नावीन्याची ओढ, नवे प्रयोग यांतून शेती झाली प्रयोगशाळा

बेलोरा (ता. चांदूरबाजार, जि. अमरावती) येथील आशुतोष देशमुख यांनीनिळ्या आभाळाखाली शेत शिवारात अनेक प्रयोग केले आहे. शेतीसाठी आवश्यक छोटी मोठी यंत्रे विकत आणण्याऐवजी विकसित करण्याकडे त्यांचा कल आहे.
नावीन्याची ओढ, नवे प्रयोग यांतून शेती झाली प्रयोगशाळा
नावीन्याची ओढ, नवे प्रयोग यांतून शेती झाली प्रयोगशाळा

चार भिंतीआड विविध रसायने आणि यंत्रांची उपलब्धता असलेला भाग याला प्रयोगशाळा समजतात. त्याच प्रमाणे फार मोठी आकडेमोड, अवघड तंत्र म्हणजे तंत्रज्ञान असाही अनेकांचा समज असतो. हा समज खोटा ठरवला आहे, बेलोरा (ता. चांदूरबाजार, जि. अमरावती) येथील आशुतोष देशमुख यांनी! निळ्या आभाळाखाली शेत शिवारात अनेक प्रयोग केले आहे. शेतीसाठी आवश्यक छोटी मोठी यंत्रे विकत आणण्याऐवजी विकसित करण्याकडे त्यांचा कल आहे.  

वडिलांनी दिले आव्हान... १९९५ मध्ये प्रथमच आशुतोष यांच्याकडे कुटुंबाच्या ३० एकर शेती व्यवस्थापनाची सूत्रे आली. संपूर्ण क्षेत्र कोरडवाहू. शेणखताचा वापर कमी असल्याने जमीन निकृष्ट झालेली. पावसाच्या भरवशावर असलेल्या या क्षेत्रातून तूर, मूग, उडीद, करडईचे उत्पादन एकरी एक ते दोन क्विंटल आणि कपाशीचे एकरी चार ते पाच क्विंटल इतकेच होते. एक लाखापेक्षा अधिक उत्पन्न मिळवून दाखवण्याचे आव्हान अनुभवी वडिलांनी दिले. एक लाखापेक्षा अधिक आलेल्या रकमेतून गाडी घेऊन देण्याचे आश्वासनही दिले. आशुतोष यांनी हे आव्हान स्वीकारले. पदवीधर असलेल्या आशुतोष यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग करीत चिकित्सक पद्धतीने शेतीत टप्प्याटप्प्याने बदल करण्याचा निर्णय घेतला. देशी कपाशी वाणाऐवजी बीटी कपाशी वाणांचा अंतर्भाव केला. परिणामी कपाशीची उत्पादकता १० ते १२ क्विंटलपर्यंत वाढली. शेतीला दिली तंत्रज्ञानाची जोड तिवसा येथे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू (कै.) डॉ. प्रभाकर अमिन यांच्या उपस्थितीत शेती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याला आशुतोष उपस्थित राहिले. अनेक नव्या गोष्टी, तंत्र, शेती पद्धती विषयी समजले. डॉ. अमिन यांनी कृषी विस्तारासाठी काढलेल्या ‘नाडेम’ या संस्थेशी आशुतोष देशमुख यांचे सुर जुळले. त्यातून आधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक स्तरावर शेती क्षेत्रात होत असलेल्या स्थित्यंतराची माहिती मिळू लागली. सिंचनातून आली समृद्धी आशुतोष यांनी कोरडवाहू शेतीमध्ये पिकांचे उत्पादन वाढवण्यामध्ये अनेक मर्यादा असल्याचे दिसून आले. २००१ मध्ये त्यांनी बोअरवेल खोदली. बेलोरा परिसरातील ही पहिलीच बोअरवेल होती. त्यावरूनच आशुतोष यांच्या दूरदृष्टीची कल्पना येते. पाण्याची सोय झाल्यानंतर त्यांनी फारसा विचार न करता पाच एकरावर ५५० संत्रा रोपांची लागवड केली. मात्र, प्रयत्न करूनही तीन वर्षे फळे लागली नाहीत. एक क्षण बाग काढून टाकावी की काय, असा विचार त्यांच्या मनात घुमत होता. आपले काहीतरी चुकतेय, हे त्यांच्या लक्षात आले. चांदूररेल्वे येथील या संत्रा पिकातील अनुभवी शेतकऱ्याची भेट घेऊन मार्गदर्शन घेतले. त्यांनी सुचवलेल्या पद्धतीने संत्रा बागेत कोणतीही आंतरमशागत करण्याचे टाळले. त्यानंतर लागवडीच्या आठ वर्षाने बागेत फळधारणा झाली. आता एकरी ५ ते ८ टन उत्पादन होते. ७५ हजार ते दीड लाख रुपये उत्पन्न या बागेतून आता मिळत आहे. कांदा लागवडीतून गाव केले समृध्द या विभागातील बहुतांश शेतकऱ्यांचा भर हा उन्हाळी कांदा लागवडीवर राहतो. अनेकवेळा ५० पैसे ते एक रुपया किलो प्रमाणे दर घसरतो. यामुळे खरीप कांदा लागवडीचा प्रयोग आशुतोष यांनी २००२ मध्ये केला. सुरवातीला रोपे तयार करून दहा गुंठे क्षेत्रामध्ये पुनर्लागवड त्यांनी केली. या क्षेत्रातून २५ क्विंटल उत्पादन मिळाले. त्याला ४०० ते ४५० रुपये क्विंटल असा चांगला दर मिळाला. या यशाने उत्साहित होत त्यांनी पुढील वर्षी खरिपात कांदा लागवड वाढवत नेली. आता खरिपात त्यांच्याकडे तीन एकरावर कांदा लागवड कायम असते. त्यांचे पाहून गावातील अन्य शेतकऱ्यांनीही खरीप कांदा लागवडीला सुरवात केली. बेलोरा गावात आज ६० एकरावर कांदा लागवड होत असून, त्यातून बऱ्यापैकी आर्थिक समृद्धी नांदू लागली आहे. सोयाबीनची ठिबकवर लागवड नवनव्या संकल्पनाच्या बळावर शेतीमध्ये प्रयोग करून उत्पादकता वाढवण्याचा आशुतोष यांचा प्रयत्न असतो. सोयाबीन पिकाच्या पारंपरिक व्यवस्थापनातही त्यांनी अनेक बदल आणले. २०१०-११ मध्ये गंगाखेड येथील एका शेतकऱ्याकडून निवड पद्धतीने तयार केलेल्या सोयाबीन वाणाची लागवड केली. पाच फुटावर दोन ओळीमध्ये गादीवाफ्यावर त्यांची लागवड केली होती. त्यासाठी ठिबक सिंचन केले. या भागामध्ये प्रथमच केलेला हा प्रयोग पाहण्याकरिता हजारावर शेतकऱ्यांनी त्यांच्या शेताला भेट दिली असल्याचे आशुतोष सांगतात. यांत्रिकीकरणावर वाढता भर आशुतोष यांनी वेळ आणि श्रमाची बचतीसाठी शेती पद्धतीत यांत्रिकीकरणावर भर देण्याचा निर्णय घेतला. एकदा विचार मनामध्ये आला की त्यावर सतत काम करत राहायचे, ही त्यांची वृत्ती. राजकोट येथे अशा ट्रॅक्टरचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करण्याऱ्या शेतकऱ्यांचे अनुभव जाणून घेतले. त्यासाठी काही दिवस तिथे घालविले. त्यानंतर २०१० मध्ये साडेअठरा हॉर्सपावरचा ट्रॅक्टर त्यांनी गावी परतल्यावर विकत घेतला. शेतातील प्रत्येक पिकांसाठी पेरणी, आंतरमशागत या कामांसाठी ते ट्रॅक्टरचलित उपकरणांचा वापर करू लागेल. यातून शेतीसाठी भासणाऱ्या मजुराच्या उपलब्धतेच्या समस्येवर काही अंशी मात करता आली. तसेच हा पर्याय वेळ आणि श्रमाची बचत करण्यासाठी फायदेशीर ठरत असल्याचे दिसून आले. हळद लागवडीसाठी ट्रॅक्टरचा वापर हळद लागवडीकरिता एकरी ४० मजुरांची गरज भासते. गादीवाफ्याऐवजी जमिनीवर थेट ट्रॅक्टरने हळदीच्या लागवडीचा निर्णय घेतला. यामुळे केवळ एका मजुरांच्या साह्याने हळद लागवड करणे शक्य झाले. यात दोन फूट बाय सहा इंच अंतरावर याप्रमाणे ट्रॅक्टरने हळद लागवड केली जाते. २०१७-१८ या वर्षापर्यंत हळद हे पीक घेत असत. संकरित तूर लागवडीसाठी पुढाकार आशुतोष हे सतत शेतीविषयी वाचन करतात. अलीकडे सामाजिक माध्यमांचाही वापरही ते कृषीविषयक ज्ञान मिळवण्यासाठी करत असतात. एकदा त्यांच्या पाहण्यात तुरीचे झाड आणि त्यासोबत एका व्यक्तीचे छायाचित्र आले. त्या वाणाची माहिती घेण्याकरिता आशुतोष यांनी जंगजंग पछाडले. अखेर त्यांना इक्रिसॅट या संस्थेने विकसित केलेले संकरित (हायब्रीड) वाण असल्याचे समजले. दुर्गापूर येथील कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून इक्रीसॅटशी संपर्क साधण्यात आला. त्यांच्याकडून ‘आय.पी.सी.एच.-२७४०’ हे बियाणे मिळविण्यात त्यांना यश आले. २०१५ मध्ये या वाणाची लागवड त्यांनी आठ एकरवर केली. एकरी ११ क्विंटल उत्पादन या वाणातून मिळाले. संकरित वाण असल्याने परागीकरणाची समस्या उद्भवत होती. परिणामी हे वाण शुद्ध राहत नसल्याचे त्यांना जाणवले. मग या वाणाची लागवड त्यांनी बंद केली. यावर्षी १२० दिवसामध्ये येणाऱ्या एका तूर जातींची लागवड केली. यामुळे तूरीनंतर हरभरा घेता येईल. बहुउद्देशीय सायकल यंत्र

  • शेतीत वेळ, श्रम वाचण्यासोबत खर्चात बचतही झाली पाहिजे, याकडे आशुतोष यांचा कटाक्ष असतो. त्या उद्देशाने शेतीक्षेत्रामध्ये त्यांची वाटचाल राहिली आहे.
  • २०१५ मध्ये बीटी कपाशीच्या सघन लागवडीचा प्रयोग केला होता. तीन बाय सहा इंच अंतरावर एकरी १६ हजार कपाशीची झाडे लावली होती. मात्र, या टोकणीसाठी मोठ्या प्रमाणावर मजूर लागले. पुढे खत पेरणीसाठीही इतकाच खर्च येण्याची शक्यता होती. यावर पर्याय म्हणून त्यांनी आपल्या कल्पकतेतून सायकल पेरणी यंत्र, टोकण यंत्र आणि कोळपणी यंत्र असे बहुउपयोगी यंत्र तयार केले.
  • या यंत्राद्वारे कपाशी, तूर व इतर पिकांना याद्वारे खते देणे शक्य होते. कपाशीची टोबणी आणि तण नियंत्रणाकरिताही यंत्र उपयोगी पडत असल्याचे आशुतोष सांगतात. या यंत्राकरिता मोठ्या ट्रॅक्टरमध्ये वापरण्यात येणाऱ्या प्लेटसचा वापर त्यांनी केला आहे.
  • एका चाकावर चालणारे पहिले मानवचलित यंत्र तयार केल्याचा त्यांचा दावा आहे. त्यासाठी त्यांना केवळ ३८०० रुपये लागले. या यंत्रामुळे एक व्यक्तीच्या माध्यमातून तीन ते चार एकर पेरणी करतो किंवा खत या यंत्राच्या माध्यमातून देणे शक्य होते.
  • सामाजिक माध्यमांचा प्रभावी वापर

  • आशुतोष यांचा परिसरात होणारी कृषी प्रदर्शनांबरोबरच विविध संशोधन संस्थांना भेट देण्यावर भर असतो. अगदी कोइमतूर ते लुधियाना येथपर्यंत होणाऱ्या बहुतांश प्रदर्शनांना भेट देतात. यासाठी दरवर्षी सुमारे एक लाखापर्यंत खर्च येतो. मात्र, यातून बहुमूल्य असे नवे तंत्रज्ञान पाहता येते, शिकता येते. या अनुभवाचा फायदा अन्य शेतकऱ्यांनाही करून देण्यासाठी त्याचेही व्हिडिओ करून यू ट्यूबवर टाकतात.
  • अशाच प्रकारे स्वतः विकसित केलेल्या बहुउपयोगी टोकण, पेरणी, खत देण्याच्या यंत्राच्या वापराचेही अनेक व्हिडिओ काढून आशुतोष यांनी विविध समाजमाध्यमांवर अपलोड केले. त्यातून अनेक शेतकऱ्यांपर्यंत या यंत्राचा प्रसार झाला. दरवर्षी ६० ते ७० यंत्रे विकली जात आहेत.
  • अगदी लखीमपूर (उत्तर प्रदेश) येथील पलविंदरसिंग यांनी तर लखनौ ते नागपूर असा विमान प्रवास करून, पुन्हा रस्त्याने आशुतोष देशमुख यांचे शेत गाठले. खास यंत्र पाहण्यासाठी त्यांनी हा खास दौरा केला. त्यांच्या युट्यूब चॅनेलचे देशभरातील तब्बल बारा हजार अनुयायी (सबस्क्रायबर) झाले आहे. आजवर १८ लाखापेक्षा अधिक लोकांनी हे व्हिडिओ पाहिले आहेत.
  • चिकट सापळे कीड नियंत्रणासाठी केवळ कीडनाशकांवर अवलंबून राहून चालणार नाही, हे लक्षात घेत आशुतोष यांनी चिकट सापळ्यांचा प्रयोग केला. कपाशी पिकामध्ये एकरी ५० पिवळे चिकट सापळे लावले. यातून पांढरी माशी व अन्य रसशोषक किडीचे नियंत्रण प्रभावीपणे झाली. केवळ दोन फवारणीमध्ये पीक सुरक्षित ठेवता आल्याचे आशुतोष सांगतात. हे सापळे खास नाशिक येथून मागवले. १३० रुपयांमध्ये १२ बाय ८ इंच आकाराचे १० सापळे मिळतात. सध्या मृगधारा स्वयंसहाय्यता समूहाच्या माध्यमातून या सापळ्यांचे उत्पादन करण्याचा मानस आशुतोष यांनी व्यक्त केला. बीटीवरील बोंडअळीचा आला आधीच अंदाज गुजरात मधील शेतकरी मित्र आणि शास्त्रज्ञांच्या चर्चेतून आशुतोष यांना बीटी कपाशीवरही बोंडअळ्यांचा प्रादुर्भाव होणार असल्याचा अंदाज आला. चार वर्षापूर्वीच त्यांनी बीटी कपाशीची लागवड बंद केली. त्याऐवजी सरळ वाणांच्या सघन लागवडीचा पर्याय स्वीकारला. एकरी १० ते १२ हजार रोपांची लागवड केली जाते. यामुळे बियाणे, पीक संरक्षण यावरील खर्चात मोठी बचत झाली. केवळ दोन फवारण्यांमध्ये कपाशीचे उत्पादन बीटी कपाशीपेक्षा जास्त (म्हणजेच १५ क्विंटलवर) पोचले. यावर्षी पावसामुळे त्यात काही प्रमाणात घट येणार असल्याचे आशुतोष यांनी सांगितले. फायदे - 

  • बेडवर बियाणे व खत पेरता येते.
  • फळबागेसह कापूस, तूर अशा विविध पिकांना मुळाजवळ खत देता येते.
  • कापूस ५ फूट बाय १ फूट या अंतरावर एक व्यक्ती चार एकरांपर्यंत खत देऊ शकतो.
  • वेगवान काम व कमी मजुरांमुळे खर्च कमी राहतो. परिणामी पिकाच्या गरजेनुसार विभागून खते देणे शक्य होते.
  • पिकांची संतुलित वाढ झाल्याने रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.
  • कोळपणी करणे शक्य होते.
  • आशुतोष देशमुख, ९४०४६८९८४०

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com