Maharashtra Weather: महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ झाली असून, आजपासून शनिवारपर्यंत (ता.१२ ते १८) हवेचे दाब १०१० हेप्टापास्कल इतके अधिक राहतील. त्यामुळे बाष्पयुक्त वारे अत्यंत कमी प्रमाणातच महाराष्ट्राच्या दिशेने येतील. त्यानुसार पश्चिम विदर्भात पूर्णपणे उघडीप राहून पावसाची शक्यता नसेल. तसेच धुळे, जळगाव, हिंगोली जिल्ह्यांतही आज (ता.१२) पावसाची शक्यता नाही. .मध्य व पूर्व विदर्भातही पावसाची शक्यता कमी आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ढगांचे प्रमाणही अत्यल्प राहील. त्यामुळे भरपूर सूर्यप्रकाश व कमाल तापमानात वाढ होणे शक्य आहे. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेगही सर्वच जिल्ह्यांत साधारणच राहील. अस्थिर हवामानाकडून स्थिर हवामानाकडे वाटचाल झाली आहे..काश्मीर, पंजाब, हरियाना, राजस्थान, गुजरात या राज्यांतून मॉन्सून बाहेर पडला असून, पश्चिम उत्तर प्रदेश व पश्चिम मध्य प्रदेशातून मॉन्सून बाहेर पडल्याचे भारतीय हवामान शास्त्र विभागाने जाहीर केले आहे. भारताच्या पूर्व भागातून उत्तरेकडून दक्षिणेकडे ईशान्य मॉन्सून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. हवेच्या दाबात वाढ झाल्याने तो आता वेगाने बाहेर पडेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी हवामान अत्यंत अनुकूल बनले आहे. किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली असून, थोड्याच दिवसांत थंडीची चाहूल सुरू होईल..अद्यापही प्रशांत महासागराचे पेरूजवळ पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान केवळ १४ अंश सेल्सिअस असून, इक्वेडोरजवळ ते २१ अंश सेल्सिअस असल्याने पाणी थंड आहे. त्यामुळे तिकडे हवेचे दाब अधिक आहेत. त्यामुळे ‘ला-निना’चा प्रभाव आहेच. या शिवाय हिंदी महासागराचे व बंगालच्या उपसागराच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले असून मोठ्या प्रमाणात बाष्पनिर्मिती होत आहे. त्यामुळे परतीचा मॉन्सून बाहेर पडण्यास वेळ लागत आहे..Monsoon Rain: अकोल्यापर्यंत माॅन्सूनचा परतीचा प्रवास; पुढील २ ते ३ दिवसांत माॅन्सून संपूर्ण राज्यातून परतण्याची शक्यता.कोकणआज (ता.१२) रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पालघर जिल्ह्यांत ६ मि.मी., तर रायगड व ठाणे जिल्ह्यात ४ मि.मी. पावसाची शक्यता आहे. कोकणातील सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ६ कि.मी. राहील. सिंधुदुर्ग, रायगड व पालघर जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान रत्नागिरी जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस, तर सिंधुदुर्ग, रायगड व ठाणे जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस आणि ठाणे जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत अल्पसे ढगाळ राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात व रत्नागिरी जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ८५ ते ९० टक्के व रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ७४ ते ७७ टक्के राहील..उत्तर महाराष्ट्रआज (ता.१२) नाशिक जिल्ह्यात ३ मि.मी. व नंदुरबार जिल्ह्यात १ मि.मी. इतक्या पावसाची राहील. तर धुळे व जळगाव जिल्ह्यांत पावसाची शक्यता नाही. नाशिक व जळगाव जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा ईशान्येकडून, तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत आग्नेयेकडून राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग २ ते ४ कि.मी. राहील. कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस आणि जळगाव जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस, तर नाशिक व जळगाव जिल्ह्यांत १९ ते २० अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० ते ६५ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४० टक्के राहील..मराठवाडाआज (ता.१२) लातूर व नांदेड जिल्ह्यांत ४ ते ५ मि.मी., तर परभणी व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ३ मि.मी. पावसाची शक्यता राहील. बीड व धाराशिव जिल्ह्यांत आज २ मि.मी. पावसाची शक्यता असून, हिंगोली जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ५ कि.मी., तर नांदेड जिल्ह्यात ताशी ४ कि.मी. आणि बीड जिल्ह्यात ताशी ६ कि.मी. राहील. तसेच हिंगोली, लातूर व जालना जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ७ कि.मी. आणि धाराशिव जिल्ह्यात ताशी १० कि.मी. राहील..कमाल तापमान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस, तर धाराशिव, लातूर, नांदेड, बीड या जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. हिंगोली व जालना जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान धाराशिव व बीड जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस आणि लातूर जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस राहील. मात्र नांदेड, परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अल्पसे ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता धाराशिव, लातूर, नांदेड, बीड व परभणी जिल्ह्यांत ७० टक्के, तर हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ६१ ते ६८ टक्के राहील..Monsoon Return: मॉन्सून घेणार महाराष्ट्राचा निरोप.पश्चिम विदर्भआज (ता.१२) पश्चिम विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत पावसाची शक्यता नाही. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत २ ते ६ कि.मी. राहील. वाशीम, अमरावती व बुलडाणा जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस, तर अकोला जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहील. आकाश सर्वच जिल्ह्यांत अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ७१ ते ७५ टक्के व दुपारची सापेक्ष आर्द्रता ३५ ते ४० टक्के राहील..मध्य विदर्भआज (ता.१२) यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत १ मि.मी. पावसाची शक्यता आहे. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत ८ कि.मी. राहील. सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ७७ टक्के व दुपारची सापेक्ष आर्द्रता ४३ टक्के राहील..पूर्व विदर्भआज (ता.१२) गडचिरोली जिल्ह्यात २ मि.मी., तर चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत १ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा चंद्रपूर जिल्ह्यात पूर्वेकडून, तर गडचिरोली, भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत ताशी ४ ते ५ कि.मी., तर चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत ताशी ७ कि.मी. राहील. चंद्रपूर, भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस, तर गडचिरोली जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर जिल्ह्यात २१ अंश आणि गडचिरोली जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता गडचिरोली जिल्ह्यात ९१ टक्के, तर चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ८२ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ५० टक्के राहील..पश्चिम महाराष्ट्रआज (ता.१२) सातारा जिल्ह्यात ५ मि.मी., तर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत ३ मि.मी. पावसाची शक्यता आहे. सोलापूर, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत २ मि.मी. पावसाची शक्यता आहे. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ कि.मी. राहील. कमाल तापमान पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस, तर कोल्हापूर जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील. सांगली व सातारा जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस आणि सोलापूर जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील. सातारा, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत किमान तापमान १९ अंश सेल्सिअस, तर सांगली जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सोलापूर जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस आणि कोल्हापूर जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ७० ते ७५ टक्के आणि दुपारची सापेक्ष आर्द्रता ५३ ते ५९ टक्के राहील..कृषी सल्लापावसात उघडीप असताना खरिपातील सोयाबीन, भुईमूग व इतर पिकांची काढणी व मळणीची कामे करावीत. माल सुरक्षित स्थळी साठवावा.रब्बी ज्वारी, हरभरा, सूर्यफूल, करडई, गहू या पिकांची पेरणी जमिनीत पुरेशी ओल असताना करावी.पूर्वहंगामी उसाची लागवड १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या काळात करावी.कांदा, टोमॅटो, वांगी या पिकांचे बियाणे गादीवाफ्यावर पेरून रोपवाटिका तयार करावी.रब्बी हंगामात जनावरांना हिरवा चारा उपलब्ध व्हावा म्हणून मका पेरणी करावी.(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया) .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.