कडक जमिनींसाठी ठरतोय ‘व्हायब्रेटिंग सबसॉयलर’ फायदेशीर

खोल जमिनीत तयार झालेला कडक थर फोडण्यासाठी तसेच अतिरिक्त पाणी व क्षारांचा निचरा करण्यासाठी ‘व्हायब्रेटिंग सबसॉयलर’ चा वापर फायदेशीर ठरू शकतो. ममुराबाद (ता. जि.जळगाव) येथील कृषी विज्ञान केंद्राने यासंबंधी तापी नदीकाठच्या एका गावामध्ये प्रयोग राबविले आहेत. हे प्रयोग प्राथमिक टप्प्यात उत्साहवर्धक ठरले आहेत.
सब साॅयलरचे दाखवलेले प्रात्यक्षिक
सब साॅयलरचे दाखवलेले प्रात्यक्षिक

खोल जमिनीत तयार झालेला कडक थर फोडण्यासाठी तसेच अतिरिक्त पाणी व क्षारांचा निचरा करण्यासाठी ‘व्हायब्रेटिंग सबसॉयलर’ चा वापर फायदेशीर ठरू शकतो. ममुराबाद (ता. जि.जळगाव) येथील कृषी विज्ञान केंद्राने यासंबंधी तापी नदीकाठच्या एका गावामध्ये प्रयोग राबविले आहेत. हे प्रयोग प्राथमिक टप्प्यात उत्साहवर्धक ठरले आहेत.   खानदेशात केळी, ऊस, पपई आदी पिकांची शेती मोठी आहे. तापी, गिरणा आदी नद्यांच्या काठी अनेक वर्षे बागायती शेती केली जाते आहे. परंतु अलीकडील काही वर्षांत शेतीला सतत सिंचन करीत गेल्याने दीड, दोन ते अडीच फुटांखालील जमिनीत कडक थर तयार झाला आहे. ही समस्या जमिनीत पाणी जिरण्यास किंवा मुरण्यास अडथळा ठरत आहे. हा थर फोडण्यासह जमीन भुसभुशीत करण्यासाठी ‘सबसॉयलर’ प्रभावी ठरत आहे. ममुराबाद (ता. जि.जळगाव) येथे कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) कार्यरत आहे. केंद्राचे प्रमुख डॉ. हेमंत बाहेती यांच्या मार्गदर्शनाखाली येथील अभियांत्रिकी शाखेचे विषय विशेषज्ञ अभियंता वैभव सूर्यवंशी यांनी तापी नदीकाठावरील करंज गावी यंदाच्या जानेवारीमध्ये दोन प्रात्यक्षिके राबवली. एका कंपनीची निर्मिती असलेल्या ‘व्हायब्रेटिंग सबसॉयलर’चा प्रयोग यामध्ये करण्यात आला. त्याचे निष्कर्ष उत्साहवर्धक आढळले आहेत. प्रचलित यंत्रांतील त्रुटी करंज (ता.जळगाव) येथील मोहन सपकाळे यांच्या शेत तूर काढणीनंतर अर्धा एकर क्षेत्रात प्रयोग राबविला. इथली जमीन पाणी व रासायनिक खते यांच्या अनियंत्रित वापरातून कडक झाली आहे. जमिनीत पाणी मुरत नाही. जमिनीत दोन फुटांखालील कडक थर काढण्यासाठी जेसीबी यंत्राचा उपयोग करावा लागतो. यात प्रति तास एकरी एक हजार रुपये खर्च येतो. शिवाय ही यंत्रणा अधिक वजनदार असते. त्यामुळे जमिनीवर मोठे वजन तयार होऊन तिच्यातील भुसभुशीतपणा कमी होऊ शकतो. प्रचलित ट्रॅक्टरचलित पल्टी नांगर हा पर्याय आहे. मात्र त्याची क्षमता म्हणजे फक्त एक ते सव्वाफूट खोलीवर जमीन नांगरली जाते. ‘सबसॉयलर’ ठरला किफायतशीर ‘केव्हीके’चे सूर्यवंशी आपले अनुभव सांगताना म्हणाले की ‘व्हायब्रेटिंग सबसॉयलर’ चा वापर सुमारे ५० एचपी क्षमतेच्या ट्रॅक्टरसाठी करता येतो. या तंत्रज्ञानानुसार सुमारे एक तासात एक एकरपर्यंत तीन फुटांपर्यंत नांगरणी शक्य झाली. यासाठी दोन लिटर डिझेल लागले. शिवाय जमीन सलग नांगरणीची गरज नाही. प्रत्येकी दोन मीटर अंतरात एक चर नांगरला. प्रात्यक्षिक घेतलेल्या संबंधित शेतकऱ्याच्या शेतानजीकच्या एका केळी काढणी केलेल्या बागेतही नांगरणी करून पाहिली. पण तेथे केळीचे अवशेष पडून होते. यामुळे नांगरणी व्यवस्थित होवू शकली नाही. पडीक जमिनीतही यशस्वी करंज गावातील ग्रामरपंचायतीकडील अनेक वर्षे पडीक असलेल्या अर्धा एकर जमिनीतही या ‘सबसॉयलर’ द्वारे नांगरणी केली. तीन फूट खोल चर काढले. नांगरणी हव्या त्या गतीने झाली. ही जमीन उताराची आहे. या जमिनीत पाणी सोडल्यानंतर ते वाहून न जाता जमिनीत मुरण्यास मदत झाल्याचे आढळले. सबसॉयलरची वैशिष्ट्ये

  • जमिनीच्या पृष्ठभागाखाली सुमारे तीन फुटांपर्यंत खोल जातो.
  • तळी फोडणारा टोकदार फाळ एक फूट लांबीचा
  • पृष्ठभागाखाली तयार झालेला घट्ट थर (हार्ड पॅन) फोडण्यासाठी वापर
  • हलक्‍या, कमी खोलीच्या तसेच भारी व खोल जमिनीतही कार्य करतो.
  • मोल नांगर

  • जमिनीपासून ४० ते ७५ सेंटीमीटर खोलीवर जाऊ शकतो. याला भरीव गोल पाइप असतो.
  • मोल जमिनीच्या उताराला समांतर काढावे लागतात.
  • मोल तयार झाल्यानंतर १० ते १५ दिवसांच्या अंतराने मशागत करावी.
  • पिकाला पाणी दिल्यानंतर किंवा पाऊस पडल्यानंतर जमिनीवरील पाणी हे जमिनीमध्ये पडलेल्या फटीतून मोलमध्ये जमा होते. त्यानंतर निचरा करता येतो.
  • चीझल नांगर

  • मर्यादित म्हणजे १५ सेंटीमीटरपासून ४६ सेंटीमीटर खोलीपर्यंत हा काम करतो.
  • माती मोकळी करणे आणि हवा खेळती करणे हे त्याचे मुख्य कार्य आहे.
  • प्रतिक्रिया तूर, केळी यांची काढणी झालेल्या व रिकाम्या मात्र कडक जमिनीत ‘सबसॉयलर’ चे प्रयोग झाले. विशेष म्हणजेच पाणी, रासायनिक खतांच्या दीर्घकाळ अनियंत्रित वापराने आमच्या जमिनीत अडीच फुटांखाली कडक थर तयार झाला होता. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरत नव्हते. ‘सबसॉयलर’ च्या वापरातून ही समस्या दूर होण्यास मदत होईल. -मोहन सपकाळे, शेतकरी, करंज ‘सबसॉयलर’ वापरताना केव्हीकेचे सूर्यवंशी म्हणाले की सबसॉयलरचा वापर दोन ते तीन वर्षांतून एकदा करावा. वापर केलेली जमीन ८ ते १५ दिवस उन्हामध्ये तापून त्यानंतरच पुढील मशागत करावी. भाडेतत्वावर यंत्रे उपलब्ध करणारे शेतकरी गट वा कंपन्या यांनी अशी यंत्रे उपलब्ध केल्यास सर्व शेतकऱ्यांना त्याचा वापर करणे आर्थिक दृष्ट्या शक्य होईल. खरिपापूर्वीही आम्ही प्रयोग व्यापक स्वरूपात राबविणार आहोत. ‘सबसॉयलर’ च्या वापरामुळे जमिनीतील जास्तीच्या पाण्याचा व क्षारांचाही निचरा होणार आहे. जमिनीचे भौतिक, जैविक व रासायनिक गुणधर्म सुधारण्यास मदत होते. वापरासाठी डिसेंबर ते एप्रिलपर्यंतचा कालावधी अधिक चांगला असतो. जमिनीमध्ये असलेली पाण्याची पाइपलाइन, विजेची वायर असणाऱ्या ठिकाणी मार्किंग करून घ्यावे. ते तुटणार नाही याची दक्षता घ्यावी. खोडव्यामध्ये वापर करताना खोडकी जमिनीलगत छाटलेली असावी. संपर्क- वैभव सूर्यवंशी- ९७३०६९६५५४ विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com