जिद्द,मेहनतीद्वारे सिध्द केली प्रयोगशीलता

खोजे कुटूंबाने केलेली मोसंबीची शेती
खोजे कुटूंबाने केलेली मोसंबीची शेती

भणंग जळगाव (ता. अंबड, जि. जालना) येथील मनोहर साहेबराव खोजे यांना चांगल्या कलमांअभावी आपली मोसंबी बाग तोडावी लागली होती. मात्र, संकट हीच संधी मानत दर्जेदार रोपे मिळण्यासाठी आपणच रोपवाटिका तयार का करू नये, असे त्यांना वाटले. इथूनच त्यांनी प्रगतीकडे वाटचाल सुरू केली. रोपवाटिकेसह मोसंबीचे दर्जेदार उत्पादन घेताना संरक्षित पाण्याची सोय केली. सुरवातील विविध जोडधंदे करणारे मनोहर आज उत्तम प्रयोगशील शेतकरी म्हणून अोळखले जात आहेत. जालना जिल्हा म्हणजे मोसंबीचे आगार. याच जिल्ह्यातील अंबड तालुक्यात भणंग जळगाव येथील मनोहर खोजे यांची पूर्वी वडिलोपार्जित साडेबारा एकर शेती होती. वडिलांच्या काळात पाच भावंडांसाठी पाच खण माळदाचे घर होते. राहण्यासाठी पुरेसे घर नसल्याने मनोहर व अन्य भावंडांनी मेहनत करून आणखी शेती खरेदी केली. पत्नी सौ. सुमित्रा, मुले गणेश व कैलास असा मनोहर यांचा परिवार अाहे. मनोहर सुरवातीपासून मेहनती व जिद्दी होते. शेतमजुरी, मळणी यंत्र तसेच विहीर खोदकाम करीत त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवला. काळाची गरज लक्षात घेऊन नव्या प्रयोगांकडे वाटचाल केली. गेल्या पंधरा ते सोळा वर्षांत पंधरा एकर शेती मेहनतीच्या जोरावर विकत घेतली. आता त्यांच्याकडे स्वतःची वीस एकर शेती अाहे. त्यात दहा एकरांत मोसंबी बाग, पाच एकरांत मोसंबीची रोपवाटिका व अन्य क्षेत्रात ऊस व अन्य पिके आहेत. रोपवाटिकेने दिली उभारी मनोहर यांनी १९९९ च्या सुमारास मोसंबी लागवडीस सुरवात केली. एका खासगी व्यक्तीकडून खरेदी केलेले मोसंबीचे कलम खराब लागले. लागवड केलेली सर्व कलमे उपटून टाकली. मग अधिकृत रोपवाटिकेतून रोपे खरेदी केली. शेतकऱ्यांची अशी फसवणूक होऊ नये म्हणून सन २००५ मध्ये स्वतःच रोरवाटिका उभारण्याचा निर्णय घेतला. दहा गुंठ्यांपासून सुरवात केली. खात्रीशीर मोसंबीची कलमे ते तयार करू लागले. गेल्या आठ ते दहा वर्षांत पाच एकरांपर्यंत त्याचा विस्तार करीत या व्यवसायात चांगला जम बसविला आहे. वर्षाला सुमारे एक लाख कलमांच्या निर्मितीचे नियोजन करण्यात येते. अर्थात, ते शेतकऱ्यांच्या मागणीवर ठरते. शेकडा चार हजार रुपये दराने रोपांची विक्री होते. रोपे दर्जेदार व खात्रीशीर असल्याने जळगाव, नागपूर, औरंगाबाद, अहमदनगर, सोलापूर, बीड, जालना, नाशिक आदी जिल्ह्यांतून मागणी असते. गेल्या वर्षी गुजरातमधील एका शेतकऱ्याने रोपे नेली. कृषी विभागाचा दौरा ठरला फायदेशीर कृषी विभागाच्या वतीने मनोहर यांनी परराज्यांतील बाजारपेठा अभ्यासण्यासाठी २००६ मध्ये दौरा केला. त्यातून दिल्ली बाजारपेठ, तसेच अन्य शेतकऱ्यांचे प्रयोग पाहण्यास मिळाले. दौऱ्याहून परतल्यानंतर मनोहर यांनी गावापासून तीन किलोमीटर असलेल्या शेतात राहण्याचा निर्णय घेतला. आता शेतीला पूर्णवेळ देणे शक्य होणार होते. त्यामुळेच शेतीत महत्त्वाचे बदल होण्यास मदत झाली. दिल्ली बाजारपेठेत मोसंबी विक्रीचा अनुभव सन २०१४ मध्ये मोसंबीचे दर स्थानिक बाजारपेठेत कमी झाल्याने दिल्लीच्या बाजारपेठेत मोसंबी विकण्याचा निर्णय मनोहर यांनी घेतला. या वेळी काही स्थानिक व्यापाऱ्यांनी तेथील बाजारपेठेची भीती दाखवली. स्थानिक व्यापारी प्रतिटन १८ हजार रुपये दर देत असताना दिल्ली मार्केटमध्ये याच मोसंबीला ३२ हजार रुपये दर देऊ केला. मात्र, वाहतूक व तत्सम खर्च वजा जाता २३ हजार रुपये दर मिळाला. आजही दिल्लीचे व्यापारी मोसंबीसाठी मनोहर यांना संपर्क करतात. दरवर्षी या पिकातून सुमारे १० ते १२ लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळते. सद्यःस्थितीत पाच एकर बाग नवी आहे. सायफनद्वारे पिकांना पाणी वीस एकर क्षेत्र बागायती केले अाहे. आठ किलोमीटरवरील जोगलादेवी येथील गोदावरी नदीवरून पाइपलाइन केली आहे. शेतात विहिरीचे खोदकाम कुटुंबाच्या मदतीने केले. एका एकरात शेततळे खोदले. विजेअभावी पिकांना पाणी देणे अवघड व्हायचे, त्यामुळे गोदावरी नदीवरून आणलेल्या पाण्यासाठी दीड लाख लिटर क्षमतेचा मोठा हौद तयार केला. त्यातून सायफन पद्धतीने पाणी देण्यात येते. मोसंबी व रोपवाटिकेसाठी ठिबकद्वारे पाणी देण्यात येते. सेंद्रिय घटकांचा वापर

  • १) गेल्या वर्षी सात म्हशींची खरेदी, त्यांचे शेणखत उपलब्ध होते. त्याच्या वापराने पीक उत्पादनात वाढ होण्यास हातभार लागला अाहे. दरवर्षी रासायनिक खतांच्या वापरावरील दोन लाख रुपयांहून अधिक खर्चात बचत झाली आहे. एक गीर गाय आहे. गोमूत्राचाही शेतात वापर होतो.
  • २) शेताजवळच राहात असल्याने स्वयंपाकासाठी बायोगॅसचा वापर. स्लरी व जीवामृतदेखील महत्त्वाचे ठरले आहे. सेंद्रिय घटकांच्या वापरामुळे झाडांची प्रतिकारशक्ती वाढली आहे. यंदा अनेक शेतकऱ्यांकडील मोसंबीची गळ झाली. मात्र, मनोहर यांच्याकडील बागेत ही समस्या जाणवली नाही.
  • आर्थिक सक्षमता आली मेहनत व योग्य नियोजनातून खोजे कुटुंबाने शेतीत चांगले आर्थिक स्थैर्य मिळवले आहे. मागील तीन वर्षांत पाच एकरांतील मोसंबीच्या उत्पादनाचा चढता आलेख राहिला अाहे. सन २०१५ मध्ये तेवढ्या क्षेत्रातून ३५ टन, २०१६ मध्ये ४५ टन उत्पादन मिळाले. यंदा हेच उत्पादन साठ टनांपर्यंत पोचण्याची मनोहर यांना अपेक्षा आहे. दर्जेदार फळ असल्याने व्यापाऱ्यांकडून चांगल्या दराने मागणी होते. रंगपूर खुंटावर कलम मनोहर यांनी बदनापूरचे मोसंबी कृषी संशोधन केंद्र, परभणी कृषी विद्यापीठ व महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथून मोसंबीचे मातृवृक्ष आणले. रंगपूर जंबेरी या खुंटावर मोसंबीची कलमे बांधण्यात येत आहेत. कलमांच्या बांधणीत मुले गणेश व कैलास मदत करतात. मनोहर यांची रोपवाटिका अधिकृत नोंदणीकृत आहे. जिद्दी स्वभावाचे दर्शन मोसंबी पिकातील मोठा अनुभव तयार झाल्याने मनोहर यांच्यासह मुले गणेश व कैलास हेदेखील गरजू शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. सुरवातीला पाच एकरच क्षेत्र व तेही कोरडवाहू असताना कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मनोहर इतरांच्या शेतांत खुरपणीसाठी जात असत. शेतीला जोडव्यवसाय म्हणून अन्य कष्टाचे व्यवसायही त्यांनी केले. परिस्थितीची जाण ठेवत जिद्द व मेहनतीच्या जोरावर शेती व्यवसायात प्रगती साधली. पाच एकरांवरून वीस एकरांपर्यंत शेती केली. शेतात चांगले घर बांधून संपूर्ण कुटुंब तेथे राहते. त्यामुळे शेतीच्या कामांचे नियोजन सकाळी सहा वाजल्यापासून करणे सोपे झाले आहे.  संपर्क : मनोहर साहेबराव खोजे - ९७६५५१८९७०

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com