Agri Tourism Model: परभणी येथील सचिन आणि वैशाली सरदेशपांडे या दांपत्याने कौटुंबिक शेती चांगल्या पद्धतीने केलीच, त्याचबरोबरीने कृषी पर्यटनातून शहरी ग्राहकांना शेती-मातीशी जोडले आहे. शेतशिवारात भटकंती, ग्रामीण पद्धतीचे जेवण, हुरडा पार्टी, देशी गोवंशाचे संगोपन आणि प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून सरदेशपांडे दांपत्याने शेतीचे अर्थकारण बळकट केले आहे. याशिवाय गावशिवारातील सत्तर जणांना कायम स्वरूपाचा रोजगार देण्यात ते यशस्वी झाले आहेत. .परभणी जिल्ह्याची अर्थव्यवस्था कृषी आधारित आहे. जिल्ह्यात कोरडवाहू क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. काही वर्षांपूर्वी वेळेवर खात्रीशीर पाऊस पडत असे, तेव्हा जिरायती शेतीतून उत्पन्नाची खात्री होती. परंतु अलीकडील काही वर्षांमध्ये हवामान बदलामुळे पावसामध्ये अनिश्चितता आली आहे. या स्थितीत प्रयोगशील शेतकऱ्यांनी शेतीपूरक उद्योगाद्वारे शेतीतील जोखीम कमी केली..यांपैकीच एक आहेत परभणी येथील सचिन सरदेशपांडे. त्यांनी घरच्या शेतीला रोपवाटिका आणि कृषी पर्यटन केंद्राची जोड देऊन नवीन व्यवसायाची वाट निर्माण केली आहे. सरदेशपांडे कुटुंबीयांची परभणी आणि पारवा शिवारात चाळीस एकर जमीन आहे. परभणी ते पाथरी राष्ट्रीय महामार्गालगत परभणी शहराजवळ कुटुंबाची बारा एकर जमीन आहे. त्या ठिकाणी सहा एकर क्षेत्रावर कृषी पर्यटन केंद्र विकसित केले आहे..रोपवाटिकेची सुरुवातघरची शेती करत असताना सचिन हे काही वर्षांपूर्वी परभणी येथील क्रांती चौकात रोप विक्री केंद्र चालवत असत. त्या वेळी भाजीपाला रोपांना मागणी होती. ते शेतकऱ्यांना विविध भाजीपाला रोपांचा पुरवठा करत असत. शेतकऱ्यांची मागणी विचारात घेऊन सचिन यांनी स्वतःची रोपवाटिका सुरु करण्याचा निर्णय घेतला. पाथरी रस्त्यावरील शेतीमध्ये २०१४ मध्ये रोपवाटिका सुरू केली. त्यासाठी कृषी विभागाच्या योजनेअंतर्गत दहा गुंठे क्षेत्रावर शेडनेटगृह, पॉलिहाउसची उभारणी केली. वांगी, टोमॅटो, मिरची, कोबी आदी भाजीपाला पिकांच्या बरोबरीने आंबा पेरू,चिकू तसेच शेवगा तसेच सजावटीच्या झाडांची रोपे तयार करून विक्री सुरू केली.=.Agro Tourism : बसवंत कृषी उद्योग पर्यटन केंद्र.हुरडा पार्टीतून शिवारफेरीसचिन यांचे आजोबा नाथराव आणि आज्जी रख्मिणीबाई हे शेती करत असताना दरवर्षी नातेवाईक, मित्र मंडळींसाठी शेतामध्ये हुरडा पार्टीचे आयोजन करत होते. यातूनच सचिन व वैशाली सरदेशपांडे यांना शेतीला पूरक व्यवसाय म्हणून हुरडा पार्टी सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. जिल्ह्यात रब्बी ज्वारीचे क्षेत्र मोठे आहे. नवीन पिढीला हुरड्याची ओळख व्हावी तसेच शहरी भागातील नागरिकांना हुरड्याची चव चाखता यावी हा उद्देश त्यांच्या समोर होता. त्यांनी या व्यवसायाचे अर्थशास्त्र समजाऊन घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असलेल्या हुरडा पार्टी व्यावसायिकांच्या भेटी घेतल्या..२०१७ जानेवारीमध्ये घरच्या शेतामध्ये हुरडा पार्टी व्यवसायाचा श्रीगणेशा केला. त्या वेळी परभणी शहरातील मित्रमंडळी तसेच मोजक्याच नागरिकांना माहिती झाली होती. हुरड्यामध्ये भाजलेला हुरडा, कुटलेला हुरडा, हुरडा भेळ असे तीन प्रकार त्यांनी ग्राहकांसाठी ठेवले. सुरती ज्वारीचा चुलीवर भाजलेला हुरडा, घरगुती पद्धतीने खलबत्त्यात बनविलेली शेंगदाणा, तीळ, जवसाची चटणी, मधू मका, वाटाणा शेंगा, फरसाण-भेळ मिळून हुरडा डिश तयार केली..त्यासोबत मागणीनुसार स्पेशल गाजर, खोबरा चटणी देखील ठेवली. आवडीनुसार हुरडा थालीपीठ देखील तयार करुन दिले जाते. नोव्हेंबर ते मार्च हा कालावधी हुरडा पार्टीचा हंगाम असतो. त्यासाठी ताजा, दर्जेदार हुरडा उपलब्ध व्हावा यासाठी टप्प्याटप्प्याने हुरडा वाणांची लागवड केली जाते. यंदा गोकूळ अष्टमीला सरदेशपांडे यांनी सुरती हुरडा वाणाची पाच एकरांवर लागवड केली. सरासरी ८४ दिवसांत हुरडा तयार होतो. यंदा वेगवेगळ्या टप्प्यात ३५ एकरावर हुरड्यासाठी ज्वारी लागवड केली आहे..कृषी पर्यटन केंद्राला चालनापरभणी ते पाथरी राष्ट्रीय महामार्गावर परभणी शहरापासून तीन किलोमीटरवर सरदेशपांडे यांची रोपवाटिका आणि कृषी पर्यटन केंद्र आहे. सहा एकरावर हे कृषी पर्यटन केंद्र पसरलेले आहे. स्वागत कमानीजवळ पारंपरिक ढोल पथकाच्या तालावर पर्यटकांचे स्वागत केले जाते. परिसरात विविध प्रकारच्या सजावटीची झाडे लक्ष वेधून घेतात. हिरवळीवर विविध प्रकारचे सेल्फी पॉइंट तयार केले आहेत. शेतातील १२० वर्षांच्या जुन्या डेरेदार गावरान आंब्याच्या झाडाला झोके बांधलेले आहेत..लहान मुलांसाठी रेन डान्स, संगीत खुर्ची, विविध प्रकारची खेळणी आहेत. मनोरंजनासाठी स्थानिक कलाकार गाणी सादर करतात. जादूचे खेळ, कठपुतळी खेळाचे पर्यटन केंद्रात आयोजन केले जाते. पर्यटकांना बैलगाडी, घोडागाडी सफरी, घोडेस्वारी आनंद घेता येतो. दूरच्या पर्यटकांना मुक्कामी थांबण्यासाठी ११ कॉटेज बांधण्यात आल्या आहेत. छोटेखानी सभागृहाची व्यवस्था आहे. एक दिवसासाठी या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांच्या सहली येतात. सुट्टीच्या दिवशी तसेच शनिवारी, रविवारी पर्यटकांची चांगली गर्दी करतात..हुरडा पार्टी हंगाम संपल्यानंतर (उन्हाळा-पावसाळा) सुट्टीच्या दिवशी तसेच शनिवार, रविवारी गेट टुगेदर, वाढदिवस आदी कार्यक्रमाची रेलचेल असते. परभणीपासून जवळ असलेले औंढा नागनाथ (जि. हिंगोली), परळी वैजनाथ (जि. बीड) या ठिकाणी दर्शनासाठी पॅकेज टूर आयोजित केल्या जातात. स्वादिष्ट हुरडा, चुलीवरचा स्वयंपाकाची चव पसंतीस उतरलेल्या चोखंदळ ग्राहकांकडून कृषी पर्यटन केंद्राची परस्पर प्रसिद्धी होत आहे..Konkan Agro Tourism: माझ्या कोकणचो रुबाब भारी!.त्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद वाढत आहे. याशिवाय व्हॉट्सअॅप, फेसबुक आदी समाज माध्यमावर जाहिरातीमुळे विविध भागांत माहिती पोहोचली. स्थानिक परिसरातील परभणी, जिंतूर, सेलू, पाथरी आदी तालुक्यांसह शेजारील हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, वाशीम जिल्ह्यांसह तेलंगणातील निजामाबाद, कर्नाटकातील भालकी परिसरातून या ठिकाणी पर्यटक येतात. सध्या या केंद्रामध्ये प्रति दिन प्रति व्यक्ती ७५० रुपये शुल्क आहे. शालेय सहलीसाठी विद्यार्थांच्या वयोगटानुसार ३०० रुपये, ४०० रुपये, ५०० रुपये शुल्क कृषी पर्यटन केंद्रामध्ये घेतले जाते..घरगुती खाद्य पदार्थांची मेजवानीकृषी पर्यटन केंद्रामध्ये सकाळच्या नाश्त्यामध्ये मटकी पोहे, दही, मूग वडा, हुरड्याचे थालिपीठ, गुळाची जिलेबी तसेच पेरू, सीताफळ आदी फळांचा समावेश असते. दुपारच्या दरम्यान चहा-कॉफीचा आस्वाद घेता येतो. दुपारनंतर हुरडा पार्टी सुरू होते. लहान मुलांसाठी हुरडा पिझ्झा, नूडल्स, कांदा भजी, नूडल्स बनवून दिले जातात. स्वीट कार्न, भुईमूग शेंगा, वाटणा, हंगामी फळे आदी रानमेवा असतो. संध्याकाळच्या जेवणामध्ये चुलीवर भाजलेली ज्वारी, बाजरीची भाकरी, खमंग पिठलं, पुरणपोळी, गुळाची पुरणपोळी, जळगाव वांग्याचे भरीत, घोटलेल्या मुगाची खिचडी त्यावर गावरान साजूक तुपाची धार असा बेत असतो. त्यासोबत घरी लावलेले दही, मठ्ठा, ताक, उसाचा रस, पाणीपुरी यांचा आस्वाद घेता येतो..सेंद्रिय भाजीपाला, शेतीमालाचे मूल्यवर्धनसरदेशपांडे यांची परभणी शिवारात १२ एकर आणि पारवा शिवारात २० एकर शेती आहे. या शिवाय परभणी शहरानजीक २० एकर आणि इतर ठिकाणी २५ एकर शेतजमीन करार पद्धतीने केलेली आहे. हुरडा ज्वारी, ऊस, हरभरा, गहू, हळद, मूग, उडीद, सोयाबीन, स्वीट कॉर्न ही त्यांची प्रमुख पिके आहेत. हरभऱ्यात जवस, ज्वारीचे मिश्र पीक घेतले जाते. चार एकरावर सेंद्रिय पद्धतीने वर्षभर ४० प्रकारच्या भाजीपाला पिकांची लागवड असते..त्यामध्ये भरताची दोन प्रकाराची तसेच भाजीसाठी एक प्रकार अशी तीन प्रकारची वांगी, मिरची, टोमॅटो, दोडके, कारले, चवळी, वाल, शेवगा, वाटाणा, फ्लॉवर, कोबी, ब्रोकोली, बीट रूट, गाजर, कांदा, लसूण, बटाटा, कोथिंबीर, शेपू, पालक, चुका, मेथी या पालेभाज्या, हळदीमध्ये पपई, आले लागवड असते. शेतामध्ये उत्पादित बहुतांश शेतीमाल कृषी पर्यटन केंद्र आणि हुरडा पार्टीसाठी वापरला जातो. त्यामुळे मूल्यवर्धन होते. सरदेशपांडे यांच्या गोठ्यामध्ये बारा लाल कंधारी देशी गाई आहेत. त्यांच्या दुधापासून दही, ताक, तूप, पनीर तयार केले जाते. याचबरोबरीने आंबा, लिंबू, आवळा, हळद लोणचे तयार करून ग्राहकांना विक्री केली जाते..महिलांना रोजगारसचिन यांचे वडील रेणुकादास देशपांडे हे कृषी अधिकारी होते. बंधू विशाल हे मुंबई येथे आयआयटीमध्ये प्राध्यापक आणि दुसरे बंधू विक्रम हे परदेशात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. दोन्ही बंधूंचे त्यांना मार्गदर्शन मिळते. सचिन व वैशाली सरदेशपांडे दांपत्य हुरडा पार्टी, कृषी पर्यटन केंद्राचे स्वतः व्यवस्थापन बघतात. पर्यटकांशी आस्थेवाईकपणे काळजी घेत असतात..या व्यवसायाच्या माध्यमातून परिसरातील गावातील महिला, पुरुष मिळून ७० व्यक्तींच्या हाताला काम मिळाले आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील महिलांची संख्या अधिक आहे. कृषी पर्यटन केंद्र सुरु केल्यामुळे पारंपारिक जमिनीचा विकास झाला. तसेच कुटुंबाला निसर्गाच्या सानिध्यात राहायला मिळते. व्यावसायिक पद्धतीने शेती केली तर फायदा होते, हे सचिन सरदेशपांडे यांनी दाखवून दिले आहे.- सचिन सरदेशपांडे ९४२०१९२९१५.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.