फळबागेतून माळरान झाले हिरवेगार

फळबागेतून माळरान झाले हिरवेगार
फळबागेतून माळरान झाले हिरवेगार

मिरज शहरात वकिली करताना चंद्रशेखर शिवाजीराव नरवाडकर यांनी आरग (जि. सांगली) येथील वडिलोपार्जित माळजमिनीत फळबाग चांगल्याप्रकारे वाढविली आहे. शेतीची आवड, नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास आणि प्रयोगशील शेतकरी मित्रांच्या मदतीने दर्जेदार फळ उत्पादनावर त्यांचा भर आहे.

सांगली येथील न्यायालयात कायदा आणि सुव्यवस्था यांची योग्यपणे सांगड घालून लोकांना योग्य सल्ला देण्याचे काम अ‍ॅड. चंद्रशेखर नरवाडकर करतात. त्यांची चौथी पिढी वकिली क्षेत्रात कार्यरत आहे. चंद्रशेखर नरवाडकर यांचे मूळ गाव नरवाड. मात्र, वकिलीमुळे ते मिरज शहरात स्थायिक झाले. त्यांची वडिलोपार्जित शेती मिरज शहरापासून वीस किलोमीटर अंतरावरील आरग (ता. मिरज) येथे आहे. वकिली व्यवसाय सांभाळत शेतीच्या आवडीमुळे सुटीच्या दिवशी ते सहकुटुंब दहा एकर फळबागेत रमतात.  शेती नियोजनाबाबत  नरवाडकर म्हणाले, की मिरज तालुक्याचा पूर्व भाग हा दुष्काळीपट्टा. म्हैसाळ योजनेचे पाणी आल्यानंतर शेती हिरवीगार दिसू लागले. माझे वडील वकिली करून आरग येथील शेती पहायचे. वडिलोपार्जित शेती असल्याने मलादेखील शेतीची आवड निर्माण झाली. पूर्वी पानमळा होता. परंतु, मजूर आणि पाणीटंचाईमुळे पानमळा काढला. सन २००८ मध्ये जमिनीची कौटुंबिक वाटणी झाल्याने माझ्या वाट्याला दहा एकर माळ जमीन आली. या जमिनीत कोणते पीक घेता येईल याचा अभ्यास सुरू केला. पीक लागवड करण्याअगोदर संपूर्ण शेतजमीन व्यवस्थित तयार केली. म्हैसाळ योजनेतील पाणी आवर्तन अनिश्‍चित असल्याने शेतात विहीर आणि दोन कूपनलिका घेतल्या. यामुळे संपूर्ण शेतीला पुरेशा पाण्याची सोय झाली. आमच्या परिसरात द्राक्ष आणि बागायती क्षेत्र वाढू लागले. यामुळे मीदेखील द्राक्ष लागवड करण्याचे ठरवले. 

प्रयोगशील शेतकरी आले मदतीला  द्राक्ष लागवडीबाबत नरवाडकर म्हणाले, की मिरज येथील निरंजन चौगुले, शीतल चौगुले हे माझे मित्र. त्यांची वाईन द्राक्ष बाग आहे. त्यांच्याशी चर्चा केली. तसेच जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागेत जाऊन जाती, लागवड पद्धती, पीक व्यवस्थापन आणि बाजारपेठेची माहिती घेतली. बाजारपेठेचा अंदाज घेऊन मी २००९ मध्ये रेड वाईनसाठी लागणाऱ्या कॅबरनेट या द्राक्ष जातीची दोन एकरांवर लागवड केली. या बागेच्या व्यवस्थापनासाठी प्रयोगशील शेतकरी निरंजन चौगुले आणि दत्ता माळी यांचे मार्गदर्शन मिळू लागले. द्राक्ष विक्री सोपी होण्यासाठी बेंगलूरू येथील वाईन कंपनीच्याबरोबरीने करार केला. कंपनी बागेतून द्राक्ष घेऊन जात असल्याने वाहतूक आणि विक्रीची समस्या सुटली. द्राक्षाची जागेवर खरेदी होते. मला एकरी साडेचार टन द्राक्ष उत्पादन मिळते. खर्च वजा जाता एकरी दीड लाख नफा मिळतो.

पेरू, ॲपलबेर लागवड   वकिली व्यवसाय सांभाळत मला पारंपरिक पिकांपेक्षा फळबाग फायदेशीर दिसू लागली. त्यामुळे २०१३ मध्ये एक एकरावर १२ फूट बाय ५ फूट अंतरावर मोठ्या आकाराच्या पेरू जातीची लागवड केली. पुढील तीन वर्षे तीन एकरांवर अलाहाबाद सफेद या जातीची ८ फूट बाय ४ फुटावर लागवड केली. पेरू लागवडीसाठी मी परिसरातील पेरू उत्पादक शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घेतले. फळबाग तज्ज्ञ डॉ. गोरख सिंग यांचे पुस्तकही उपयुक्त ठरले. योग्य मार्गदर्शनामुळे कीड, रोग नियंत्रण, खत व्यवस्थापन योग्य पद्धतीने करू लागलो. सध्या दोन बागेतील फळांची विक्री होते. दोन बागा फुलावर आहेत. फळांची विक्री बागेमध्येच व्यापाऱ्याला करतो. पेरूला प्रतिकिलो ४० ते ५० रुपये दर मिळतो. खर्च वजा जाता चांगला नफा मिळत आहे. सन २०१४ मध्ये एक एकरावर १२ फूट बाय ८ फूट अंतरावर ॲपल बेर लागवड केली. सध्या उत्पादन सुरू झाले आहे. याच्या विक्रीसाठी गोवा, पुणे, मुंबई मार्केट पाहिले. परंतु वाहतूक खर्च जास्त होऊ लागल्याने मिरज मार्केटमध्ये विक्रीस पाठवितो. यंदा परिसरात ॲपल बेरचे उत्पादन वाढल्याने प्रतिकिलो १० ते १५ रुपयांच्यावरून दर ८ रुपयांवर आला. यात थोडे आर्थिक नुकसान झाले.  मी दरवर्षी दहा ते वीस गुठ्यांवर सेलम जातीच्या हळदीची लागवड करतो. हळकुंडे वाळवून त्याची पावडर करून घरातूनच १८० रुपये प्रतिकिलो दराने विक्री करतो. हळद विक्रीची जबाबदारी माझी आई शोभा आणि पत्नी रश्मी यांनी घेतली आहे. 

केसर आंब्याची थेट विक्री   नरवाडकर यांनी दोन एकरांवर २०१३ साली १२ फूट बाय ४ फुटांवर केसर आंब्याची लागवड केली. शेतकरी आणि फळबाग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार बागेचे व्यवस्थापन ठेवले आहे. गेल्यावर्षी त्यांना आठ टन फळांचे उत्पादन मिळाले. यंदा वादळात मोहोर गळाल्यामुळे साडेचार टन फळांचे उत्पादन मिळाले. व्यापाऱ्यांना फळांची विक्री न करता घरीच आढी घालून थेट ग्राहकांना विक्री केली जाते. ग्राहक घरी येऊन स्वतः आंबे निवडतात. यंदा त्यांनी मिरजेमध्ये तीनशे कुटुंबांना फळाच्या आकारानुसार २५० ते ३०० रुपये डझन या दराने थेट विक्री केल्याने किफायतशीर नफा मिळाला.

नियोजनानुसारच फळबागेचे व्यवस्थापन   ॲड. नरवाडकर यांना फक्त रविवारी सुटी असते. फळबागेच्या दैनंदिन व्यवस्थापनासाठी त्यांनी एक व्यवस्थापक आणि दोन मजूर ठेवले आहेत. बागेच्या व्यवस्थापनाबाबत नरवाडकर म्हणाले, की रविवारी सकाळी नऊ वाजता शेतीवर गेल्यानंतर व्यवस्थापक आणि मजुरांच्याबरोबरीने शिवार फेरी होते. त्या वेळी बागकामाचा आढावा घेतो. तज्ज्ञ आणि प्रयोगशील शेतकऱ्यांच्या सल्‍ल्याने पुढील नियोजन करतो. माझी पत्नी सौ. रश्मी हीदेखील शेतीची आवड असल्याने बागेच्या व्यवस्थापनात मदत करते.

शेती व्यवस्थापनाचे मुद्दे 

  • प्रयोगशील शेतकरी आणि तज्ज्ञांच्या सल्‍ल्याने फळबागेचे व्यवस्थापन.
  • माती परिक्षणानुसार सेंद्रीय आणि रासायनिक खतांचा योग्य वापर.
  •  संपूर्ण शेतीला ठिबक सिंचन. शाश्वत पाणी पुरवठ्यासाठी शेततळे.
  •  प्रयोगशील शेतकरी, कृषी प्रदर्शनाला भेटी. त्यानुसार नवीन तंत्रज्ञानाचा फळबागेत अवलंब.  स्वतःची अवजारे बॅंक. 
  •  थेट ग्राहकांना फळ विक्रीवर भर.
  • -  चंद्रशेखर नरवाडकर, ९८२२०४५०७१

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com