‍यक माहितीचे (डाटा) होते संकलन
  • विमा कंपनीला शेतकऱ्यांच्या गरजेनुसार पुरविली जाते माहिती
  • शासनाच्या विविध कृषीविषयक योजनांचीही उपलब्ध होते माहिती
  • विक्री व्यवस्थापनासाठी २५ शेतकऱ्यांमागे एक स्टॉल उभारणीचे नियोजन
  • हजारो शेतकरी जोडण्याचा संकल्प ॲग्रोव्हिजन गटशेती संघाने किमान एक हजार शेतकरी आपल्याशी जोडून घेण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी २५ सदस्य असलेले किमान ४० शेतकरी गट जोडण्याचे काम केले जाणार आहे. त्यातून ५० टक्के गट जोडण्यात यश आले आहे. अशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून कृषीविस्तार व किमान दहा हजार शेतकऱ्यांपर्यंत व्यावसायिक शेतीचे महत्त्व अधोरेखित करण्याचे काम संघाच्या माध्यमातून केले जात आहे.  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com