दुष्काळाशी झुंजत फुलवली माळरानावर शेती

अमृत केंद्रे यांनी फुलवलेली मिरची
अमृत केंद्रे यांनी फुलवलेली मिरची

कोरडवाहू शेती, उत्पादन कमी व खर्च अधिक असे दुष्टचक्र. दुष्काळ पाचवीला पूजलेला. अशा स्थितीत प्रयोग करणे म्हणजे वादळात दिवा लावण्यासारखे होते. मात्र उमरगा रेतु (जि. लातूर) येथील युवा शेतकरी अमृत केंद्रे यांनी दीर्घकाळ सर्व संकटांशी हिंमतीने सामना केला. अत्यंत चिकाटी, धाडस व चातुर्याने माळरानाच्या शेतीत प्रयोग केले. सक्षम सिंचनक्षमता तयार केली. आज हे कुटूंब सुमारे २८ एकरांत व्यावसायिक शेतीचे धडे गिरवते आहे. आर्थिक दृष्ट्या स्थिरसावर झाले आहे.  

लातूर जिल्ह्यात उमरगा रेतू (ता. जळकोट) येथील अमृते कुटुंबाची १४ एकर जमीन आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळाशी सामना व पारंपरिक पिके यामुळे शेतीतील उत्पन्नावर मर्यादा आल्या होत्या. दहा एकर सोयाबीनमध्ये व्यंकटराव केंद्रे यांना जेमतेम अर्थप्राप्ती व्हायची. ही स्थिती बदलायची ठरवली तरी मुलगा अमृत याने. त्याने व्यावसायिक पीक पद्धतीचा अंगीकार करायचे ठरवले. त्यासाठी सिंचन व्यवस्थाही बळकट करण्यास सुरवात केली. चार एकर टोमॅटो घेतला. योग्य नियोजनातून उत्पादन घेतलेच. शिवाय दर चांगला मिळून पैसेही झाले. त्यातून ट्रॅक्टर खरेदी केला. भाऊ विनायकच्या साथीने स्वतः आठ एकर शेती नांगरण्यास व मशागतीची कामे करण्यास सुरवात केली. मजुरांवरील खर्चात त्यातून बचत केली.  शेतीचा विकास  शेतीतील उत्पन्नातून शिल्लक टाकण्यास सुरवात केली. घरचेही सारेजण राबू लागले. हळूहळू आर्थिक प्राप्ती चांगली होऊ लागली. मग अजून चार एकर शेती विकत घेतली. भाजीपाला पिकांना केंद्रस्थानी ठेवले. पुन्हा काही जमीन एकर खरेदी करता आली. कर्ज घेतलेच तर ते वेळेत फेडणे, प्रत्येक गोष्टीत इमानदारी ठेवणे, अविरत कष्ट करीत राहणे या बाबींचे फळ मिळू लागले. त्यातूनच केंद्रे कुटूंबाने आपल्या शेतीचा चांगला विस्तार करण्यापर्यंत मजल मारली आहे. आज त्यांच्याकडे खरिपात कापूस व तूर आहे. प्रत्येकी दोन एकर टोमॅटो व मिरची आहे. प्रत्येकी वीस गुंठे झेंडू व पपई आहे. तर साडेतीन एकरांत मोसंबीची नवी बाग फुलते आहे. समस्यांवर केली मात  अमृत यांच्याकडील जमीन माळारानाची होती. अनेक प्रकारची तणे त्यावर उगवलेली होती. सुरवातीला एक एकरावर लाल मुरूम आणून वापरण्यात आला. त्यानंतर सहा लाख रुपये खर्चून पाच एकरांवर या मुरूमाचा वापर करण्यात आला. आता ही जमीन लागवडयोग्य करण्यात अमृत यांना यश आले आहे. तिथे तूर आणि सोयाबीन ही पिके घेण्यात आली. दोन्ही पिकांचे एकरी १० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले. त्यानंतर दोन एकरांत टोमॅटो व तेवढ्याच एकरांत मिरचीदेखील घेतली. ही दोन्ही पिके अमृत यांची नेहमीची झाली असून त्यात हातखंडा तयार झाला आहे. साधारण एप्रिलच्या दरम्यान लागवड केली तर त्याचे दर चांगले मिळतात असा अनुभव आला आहे. यंदा मिरचीची तोडणी जुलैपासून सुरू झाली. कमी पाण्यात ठिबकद्वारे खत व्यवस्थापन केले. लागवडीनंतर बहरलेल्या रोपांना वेळूच्या काठ्या रोवून आधार देत सुतळीने झाडे बांधावी लागली.   एकत्र राबणारे कुटुंब   दिवाळी सणाला असलेली मागणी लक्षात घेऊन अमृत सुमारे एक एकर ते २० गुंठ्यांत झेंडूचीही लागवड करतात. एकरी दोन टनांपर्यंत त्याचे उत्पादन मिळते. त्याला स्थानिक बाजारपेठेत किलोला ४० रुपयांपर्यंत दर मिळत असल्याने चांगले पैसे मिळतात असे अमृत यांनी सांगितले. शेताच्या बांधावर आंबा, चिकू, नारळ, आवळा अशी झाडे लावली आहेत. ही पिके देखील काही कालावधीनंतर उत्पन्न देण्यास सुरवात  करणार आहेत.      वडील व्यंकटराव, आई कुसूम, पत्नी सीमा व भाऊ विनायक असे सर्वजण शेतात राबत असल्याने मजुरांवरील अवलंबित्व कमी केले आहे. बारावीत शिकणारा मुलगा व नववीत शिकणारी मुलगीही शेतीकामात मदत करते. टोमॅटो, मिरची तोडणीसह अन्य कामांसाठी नेहमी तीस ते चाळीस मजूर महिला कामाला येतात. त्यांची सोय व्हावी म्हणून शौचालयाची सुविधाही उभारली आहे. 

चांगल्या उत्पन्नाची आशा  माळरान असूनही कष्ट घेत पिकाची मनापासून जोपासना केल्याने आत्तापर्यंत २६० क्विंटलपर्यंत विक्री झाली आहे. किलोला कमाल ६५ रुपये तर किमान १८ रुपये व सरासरी ३० रुपये दर मिळाला आहे. टोमॅटोचीही १४०० क्रेटपर्यंत (प्रति क्रेट २५ किलो) झाली आहे. टोमॅटोचे दरवर्षी एकरी १२०० क्रेटपर्यंत तर मिरचीचे १५ टनांपर्यंत उत्पादन मिळत असल्याचे अमृत यांनी सांगितले. सध्या मिरचीचा दर खूप खाली आला आहे. मात्र दुसरे पीक घेण्यासाठी खर्च करण्यापेक्षा फुलत असलेल्या मिरचीपासूनच अजून काही माल घेण्यात येत आहे. डिसेंबर- जानेवारीपर्यंत चांगला दर मिळाल्यास उत्पन्न वाढणार आहे. दोन्ही पिकांचे मिळून सुमारे नऊ लाख रुपयांचे एकूण उत्पन्न हाती येण्याची आशा आहे. यंदा पाऊस चांगल्या प्रकारे झाला असला तरी गेल्या काही वर्षांपासून सोसावा लागलेल्या दुष्काळावर आता मात करून शेतीत प्रगती केल्याचे समाधान अमृत व्यक्त करतात.   विक्रीव्यवस्था  उदगीर, मुखेड, अहमदपूर, जांब, जळकोट, लातूर या स्थानिक बाजारपेठांशिवाय आदिलाबाद तसेच मध्य प्रदेश याठिकाणीही मिरचीची विक्री झाली आहे. काढणीच्या हंगामात मध्य प्रदेशातील व्यापारी आपल्या शेतातील शेडमध्ये मुक्काम करतात असे अमृत यांनी सांगितले. 

शेततळ्याचा आधार  शेतीत एक विहीर, बोअर असे पाण्याचे जेमतेम स्त्रोत होते. तेथे १११ बाय २८ मीटर आकारमानाचे  शेततळे घेतले. पावसाळ्यात शेततळ्यात पाणी साठवले. पुढे टंचाईच्या काळात ते वापरण्याची योजना केली. दुष्काळावर शाश्‍वत तोडगा काढण्यासाठी यंदा पुन्हा ५५ ×१८ आकारमानाचे दुसरे शेततळे उभारण्याचे काम सुरू आहे. आता मोसंबीची साडेपाचशे झाडांची नवी बाग बहरते आहे. त्यात दोन एकर मिरची आहे. या बागेसाठी शेततळ्यातील पाण्याचा उपयोग होईल.      माशांचे उत्पादन  जोडव्यवसाय म्हणून शेततळ्यात आठ हजार मत्स्यबीज सोडले आहे. यात राहू, कटला, मृगळ आदींचा समावेश आहे. सुमारे पाऊण किलो वजनाचे मासे तयार झाले आहेत. त्यांच्यापासून काही कालावधीनंतर  उत्पन्न सरू होईल.

- अमृत केंद्रे, ८८८८७८५०९८ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com