दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या परभणी जिल्ह्यातील डिग्रस बुद्रुक (ता. सेलू) येथील प्रयोगशील शेतकरी विजय बरसाले यांनी पारंपरिक पीकपद्धतीवर अवलंबून न राहता फळबागेवर लक्ष केंद्रित केले. दर्जेदार फळांचा ‘वसुंधरा ब्रॅंड’ राज्य व परराज्यांतील बाजारपेठेत पोचविला आहे. यातून त्यांनी आर्थिक प्रगतीची दिशा पकडली आहे.
सेलू- देवगाव राज्य मार्गावर सेलू शहरापासून चार किलोमीटरवरील डिग्रस बुद्रुक गावातील विजय बरसाले हे बी.ए. पदवीधर प्रयोगशील शेतकरी. डिग्रस शिवारातून वाहणाऱ्या दुधना नदीकाठी आठ एकर तसेच अन्य सहा ठिकाणी मिळून बरसाले कुटुंबाची ५० एकर शेती आहे. सिंचनासाठी विहीर, कूपनलिकेची व्यवस्था आहे. विजय बरसाळे यांचे वडील प्रल्हादराव हे शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते. शरद जोशी यांच्या समवेत शेतीप्रश्नांसंबंधी काम करत असताना त्यांना विविध राज्यांमध्ये जाण्याचा योग आला. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रयोग, विविध पीकपद्धती, आधुनिक तंत्रज्ञान, बाजारपेठा याची माहिती झाली. प्रल्हादराव आणि त्यांच्या भावांचे एकत्र कुटूंब होते, त्या वेळी ऊस हे प्रमुख पीक होते. मात्र १९८० मध्ये त्यांनी सहा एकरांवर मोसंबी लागवड केली. विजय यांनी पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९९८ पासून पूर्णवेळ शेती करण्याचा निर्णय घेतला. पीकबदलाला सुरुवात विजय बरसाले हे सुरुवातीच्या काळात खरिपामध्ये सोयाबीन, कपाशी, तूर, मूग तर रब्बी मध्ये हरभरा, ज्वारी, गहू लागवड करत होते. परंतु, गेल्या काही वर्षांत पावसाचे कमी झालेले प्रमाण तर कधी अतिवृष्टी, गारपीट आदी नैसर्गिक आपत्तीमुळे हंगामी पिकांचे नुकसान होत होते. प्रतिकूल परिस्थितीत खात्रीशीर उत्पन्न मिळावे, यासाठी बरसाले यांनी टप्प्याटप्प्याने फळबाग लागवडीचे नियोजन केले. तुलनेने कमी पाण्याची गरज असलेल्या पेरू, सीताफळाची निवड केली. सध्या त्यांच्याकडे ११ एकर पेरू, ८ एकर सीताफळ, ७ एकर लिंबू आणि ५ एकरावर मोसंबी लागवड आहे. राज्य, परराज्यात सर्व फळांची विक्री ‘वसुंधरा ब्रॅंड'ने होते. फळबागेचे योग्य नियोजन फळबाग व्यवस्थापनाबाबत विजय बरसाले म्हणाले की, दर वर्षाआड दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे फळबागेसाठी पाणी कमी पडते. गतवर्षीच्या शेजारच्या शेतकऱ्याकडून पाणी विकत घ्यावे लागले होते. पाणी बचतीसाठी गहू, हरभरा भुश्याचे आच्छादन करतो. गेल्यावर्षी बाग जगविण्यासाठी फळे तोडून टाकावी लागली. भारनियमनाच्या काळात सिंचनासाठी अडचणी येतात. हे लक्षात घेऊन पाच हजार लिटर क्षमतेची टाकी बसवली आहे. वीजपुरवठा खंडित असताना टाकीतील पाणी ठिबक संचाद्वारे फळबागेला दिले जाते. जमीन आरोग्य पत्रिकेतील शिफारशीनुसार मुख्य, सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या वापर करतो. सूक्ष्म सिंचन पद्धतीनेच फळबागेला पाणी दिले जाते. ठिबकद्वारे विद्राव्य खतांच्या मात्रा दिल्या जातात. एकात्मिक पद्धतीने कीड, रोग नियंत्रणावर भर आहे. त्यामुळे खर्चात बचत होते.
नवीन तंत्रज्ञानाकडे ओढा बरसाले यांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे, उपविभागीय कृषी अधिकारी सागर खटकाळे, तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे, मंडळ कृषी अधिकारी आर. जी. मगर यांचे नेहमी सहकार्य असते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विस्तार कृषीविद्यावेत्ता डॉ. यू. एन. आळसे त्यांना शेतावर येऊन मार्गदर्शन करतात. विजय यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेण्याची आवड आहे. परभणी सह राहुरी, दापोली येथील कृषी विद्यापीठ, बारामती कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांच्या संपर्कात असतात. विविध कृषी मेळावे, प्रदर्शनांना भेटी देऊन कृषी विषयक ज्ञान अद्ययावत करून त्यानुसार पीक व्यवस्थापन करतात.
अॅग्रोवन मार्गदर्शक विजय बरसाले हे अॅग्रोवनचे सुरुवातीपासूनचे वाचक. फळबाग लागवड करण्यापूर्वी त्यांनी अॅग्रोवनमध्ये प्रसिद्ध झालेल्या यशकथा वाचून संबंधित शेतकऱ्यांच्या शेतीला भेटी दिल्या. त्यांच्याकडून पीक व्यवस्थापनाची माहिती, अनुभव जाणून घेतले. यशोगाथेसोबत तांत्रिक लेखातील माहिती, बाजारभाव, हवामान सल्ला त्यांना मार्गदर्शक ठरतो आहे.
पेरूला नेट, बॉक्स पॅकिंग
पॅकिंगवर भर
मोसंबीची थेट विक्री
दर्जेदार लिंबू उत्पादन
एकत्रित कुटुंबपद्धतीत कामाचे नियोजन विजय बरसाले यांच्या कुटुंबात आई, वडील, बंधू, मुले मिळून दहा सदस्य आहेत. शेतीकामाचे व्यवस्थापन बंधू उद्धवराव पाहतात. विजय यांच्याकडे पीक नियोजन, फळांची विक्री, रोपवाटिकेची जबाबदारी आहे. बरसाले यांच्याकडे दोन ट्रॅक्टर, बैलजोडी आणि चार सालगडी आहेत. फळपीक काढणी तसेच अन्य कामांसाठी रोजंदारीवर मजूर घेतले जातात. फळबागेमुळे उत्पन्नाची शाश्वती मिळाली. निविष्ठा, मजुरी, वीजबिल, वाहनभाडे, यावरील खर्च जाता वर्षाकाठी एकरी एक ते दीड लाखाचे उत्पन्न मिळते. शेतीतील उत्पन्नावर बरसाले यांनी दहा एकर जमीन खरेदी केली आहे.
- विजय बरसाले ः ९४२३६८१८४४, ९४२२३३८७१४
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.