Video
Hydroponic Farming : शाळेतच मातीविना शेती; ढोरेगावच्या विद्यार्थ्यांनी उभारला हायड्रोपोनिक प्रकल्प
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ढोरेगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि शिक्षणाचा अनोखा संगम घडवून आणण्यात आला आहे. शाळेत हायड्रोपोनिक तंत्राने भाजीपाला उत्पादनाचा प्रकल्प उभारण्यात आला असून शनिवारी या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले.हायड्रोपोनिक पद्धतीत मातीचा वापर न करता पाण्यात आवश्यक पोषकद्रव्यांचा पुरवठा करून वनस्पतींची वाढ केली जाते. विद्यार्थ्यांना मातीविना शेती, कमी पाण्यात उत्पादन आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला आहे.विशेष म्हणजे, शाळेतील शिक्षकांनी लोकसहभागातून या प्रकल्पाचा खर्च उचलला आहे. याआधी शाळेत दोन वर्षांपासून परसबागेचा उपक्रम राबवला जात असून, त्यातील भाजीपाला पोषण आहारात वापरला जात आहे.‘शिका, प्रयोग करा, नवनिर्मिती करा’ या भूमिकेतून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, प्रयोगशीलता आणि शेतीविषयक जिज्ञासा निर्माण करण्याचा शाळेचा प्रयत्न आहे. हायड्रोपोनिक प्रकल्पाचे व्यवस्थापनही विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.
