अधिक पावसामुळे उद्भवलेल्या सोयाबीन पिकातील समस्या, उपाययोजना

गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून सतत व अधिक पावसामुळे सोयाबीन पिकामध्ये काही समस्या दिसून येत आहेत. त्यात सोयाबीनचे पीक अचानक पिवळे पडणे, वाळणे व शेंगांचे प्रमाण कमी होणे अशा समस्यांचा समावेश आहे.
अधिक पावसामुळे उद्भवलेल्या सोयाबीन पिकातील समस्या, उपाययोजना
अधिक पावसामुळे उद्भवलेल्या सोयाबीन पिकातील समस्या, उपाययोजना

गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून सतत व अधिक पावसामुळे सोयाबीन पिकामध्ये काही समस्या दिसून येत आहेत. त्यात सोयाबीनचे पीक अचानक पिवळे पडणे, वाळणे व शेंगांचे प्रमाण कमी होणे अशा समस्यांचा समावेश आहे.

  • सोयाबीन पिकांमध्ये या वर्षी खोडमाशी व चक्रभुंगा या किडींचा प्रादुर्भाव सामान्यपेक्षा जास्त आढळतो आहे. परिणामी सोयाबीन पिवळे पडत आहे.
  • काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे सोयाबीनच्या मुळांना जमिनीतील अन्नद्रव्य शोषताना अडथळा येत असल्यामुळेही सोयाबीन पिवळे पडत आहे.
  • काही भागात पिवळा मोझॅक व्हायरस या रोगाच्या प्रादुर्भावामुळे झाडे पिवळी पडत आहेत.
  • उपाययोजना ः १) अधिक पावसामुळे ज्या शेतात पाणी साचलेले आहे, ते प्रथम बाहेर काढण्याची व्यवस्था करावी. २) या वर्षी सोयाबीन पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत खोडमाशीचा प्रादुर्भाव बहुतांश ठिकाणी आढळला होता. प्रादुर्भावग्रस्त सोयाबीन पिकासाठी ज्या शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना केल्या, त्यांच्या शेतात प्रादुर्भाव कमी होऊन शेंगांचे प्रमाण बरे होते. मात्र, सतत येणाऱ्या पावसामुळे जे शेतकरी वेळेवर उपाययोजना करू शकले नाहीत. त्यांच्या शेतात सोयाबीन पीक जास्त प्रादर्भावग्रस्त झाले. त्यांच्या शेतात पाने पिवळी पडून झाडे सुकण्यास सुरुवात झालेली आहे. अशा परिस्थितीत खोडमाशी, चक्रभुंगा सोबतच पाने खाणाऱ्या अळींचे (उंटअळी व स्पोडोप्टेरा) चा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी पुढील प्रकारे फवारणी करावी. फवारणी प्रति लिटर पाणी इन्डोक्साकार्ब ०.७ मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोऐट (१.९ ई.सी.) ०.८४ मि.ली किंवा क्लोरअॅन्ट्रानीलीप्रोल ०.३ मिली. ३) सद्यःस्थितीत बऱ्याच जमिनीत अतिरिक्त ओलाव्याची स्थिती आहे. परिणामी सोयाबीनच्या मुळांना जमिनीतील पोषणद्रव्ये शोषण्यात अडथळे येत आहेत. या सोबतच सततच्या ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाश अपुरा पडल्याने सोयाबीन पिकाच्या प्रकाशसंश्लेषण क्रियेवर त्याचा विपरीत परिणाम झाला. परिणामी सोयाबीनची पाने पिवळी पडत आहेत. अशा पानांच्या शिरा मात्र हिरव्या राहतात. अशा परिस्थितीमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता लक्षात घेता, विशेषतः नत्र व पालाश यांचा पुरवठा करण्यासाठी १३ः०ः४५ (पोटॅशियम नायट्रेट) १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. ४) काही भागात सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. या रोगाचा प्रसार पांढऱ्या माशीद्वारे होतो. तो रोखण्यासाठी पिकाच्या प्रारंभिक अवस्थेमध्येच शेतात विविध ठिकाणी पिवळे चिकट सापळे लावावेत. या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी, पिकावर पिवळा मोझॅक व्हायरस या रोगाची लक्षणे दिसताच रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. अशा शेतात पांढऱ्या माशीच्या नियंत्रणाकरिता, फवारणी प्रति लिटर पाणी (भारतीय सोयाबीन संशोधन संस्था, इंदोर यांची शिफारस) बीटासायफ्लुथ्रिन (८.४९ टक्के) अधिक इमिडाक्लोप्रीड (१९.८१ टक्के ओ.डी.) (संयुक्त कीटकनाशक) ०.७ मिली किंवा थायोमिथॉक्झाम अधिक लॅंबडा सायहॅलोथ्रीन (संयुक्त कीटकनाशक) ०.२५ मिली. ५) काही भागात सतत होत असलेल्या रिमझिम पावसाच्या स्थितीमुळे पाने खाणाऱ्या अळ्या पानासोबतच शेंगाचेही नुकसान करत आहेत. त्यामुळे अफलन (शेंगा नसणे) स्थिती तयार होत आहे. विशेषतः मध्यम कालावधीच्या वाणांमध्ये ही स्थिती जास्त प्रमाणात आहे. अशा प्रकारच्या पिकामध्ये दुसऱ्यांदा फुले व शेंगा येण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीमध्ये पिकाचे उत्पादन किमान ५० ते ६० टक्के घेण्याकरिता आवश्यकतेनुसार सिंचन व कीड व्यवस्थापनाचे उपाय करावेत. ६) सतत व अधिक पावसामुळे काही भागात सोयाबीन पिकावर बुरशीजन्य अॅन्थ्रॅकनोज (पानावरील /शेंगावरील बुरशीजन्य ठिपके), रायझोक्टोनिया एरिएल ब्लाईट (करपा) व रायझोक्टोनिया रूट रॉट (मुळकुज/खोडकुज) या रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे. या रोगांच्या नियंत्रणा करीता, फवारणी प्रति लिटर पाणी टेब्युकोनॅझोल (२५.९ ई.सी.) १.२५ मिली किंवा टेब्युकोनॅझोल (१० टक्के) अधिक सल्फर ( ६५ टक्के डब्ल्यू.जी.) २.५ ग्रॅम किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन (२० डब्ल्यू. जी.) १ ग्रॅम किंवा हेक्झाकोनॅझोल (५ टक्के इ.सी.) १.६ मिली. डॉ. सतीश निचळ, ९४२३४७३५५० (सोयाबीन शास्त्रज्ञ व प्रमुख, प्रादेशिक संशोधन केंद्र, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अमरावती.)

    महाराष्ट्र

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com