सातारा जिल्ह्यातील अवकाळी (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) येथील मनोहर भिलारे यांनी स्ट्रॉबेरीसह विविध फळांवर प्रक्रिया करून पल्प, क्रश, जॅम आदींची निर्मिती केली आहे. कोरोना संकटापूर्वी सुमारे १५० ते २०० टन एकूण उत्पादन तर दीड कोटी रुपये उलाढालीपर्यंत मजल मारत कोरोनानंतरही मोठ्या उमेदीने त्यात स्थिरता मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी, रासबेरी, ब्लूबेरी दर्जेदार चवीसाठी प्रसिद्ध आहे. येथील स्ट्रॉबेरीस ‘जीआय’ (भौगोलिक निर्देशांक) मिळाला आहे. स्ट्रॉबेरी थेट विक्री करण्याबरोबर स्ट्रॉबेरीवर प्रक्रिया करण्याकडे येथील शेतकऱ्यांचा कल आहे. तालुक्यातील अवकाळी गावातील मनोहर सीताराम भिलारे यांचीही सुमारे साडेसहा एकर शेती आहे. ते देखील परंपरेपासून स्ट्रॉबेरीचे पीक घेतात. ठिबक सिंचन, मल्चिंग पेपर व व्यवस्थापनातून हे पीक त्यांनी यशस्वी केले आहे. स्ट्रॉबेरी विक्री व्यवसाय
कार्यान्वित प्रक्रिया उद्योग मनोहर यांनी मुलगा नीलेश आणि बंधू सुनील यांच्या मदतीने प्रक्रिया उद्योगाच्या उभारणीस सुरुवात केली. मेघा फार्म प्रोसिंसिग या नावाने नोंदणी केली. प्रथम प्रक्रियेसाठी लागणारे कॅटल, बॉयलर, पल्प व सीलिंग मशिन, ड्रम, वजनकाटे, बॉटल्स आदी सामग्री खरेदी केली. उद्योगासाठी लागणारे सर्व परवाने व नोंदणी यांची पूर्तता केली आहे. ‘एफएसएसएआय’ संस्थेचे प्रमाणपत्र घेतले आहे. हंगामानुसार तालुका परिसरातील सुमारे ४०० शेतकऱ्यांकडून थेट बांधावर स्ट्रॉबेरी व अन्य फळांची खरेदी केली जाते. काही माल गरजेनुसार वाशी मार्केटमधून घेतला जातो. इतर प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांप्रमाणे शेतकऱ्यांना दर दिला जातो. एप्रिलअखेर स्ट्रॉबेरीची खरेदी होते. खरेदी केलेली सर्व फळे स्वतःच्या ‘कोल्ड स्टोअरेज’मध्ये ठेवली जातात. वर्षभर व्यवसाय सुरू राहील या पद्धतीने सर्व नियोजन केले जाते. व्यवसायातील उलाढाल स्ट्रॉबेरी, रासबेरी, ब्लूबेरी, आंबा, पेरू आदी फळांवर प्रक्रिया होऊन क्रश, पल्प, जॅम आदी उत्पादने तयार केली जातात. भिलारे सांगतात की सातत्य, आर्थिक नियोजन व बाजारपेठांचा अभ्यास यावरून वर्षाकाठी एकूण मिळून दीडशे ते २०० टन उत्पादने निर्मितीपर्यंत आम्ही पोहोचलो. वर्षाला एक ते दीड कोटी उलाढाल करण्याच्या क्षमतेपर्यंत पोहोचलो होतो. मात्र कोरोना संकट सुरू झाल्यानंतर मागणी कमी होऊन उद्योगाचा वेग मंदावला. स्ट्रॉबेरी उत्पादकांच्या शेतीवरही परिणाम झाला होता. आता मार्केट पुन्हा पूर्वपदावर येत आहे. ७० ते १०० टन उत्पादनापर्यंत पोहोचलो आहोत. या वर्षी जोमाने काम सुरू असून, २०० टनांचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे भिलारे सांगतात. बाजारपेठ सातारा शहरासह, मुंबई, पुणे, रायगड, नगरसह, सुरत या शहरापर्यंत उत्पादने पोहोचली आहेत. काही वितरक तयार केले आहेत. मुलगा व बंधू यांच्याबरोबरीने पत्नी कमल या देखील उद्योगात कार्यरत असतात. सुमारे सात कामगारांना रोजगार देण्यात आला आहे. पल्पचे २००, ५०० मिलि तसेच एक, दोन, पाच लिटरचे तर क्रश, जॅम, जेलीचे अर्धा व एक किलोचे पॅकिंग केले जाते. उत्पादनांचा दर्जा तर सांभाळला आहेच शिवाय सर्व उत्पादनांचे आकर्षक पॅंकिग केले असल्याने बाजारपेठेत मागणी चांगली राहते. भांडवल व वृद्धी
संपर्क ः मनोहर भिलारे, ९४२२४०४१३४
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.